शेकापचे लढे

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त्य शेकापच्या प्रमुख लढ्यांवर टाकलेला प्रकाश…।

           पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांचे आजोबा नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली  सतत ७ वर्षे चाललेल्या ‘चरी’च्या शेतकरी संपाच्या फलीत १९३५ सालच्या कसेल त्याची जमीन ही घोषणा  कुळ कायद्याच्या रुपात यशस्वी झाल्याचा अनुभव गाठीशी घेवून तसेच काँग्रेसच्या ब्राम्हणी व भांडवली कारभाराने होत असलेल्या घुसमटीने केशवराव जेधे-शंकरराव मोरे यांनी  भारतीय शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करून फुले शाहूंच्या विचारांना हाती घेऊन शेतकरी-कष्टकरी बहुजन वर्गाच्या हिताचे राजकारण करणे सुरु केलेले होते. त्यातूनच जनतेचे जे लढे उभे राहिले त्याला शेतकरी कामगार पक्षाने आणि पक्षाच्या नेत्यांनी बळ दिले व जनतेचे लढे यशस्वी केले.
हैद्राबादी मुक्ती संग्राम
              कॅबिनेट मिशनच्या १२ मे १९४६ च्या खलित्यानुसार इंग्रज सरकारने संस्थानिकांवरील आपले सार्वभौमत्वाचे हक्क संस्थानिकांच्या सुपूर्द केले होते. भारत सरकारची भूमिका निजामाला गोंजारण्याची होती. सौम्य भाषेत तडजोडी करुन सरकारने त्याच्याशी ‘जैसे थे’ करार केला. या कराराने निजामाला शेतकरी चळवळ दडपण्यास लागणारी ताकद गोळा करण्याची संधी मिळाली. ९ नोव्हेंबर १९४७ रोजी नगर येथे भरलेल्या सभेने नेमलेल्या हैद्राबाद सहायक समितीतर्फे हैद्राबाद संस्थांच्या सरहद्दीवरील प्रदेशात क्रांतिसिंह नाना पाटील, देवराव वाघ, अण्णासाहेब गव्हाणे, अॅड.मोताळे, पंजाबराव देशमुख यांच्या अनेक सभा झाल्या. हैद्राबाद लढ्याचे स्वरुप त्यांनी समजावुन सांगितले. क्रांतिसिंह नाना पाटलांनी शेतकऱ्यांच्या प्रचंड सभा घेऊन रझाकारांविरुद्ध जनमत संघटीत करुन लोकांना प्रतिकारप्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चहुकडून सशस्त्र शेतकरी चळवळ पसरेल, या धास्तीने १३ सप्टेंबर १९४८ रोजी निजामांविरुद्ध भारत सरकारने पोलिस अॅक्शन केली. या पोलिस अॅक्शनपूर्वीच शेकापने हैद्राबादच्या संदर्भात महत्वाच्या मागण्या केंद्रशासनासमोर ठेवल्या होत्या.
सातारचे पत्रीसरकार     
             शेतकरी क्रांतीच्या हेतूने भारावलेल्या शेकापच्या नेत्यांची साताऱ्याची ही चळवळ सरकारी संस्थांवर बहिष्कार घालून त्यांना पर्यायी राष्ट्रीय संस्था उभी करण्याकरिता क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वात ही चळवळ सुरु करण्यात आलेली होती. प्रतिसरकारचे स्वरुप शेतकरी क्रांती, बहुजन सापेक्ष डावीकडे झुकलेली ही चळवळ होती. तिला शेतकरी क्रांतीचे पदचिन्ह मानून त्या दिशेने पुढे जाण्याच्या आकांक्षेने सातारा जिल्ह्यातील अनेक पुढारी शेकापकडे आकर्षित झाले. नाशिक, नगर भागातील पुढाऱ्यांची त्यांना साथ मिळालेली होती. या पत्रीसरकारच्या चळवळीने सरकारला नाकीनऊ आणलेले होते.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ व सीमा लढा
             ९ डिसेंबर १९४७ रोजी शेकापने संयुक्त महाराष्ट्राचा ठराव केल्यापासून पुढे सतत व सुसंगतपणे पक्षाने संयुक्त महाराष्ट्रवादाची भूमिका घेतली होती. नेहरुंनी संसदेत केलेल्या या विरोधीत भूमिकेचा शेकापने निषेध करुन मराठी जनतेच्या सर्वांगिण सुधारणेसाठी संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, असे या ठरावात शेकापने म्हटले होते. १६ व १७ ऑक्टोबर १९४८ रोजी मुंबई येथे भरलेल्या सर्वपक्षीय सभेत शेकापच्या जेधे, शंकरराव मोरे, क्रांतिसिंह नाना पाटील, खाडिलकर या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या ठरावास पाठिंबा दिला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढतानाच शेकापने बेळगाव, कारवार, निपाणी, खाणापूर व भालकी या केंद्रांवर १ नोव्हेंबर १९५८ पासून सीमा आंदोलन सुरु केले होते. पक्षाचे दाजिबा देसाई सीमालढा समितीचे प्रमुख होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व सीमा लढा लढण्यात दाजिबा देसाई, डी.एस.खांडेकर, केशवराव धोंडगे, उद्धवराव पाटील, एन.डी.पाटील, बी.पी.पाटील, दि.बा.पाटील हे सर्व नेते आघाडीवर होते. सत्याग्रहासमोर सरकार नमत नाही असे दिसल्यावर ३ मे १९५९ पासून सारा बंदीची चळवळ हाती घेण्यात आली. सीमा आंदोलनाला अधिक व्यापक व प्रभावी करण्यासाठी साराबंदी हा सामुदायिक सत्याग्रहाचा मार्ग शेकापने सीमालढा समितीसमोर मांडला होता.

इगतपुरीचा लढा
            १५ ऑक्टोबर १९४८ रोजी राज्य सरकारने धान्य नियंत्रणाचा हुकुम नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व पेठ तालुक्यांना लागू केला. आपल्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी इगतपुरीच्या शेतकऱ्यांनी शेकापच्या काकासाहेब वाघ यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु केले. शेतीमालास किफायतशीर भाव मिळण्याची हमी हीच उत्पादनवाढीची गुरुकिल्ली आहे. ही त्या आंदोलनाची घोषणा होती. शंकरराव मोरेंनीही एक पत्रक काढून इगतपुरीच्या चळवळीचे समर्थन केले होते. त्या पत्रकातील आक्षेपांना सरकार समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. उलट आंदोलकांवर दडपशाही केली. सरकारने दबाव आणल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील ११७ गावांपैकी ९० गावांच्या पोलिस व मुलकी पाटलांनी राजीनामे दिले. खेड्यापाड्यातील वसुलीची यंत्रणाच कोसळून पडली. अखेर सरकारला सक्तीची वसुली सोडून द्यावी लागली. नंतरच्या वर्षी भाव वाढवून द्यावा लागला. हे या लढ्याचे यश मानले गेले.
रोजगार हमी कायद्यासाठी लढा
            १९७१-७२ साली महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडलेला होता. दोन वेळच्या अन्नाची सोय नव्हती. त्यावेळी लोकांच्या हाताला काम नव्हते. कामाला दाम नव्हते, खायला अन्न नव्हते. त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणावर उपासमार चालू होती. सरकारने धान्याची कोठारे सुरक्षित ठेवलेली होती. मात्र ती जनतेसाठी नव्हती. त्यामुळे त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे खासदार भाई उद्धवराव पाटील, माजी आमदार भाई चंद्रकांत निंबाळकर यांच्या नेतृत्वात वैरागच्या शासकीय गोदामावर हाताला काम द्या, कामाचे दाम द्या नाहीतर पोटाला खायला अन्न द्या, या मागणीसाठी भव्य मोर्चा काढला होता. ६ सप्टेंबर १९७१ रोजी निघालेल्या या भव्य मोर्चावर बंदोबस्तात नेमलेल्या पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांनी गोळीबार करण्याचे आदेश दिले असता  आंदोलनकर्त्यांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात शेतकरी कामगार पक्षाच्या एकनाथ साळुंखे, इब्राहिम शेख, सुंदराबाई चव्हाण, बब्रुवान माळी, भास्कर वाळके, रघुनाथ माने, चतुर्भूज ताकमाते यांना हुतात्मा व्हावे लागले. भाई गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्ह्यातही मोठे आंदोलन केल्या गेले. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बलिदानातून तसेच भाई गणपतराव देशमुख यांनी विधिमंडळात अभ्यासपूर्ण मांडणीमुळे अखेर १९७३ साली महाराष्ट्र सरकारला रोजगार हमी कायदा पारित करावा लागला.
            यासारखे अनेक ऐतिहासीक लढे शेतकरी कामगार पक्षाने रस्त्यावर व विधिमंडळात लढले. त्यातून महाराष्ट्र सहकार कायदा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी, महिलांना ५० टक्के आरक्षण, प्राथमिक शाळा स्थापना, कापूस एकाधिकार योजना, शेतमाल हमीभाव कायदा यासारख्या अनेक कायद्यांची व तरतुदींची निर्मिती महाराष्ट्र सरकारला करावी लागली आहे.आजची परिस्थिती लक्षात घेता पुन्हा एकदा शेकापच्या ७३ व्या वर्धापन दिवशी शेतकरी, कष्टकरी, कामगार नोकरदारांच्या हक्कांसाठी शेकापचा लाल बावटा खांद्यावर घेऊन रस्त्यावरचा लढा उभा करण्याचा  निर्धार करण्यात येत आहे.
संकलन:भाई रोहिदास कुमरे, जिल्हा सह चिटणीस, शेकाप, गडचिरोली.
शेकापचे लढे

सन १९४८ ते १९५६ हा ‘शेतकरी-कामगार पक्षाचा’ सुवर्णकाळ होता म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण याचकाळात शंकरराव मोरे यांचे झुंजार नेतृत्व या पक्षास लाभले होते.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *