कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजन करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी
कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजन करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी
गडचिरोली: राज्यभरात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत साधारणपणे २२,००० कर्मचारी कंत्राटी तत्वावर मागील १० ते १५ वर्षापासून कार्यरत आहेत. सदर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने समायोजन करुन सेवेत कायमस्वरुपी करावे,अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केली आहे.
भाई रामदास जराते यांनी राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना अद्याप सदर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले नाही किंवा मानधनातही विशेष वाढ केलेली नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग असतांना सदरचे कर्मचारी जीवावर उदार होवून आपले कर्तव्य पार पाडत असून या कर्मचाऱ्यांचे आरोग्य सेवेतील योगदान लक्षात घेवून त्यांचे समायोजन करुन सेवेत कायम करावे व राज्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यात यावी.असेही भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे.
तसेच सध्या आरोग्य अभियानाचे राज्यपातळीवरचे अधिकारी आणि काही दलाल या कर्मचाऱ्यांकडून पगारवाढ आणि समायोजनाचे आमिष देवून प्रत्येकी एक लाख प्रमाणे पैसे वसूलीचे काम करीत असल्याची माहिती असून १० ते १५ वर्षे अत्यल्प मानधनावर सेवा केल्यानंतरही पैसे देवून समायोजन होणे किंवा मानधन वाढ होण्याचा प्रकार गंभीर असल्याची टीकाही भाई रामदास जराते यांनी केली आहे.
करीता राज्यपातळीवर अधिकारी आणि दलाल यांचेवर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे देवाणघेवाण न होता सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन होवून त्यांना सेवेत कायम करावे,अशी मागणीही भाई रामदास जराते यांनी राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांचेकडे केली आहे.