विद्यार्थी, शिक्षकांना पूर्वीप्रमाणेच १८ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर करा : आमदार भाई बाळाराम पाटील यांची मागणी

मुंबई (६ नोव्हेंबर): कोरोना संक्रमण काळ असुनही , वाहतुकीची पर्याप्त साधने उपलब्ध नसतानाही प्रत्यक्ष शाळा – कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आवश्यक शालेय कामकाज करीत असलेल्या आणि सलग ७ महिन्यापासून अध्ययन अध्यापन प्रक्रियेत , शालेय कामकाजात गुंतलेल्या विद्यार्थी , शिक्षकांना , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानसिक आराम म्हणून दिवाळीची सुट्टी जाहीर करा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात ज्ञआमदार भाई बाळाराम पाटील यांनी म्हटले आहे की, एप्रिल महिन्यापासून सलग ७ महिने विद्यार्थी , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी ऑनलाईन अध्ययन अध्यापन आणि शालेय कामकाज प्रक्रियेत व्यस्त आहेत. विद्यार्थी ऑनलाईन अध्ययन अध्यापन प्रक्रियेत सहभागी होऊन ३-४ तास शिक्षण घेत आहेत. प्रत्येक दिवशी २-३ तास ऑनलाईन लेक्चर, कोरोना प्रतिबंधक ड्युटी, धान्य वाटप, शालेय कामकाज, ऑनलाईन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संपर्क करून शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेणे अश्या अनेक प्रकारची कामे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी करीत आहेत.

असे असतांनाही दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार शासनाने दिनांक १२नोव्हेंबर ते दिनांक १६ नोव्हेंबर या फक्त ५ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर केलेली आहे. माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्ट्या या ७६ दिवस आहेत. या ७६ दिवसांमध्ये दिवाळीची सुट्टी ही १८ दिवसांची असते. परंतु यावर्षी शासनाने १८ दिवसांऐवजी फक्त ५ दिवसच दिवाळीची सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील ७ महिन्यापासून अध्ययन – अध्यापन – शालेय कामकाजात गुंतलेले विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर यांना १८ दिवसांची दिवाळी सुट्टी नाकारून फक्त ५ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर करणे अन्यायकारक आहे, अशी टीकाही आमदार भाई बाळाराम पाटील यांनी केली आहे.

कोरोना संक्रमण काळात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालेय कामकाजात एकूण योगदान पाहता विशेष बाबत म्हणून फक्त यावर्षी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा विद्यार्थी आणि शिक्षकांप्रमाणेच १८ दिवसांची सुट्टी मिळणे आवश्यक आहे, याबाबतही आपण विचार करावा. आणि शासनाने दिनांक ०५ सप्टेंबरच्या शासन निर्णयात सुधारणा करावी. व विद्यार्थी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १८ दिवसांची सुट्टी तात्काळ जाहीर करावी तसेच इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वी नियोजित परीक्षांचे नियोजन हे १८ दिवसांच्या दिवाळी सुट्टी नंतरच करण्यात यावे, अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी केली आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *