ओला दुष्काळ जाहीर करा : शेकाप नेते माजी आमदार भाई पंडितशेट पाटील यांची मागणी
ओला दुष्काळ जाहीर करा : शेकाप नेते माजी आमदार भाई पंडितशेट पाटील यांची मागणी
श्रीवर्धन (१६ ऑक्टोबर) : कोकणातील शेतकऱ्यांना पुढील वर्षभर शासनाने मोफत धान्य द्यावे, शेतकऱ्यांना मोफत वा सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध करून द्यावे. शंभर युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे यासारख्या मागण्या मांडत माजी आमदार पंडितशेट पाटील यांनी कोकणात ओला दुष्काळ जाहीर
करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार भाई पंडितशेट पाटील यांनी केली आहे.
माजी आमदार भाई पंडितशेट पाटील यांनी श्रीवर्धन भागात परतीच्या प्रवासाने झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर संपूर्ण कोकणात मोठी नुकसान झालेली असल्याने सरकारकडे ही मागणी केलेली आहे.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, या वर्षात नागरिकांवर कोरोना महामारी, चक्रीवादळ अशी अनेक संकटे आली आणि अजूनही अतिवृष्टीच्या रुपाने येत आहेत.गेले सहा – सात महिने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वाहतूक सेवा, शाळा – कॉलेजे, कार्यालये, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, ग्रंथालये – वाचनालये, उद्योग व्यवसाय सारेच ठप्प झाले आहे. ३ जून
रोजी झालेल्या भयानक चक्रीवादळाने तर कोकण वासीयांच्या बागा – घरे सारेच उध्वस्त झाले होते.त्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याचे काम अजूनही सुरू आहे.
मात्र यातून कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याने आणि त्यामुळे अंशतः अनलॉक करण्यात आल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची शेतात उभी असलेली पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी पार उध्वस्त झाला आहे.शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला असून तयार झालेले भात पीक शेतातच पाण्याखाली गेले आहे. ही वस्तुस्थिती स्पष्ट करुन, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार भाई पंडितशेट पाटील यांनी शासनाने आता पंचनाम्याचे फार्स न करता कोकणात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली.
कोकणातील शेतकऱ्यांना पुढील
वर्षभर शासनाने मोफत धान्य द्यावे. तसेच शासनाने शेतकऱ्यांना मोफत वा सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध करून द्यावे. शंभर युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांना पुन्हा शेती करण्यासाठी उमेद मिळण्याच्या दृष्टीने शेती संबंधित सर्व कामांचा मनरेगामध्ये समावेश करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे .