कोरोना महामारी : मृतकाच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत द्या – शेतकरी कामगार पक्षाची मागणी
पुणे (२४ऑगस्ट): कोरोनामुळे मृत्युमुखी पडून लोकांचे संसार उघड्यावर येण्यास शासनच जबाबदार आहे, त्यामुळे कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला शासनाने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने राज्याचे मुख्यमंत्री उध्दवराव ठाकरे यांचेकडे केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार तथा पुणे जिल्हा चिटणीस भाई राहुल पोकळे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशात रोज अंदाजे १५ हजार लोक विविध कारणांनी मृत्युमुखी पडतात. त्यात वाईट काही नाही, परंतु कोरोना काळात जे लोक मरणार नव्हते, ते लोक मेलेले आहेत.आणि ज्यांच्या घरात असा प्रसंग आलेला आहे, त्यांचे दुःख त्यांनाच माहिती आहे.
तसेच ज्या-ज्या लोकांचे कोरोना संसर्गामुळे मृत्यु होवून संसार उघड्यावर आले,त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शासनच जबाबदार आहे. त्यामुळे आपण जबाबदारी घेवून कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मरणोत्तर २५ लाख रुपयांचे आर्थिक सहकार्य करावे,अशी मागणीही भाई राहुल पोकळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे.