डिस्टीलरी प्रकल्पासाठी घेतलेले पैसे शेतकऱ्यांना परत करा: अन्यथा राज्यभर आंदोलन
डिस्टीलरी प्रकल्पासाठी घेतलेले पैसे शेतकऱ्यांना परत करा: अन्यथा राज्यभर आंदोलन
साखर आयुक्तांना शेतकरी कामगार पक्षाचा इशारा
पुणे: इंदापूर तालुक्यातील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पासाठी प्रति टन ५० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांकडून घेतलेली रक्कम संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ परत करण्यात यावेत अन्यथा महोदय याप्रकरणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार तथा पुणे जिल्हा चिटणीस भाई राहुल पोकळे यांनी साखर आयुक्तांना दिला आहे.
पुण्याच्या शिवाजीनगरस्थित साखर आयुक्तांना लिहिलेल्या निवेदनात भाई राहुल पोकळे यांनी म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मौजे तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांचा ऊस सन २००८ – ०९ या वर्षी निरा भिमा सहकारी साखर कारखानाला शेतकऱ्यांनी दिला होता. यावेळी हजारो शेतकऱ्यांकडून सदर कारखान्याने डिस्टीलरी प्रकल्पासाठी प्रति टन ५० रुपये कपात केली होती. त्यापैकी फक्त १७ शेतकऱ्यांना ही रक्कम परत देण्यात आली आहे. मात्र उर्वरित शेतकऱ्याना वारंवार अर्ज करून देखील मिळाली नाही.
अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी सदर रक्कम व्याजा सहीत देण्याचे लेखी निवेदन कारखान्याच्या प्रशासनाला दिले होते. मात्र या निवेदना नुसार अद्यापही शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मानसिक – आर्थिक नुकसान होत आहे, असा आरोपही भाई राहुल पोकळे यांनी केला आहे.
दरम्यान आता साखर आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घालून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत न्याय मिळवुन द्यावा अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभारला जाईल आणि याची संपूर्ण जबाबदारी सदर प्रशासनाची राहील अशा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार तथा पुणे जिल्हा चिटणीस भाई राहुल पोकळे यांनी दिला आहे.