रंगभूमीतील बॅकस्टेज कामगारांना ५० हजारांची मदत करा : अमित देशमुख यांचेकडे शेतकरी कामगार पक्षाची मागणी
शेकापच्या शिष्टमंडळाने केली चर्चा : मंत्र्यांनी दिले मदत करण्याचे आश्वासन
मुंबई (२ नोव्हेंबर) : कोविड -१९ च्या लॉकडाऊन मुळे मुंबई सह राज्यातील सर्व नाट्यगृहे बंद असून नाटकांच्या सादरीकरणावरही बंदी आहे . परिणामी रंगभूमीवरील बॅकस्टेज कामगाराचा रोजगार बुडाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने रंगभूमीतील बॅकस्टेज कामगारांना शासनाने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षातर्फे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमीत देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
शेतकरी कामगार पक्षातर्फे पक्षाचे कार्यालयीन चिटणीस भाई ॲड.राजेंद्र कोरडे, राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई शैलेंद्र मेहता,भाई रामदास जराते,रायगड शेकापच्या महिला नेत्या चित्रलेखा पाटील, ठाणे शहर चिटणीस भाई अनिल म्हात्रे यांच्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्यमंत्री अमीत देशमुख यांची भेट घेऊन त्यांना देण्यात निवेदन देवून याबाबत चर्चा करण्यात आली.
शेतकरी कामगार पक्षातर्फे अमीत देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आधीच हातावर पोट असणाऱ्या बॅकस्टेज कामगार कोविड -१९ च्या लॉकडाऊन मुळे आर्थिकदृष्ट्या पार कोसळून गेलेला आहे. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक परंपरा आणि रंगभूमीचे योगदान लक्षात घेऊन या कामगारांना आधार म्हणून शासनाने त्यांना आर्थिक मदत करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून शासनाने या बॅकस्टेज कामगारांना किमान रुपये ५० हजार रुपये आर्थिक मदत करावी, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली.