भाई दत्ता पाटील
श्री.दत्ता पाटील हे ७५ वर्षांचे झाले, यावर विश्वास बसणं कठीणच आहे. वयाबरोबर येणारा निरूत्साह त्यांच्यात आजही नाही. उत्साहाने सतत रसरसलेलं त्यांचं बोलणं आजही तसंच आहे. एक तपापूर्वी ते ज्या अदम्य उत्साहाने बोलत असत, तोच उत्साह आजही त्यांच्या बोलण्यात सर्वांनाच जाणवत असेल. तपापूर्वीचा उल्लेख केला तो, ज्या काळात वर्षातले काही महिने, तासामागून तास विधिमंडळात आम्ही एकत्र असायचो, त्या दोघांच्याही आमदारकीच्या काळातले त्यांचे वागणे मनात नोंदवलेले असल्यामुळे!
विधानसभेत रोज सकाळी आपली सगळी हत्यारे परजून आम्ही हजर होत असू. पण सर्वात अधिक उत्साह आमदार दत्ता पाटलांना असे. या उत्साहाचे पहिले दर्शन घडे प्रश्नोत्तरांच्या तासाला! तासाभरात कोणी-ना-कोणी मंत्री हातात सापडे! कधी चुकीचे, अपुरे उत्तर दिले म्हणून तर कधी उपप्रश्नाची नीट तयारी नसल्यामुळे! प्रश्नाचे उत्तर किंवा उपप्रश्नाचे उत्तर समाधानकारक नसल्यामुळे प्रश्न राखून ठेवला की, लढाई जिंकल्याचे समाधान! खरं म्हणजे त्यात विशिष्ट मंत्र्यांना अवमानित करण्याचा हेतू मुळीच नसायचा. जनतेच्या वतीने आपण शासनाच्या अन्यायांविरूध्द संघर्ष करतोय, हीच भावना असायची आणि त्यात अनेक लढायांमध्ये आमचे सेनापती असायचे श्री.दत्ता पाटील. हेच कार्य वेगवेगळ्या स्वरूपात दिवसभर चालायचे. लक्षवेधी सूचना ही प्रश्नोत्तराचीच दुसरी बाजू असल्यामुळे, उत्तर नीट वाचून ठेवून उपप्रश्नांचा मारा चालायचा- आणि अध्यक्षांकडून उत्तर राखून ठेवून घेण्यात त्याचा शेवट होत असे. दुपार झाली की, हळुहळू सभागृहातील उपस्थिती कमी व्हायची. स्थगनप्रस्ताव किंवा अविश्वासाचा ठराव असा काही विषय असेल तर गोष्ट वेगळी! अन्यथा आता संध्याकाळपर्यंत फार मोठा संघर्ष होणार नाही, असं अनेक सभासदांना वाटायचं. पण आ.दत्ता पाटील यांच्या दृष्टीने सभागृहाचे कामकाज संपेपर्यंत पटकन् उभे राहून हरकतीच्या मुद्दयांचा पाऊस पाडायला दिवसभर संधी असायची.
विधेयक मांडण्यापासूनच संघर्ष सुरू व्हायचा. ‘कौल आणि शकधर’ हातात घेऊनच, अमुक नियमान्वये किंवा तमुक संकेतामुळे हे विधेयक कसे बेकायदेशीर आहे-याविषयी श्री.दत्ता पाटील तावातावाने बोलणारच! विरोधी पक्षात सभागृहाचे दिवस सोडल्यास फौजदारी वकिली करणारे एकमेव गृहस्थ म्हणजे दत्ता पाटील. त्यामुळे इंग्रजी भाषेतून समर्पक युक्तिवाद करून नंतरच विधेयक मांडले जायचे. त्यानंतर भाषणातून ते विधेयक परत घेणे किंवा चिकित्सा समितीकडे पाठवणे कसे आवश्यक आहे. यावर सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांचा युक्तिवाद व्हायचा! आणि हे केवळ विरोधासाठी विरोध या पध्दतीने पाठवणे आवश्यक आहे, हे शेवटी सभागृहाचे मत व्हायचे आणि संयुक्त समितीतून अक्षरश: पूर्ण बदललेले विधेयक परत यायचे. हा अनुभव अनेक विधेयकांच्या विषयांत आला. विद्यापीठ विधेयक असो, वा सहकार विधेयक असो – त्या काळातली किती तरी विधेयके अशी बदलून आली. त्यांचा खरोखरच अभ्यास व्हायला हवा- असो आणि विरोधी पक्षांच्या जागरूक आमदारांचे अग्रणी असलेल्या दत्ता पाटील यांना त्यातले योग्य ते श्रेय द्यावेच लागेल. अंदाजपत्रकावरच्या चर्चेच्या वेळेला कपातसूचनांचा असाच आग्रह दत्ता पाटील धरीत असत. अशा चर्चा संध्याकाळपर्यंत चालायच्या आणि
दिवसभर सभागृहात वेळ काढायला त्यांचा कधीच विरोध नसायचा. काही काळ विरोधी पक्षनेते म्हणून; तर काही काळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणूनही अधिक जबाबदारीची कामेही त्यांनी केली. परंतु एरव्ही ‘सभागृहातला जागरूक आमदार’ हेच त्यांचे रूप महाराष्ट्राला ठाऊक होते. परंतु सभागृहाच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना एकटं कधी राहायला नको असायचं. सतत कोणीतरी आपल्याबरोबर असावं, ही त्यांची गरज होती. चेअरमनसाहेब म्हणून ते गाडीत कधी एकटे बसले नाहीत; मी मैलोगणती त्यांच्याबरोबर प्रवास केला आहे. आमचा भाजपा वाढू नये, ही त्यांची प्रामाणिक इच्छा होती. परंतु राम कापसे गाडीत असणे, हे तरीही आवश्यक होते. बोलायला शंभर विषय असत आणि सतत तरूणाच्या उत्साहाने त्यांचं बोलणं चालू असायचं. अर्थात्समोरच्या माणसांनी चर्चेत सहभागी व्हावं, अशीही त्यांची अपेक्षा असायची! पक्षभेद विसरून आम्ही सातत्याने एकत्र जगलोय! त्यांना आवडणार नाही हे ठाऊक असतानाही, ‘काय दत्तोपंत’अशी लांबून त्यांना हाक मारून कधी फिरायला, कधी कामाला, कधी बैठकीला या माणसातल्या माणसाबरोबर आम्ही हिंडत राहिलो आहोत. एकदाच आम्ही त्यांच्या गावी गेलो होतो. कमिटीच्या दौऱ्याच्या निमित्ताने अलिबागला राहिलो. त्यांना, सर्व सभासदांचा चांगला आदरसत्कार करायचा होता. नागरिकांच्या भेटीगाठी करायच्या होत्या. पेणचा त्यांचा सहकारी बाजार दाखवायचा होता आणि मुख्य म्हणजे घरी अगदी ताजी- ताजी भाजी आणि अन्य सर्वचविष्ट पदार्थ खायला घालायचे होते. त्या प्रवासात सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष असा काही भेद नव्हता. आम्ही सर्व मित्र म्हणून त्यांच्या पाहुणचारासाठी एकत्र आलो होतो… कजिजाम अशीच एक आठवण तुळजापूरची! तुळजापुरात त्या काळात शे.का.पक्षाचे चांगले काम होते. ‘आमदार दत्ता पाटील येणार’ म्हणून पक्षकार्यकर्त्यांनी त्यांचे आणि आमचे चांगले आगतस्वागत केले. मंदिरातही स्वागत होणार होते. दत्ता पाटील स्वागत समारंभाला आले;पण दर्शनाला अजिबात आले नाहीत! हा स्वभावातला आग्रहीपणा जो सभागृहात, तोच मंदिरात! मतांचा पक्का आणि तरीही सर्वांचा मित्र-असे हे अजब रसायन आहे. त्यांच्या आग्रही स्वभावामुळे ज्यांना फटके बसले, ते ही विसरणार नाहीत आणि या खडबडीत नारळाच्या आत मधुर पाणी आहे, हा आमचा अनुभवही आम्ही विसरणार नाही. अगदी ताजा अनुभव १९९६ साली मी राज्यसभेला उभा राहिलो तेव्हाचा! ‘या राज्यसभेत तुमच्यासारखे अभ्यासूलोकप्रतिनिधी हवेतच; म्हणून आम्ही तुम्हाला विरोध करणार नाही’ -असं त्यांनी मला दूरध्वनीवरून सांगितलं. नंतर अनुभव असा आला की, खरंच कोणीच विरोध केला नाही आणि बिनविरोध मी दोन वर्षांसाठी राज्यसभेवर निवडून गेलो. दत्ता पाटलांचा सभागृहात सरकारला विरोध करण्यातला आवेग, आणि मला पाठिंबा देण्यातला आवेग सारखाच होता.
प्रा. राम कापसे (माजी खासदार, कल्याण)