लेनिन नावाचा अजरामर माणूस..

 

लेनिन… जगाने अनुभवलेलं एक बिलोरी स्वप्न… व्यवस्थेच्या मुळावर घाव घालून रशियात समाजवादाचा बीज पेरणारा हाडाचा क्रांतिकारक. क्रांतीच्या स्वप्नांना मेहनतीचे पंख जोडून परिवर्तनाची पहाट आणणारा उगवत्या जगातील लाल सूर्य. विषमतेविरुद्ध लढणाऱ्या जगाच्या कानाकोपऱ्यातील सच्च्या कार्यकर्त्यांच्या हृदयातील स्फुर्तीचा जिवंत झरा. सबंध जगावर आपल्या निस्सीम कर्तृत्वाने छाप पाडणारा एक मोठा माणूस. मृत्यूच्या 96 वर्षानंतरही ज्याच्या प्रेताच्या दर्शनासाठी रोज रांगा लागतात असा लोकप्रियतेचे शिखर गाठलेला रशियाचा अजरामर राष्ट्राध्यक्ष म्हणजे ब्लादिमीर लेनिन.

22 एप्रिल 1870 ला व्होल्गा नदीच्या किनाऱ्यावरील सिम्बीस्क्र गावात एका शिक्षकाच्या पोटी सुसंस्कृत आणि सुखी कुटुंबात लेनिनचा जन्म झाला. सहा भावंडांतील लेनिन हे तिसरे अपत्य होतं. शालेय जीवनात हुशार विद्यार्थी असणाऱ्या लेनिनने आपल्या अखेरच्या शिक्षणातील पदवी चार वर्षाच्या अभ्यासक्रमाची असूनही एका वर्षात पूर्ण केली व सुवर्णपदक पटकावले. 1886 ला त्याच्या वडिलांचे निधन झाले. 1887 ला तिसरा झार याच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून लेनिनचा भाऊ अलेक्झांडर याला अटक होऊन फाशी दिली गेली, तर मोठी बहीण अँना हिलाही तुरुंगवासाची शिक्षा झाली. या घटनेचा मोठा आघात लेनिनच्या मनावर झाला. लेनिन कझान विद्यापीठात कायदा व अर्थशास्त्राचा अभ्यास करत होता. कझान विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी लेनिनच्या भावाला दिलेल्या फाशीविरोधात आंदोलन केल्याने पंचेचाळीस मुलांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. त्यामध्ये लेनिन सुद्धा होता. तेव्हापासून त्याच्याकडे क्रांतिकारकाचा भाऊ म्हणून सर्वजण पाहू लागले व इतर कोणत्याही विद्यापीठात प्रवेश मिळू शकला नाही. पण त्याच्या आईच्या प्रयत्नांमुळे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठातून परीक्षा देण्याची अनुमती मात्र त्याला मिळाली व तो प्रथम क्रमांकाचा विजेता विद्यार्थी ठरला.

1892 ला पदवी मिळाल्यावर त्याने वर्षभर वकिली केली. शेतमजूर व कामगार यांचे दावे लढवले. तत्पूर्वी 1888 पासूनच त्याने विविधांगी वाचन करायला सुरुवात केली होती. त्याने 1888 ला मार्क्सवादाचा अभ्यास सुरू केला. 1890 मध्ये लेनिनने ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’चे रशियन भाषेत भाषांतर केले. पुढे त्याने साम्यवादाचा प्रसार करण्यासाठी स्विझर्लंड, फ्रान्स आणि जर्मनीचा दौरा केला. आयुष्यातील काही वर्ष लेनिन अनेक देशात फिरला. काही वर्ष तुरुंगात तर पंधरा वर्षे त्याला निर्वासित म्हणून जीवन जगावं लागलं. खडतर हाल अपेष्टांचा संघर्ष त्याच्या वाट्याला आला होता. त्यात त्याची उपासमारही होत होती. तरीही त्याने मनाला आणि आणि शरीराला अजिबात थकवा जाणवू दिला नाही. लेनिन अहोरात्र आपल्या क्रांतिकार्यात मग्न राहिला.

1898 ला त्याने आपली जुनी सहकारी मैत्रीण नादेझ्दा कृपस्काया हिच्यासोबत विवाह केला. एका सरकारी अधिकाऱ्याची ती हुशार मुलगी होती. क्रांतिकार्याला तिने भरपूर मदत केली. रशियाबाहेर राहूनही 1912 पासून रशियात प्रसिद्ध होत असलेल्या “प्रावदा” या प्रसिद्ध दैनिकातून लेनिनने विपुल लेखन केले. पहिल्या महायुद्धाच्या काळात तर त्याने युद्धाला विरोध करून रशियातील आपल्या बोल्शेविक गटाला क्रांतिकार्याला प्राधान्य देण्याचे सूचित केले होते. अखेर ऑक्टोंबर 1917 ला लेनिनच्या नेतृत्वाखाली रेड आर्मीने क्रांती यशस्वी केली व झारची सत्ता उलथून पडली. तेव्हा जगाला आश्चर्याचा धक्का बसला. परंतु हे काही सहजासहजी घडलं नव्हतं. तर भांडवलशाही उलथवून पाडणे व समाजवादाचा प्रचार करणे यासाठी समविचारी लोकांच्या शोधात व प्रबोधन करण्यात लेनिनने अनेक वर्षे युरोपभर स्वतःला झोकून दिले होते. त्याला विविध ठिकाणी राहावे लागले. जहाल लेख लिहावे लागले. राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगवास पत्करावा लागला. “रशियातील भांडवलशाहीचा विकास” नावाचा ग्रंथ लिहावा लागला. प्रचंड लेखन व वाचन करावे लागले. मार्क्सवादाला जोड देऊन त्यात सुधारणा करत लेनिनवादावर प्रकाश टाकावा लागला. रशियातील बोल्शेविक पक्षाला मदत करावी लागली. अनेक मित्र जोडावे लागले. शास्त्रीय समाजवाद मांडून त्याला मूर्त स्वरूप देत रशियन राज्यक्रांती घडवून आणावी लागली. तेव्हा झार संपला आणि नवी समाजवादी सत्ता प्रस्थापित झाली.

लेनिनने जगाला आश्चर्यकारक असे कार्य घडवून आणले होते. त्याचे चौफेर ज्ञान इतके होते की, ते पाहून शास्त्रज्ञांनाही त्याचा हेवा वाटत होता. हौस, मौज आणि चैन हे शब्द लेनिनच्या डायरीतच नव्हते. लेनीनचा परिवार अत्यंत काटकसरीने अन्नपदार्थ वापरून साधी कपडे घालणारा होता. जुनी कपडे पुन्हा शिवून वापरणारा होता. एकदा स्त्रीवादी चळवळीतील गाजलेल्या जर्मन नेत्या. क्लारा झेटकीन मास्को येथे लेनिनला भेटायला आल्या होत्या. तेव्हा निर्वासित अवस्थेत असताना जो सूट लेनिनने घातला होता तोच त्या भेटीतही होता. हे पाहून क्लारा झेटकिन आश्चर्याने थक्क झाल्या. लेनिनने चंगळवादी जीवनाचा पूर्ण त्याग केला होता. 1917 च्या क्रांतीनंतर न्यूयॉर्क टाइम्स चा प्रतिनिधी राष्ट्राध्यक्ष लेनिनला भेटायला आला. त्यावेळी त्याच्या समोर समाजवादी रशियाच्या स्वप्नासंबंधी लेनिनने जे भाष्य केले ते ऐकूण त्या पत्रकाराने न्यूयॉर्क टाइम्स मध्ये लेनिनला ‘क्रेमलिन मधला स्वप्नाळू’ संबोधत त्याची खिल्ली उडवणारी एक बातमी दिली. पण तोच पत्रकार जेव्हा लेनिनला पाच वर्षानंतर भेटला, तेव्हा लेनिनने सांगितलेल्या जवळजवळ सगळ्याच गोष्टी सत्यात उतरल्या होत्या हे पाहून त्याने लेनिनचे भरभरून कौतुक केले. “विचाराविना केलेली कृती आंधळी असते आणि कृतीविना केलेला विचार वांझोटा असतो”, हे तत्त्व लेनिनने प्रत्यक्ष जीवनामध्ये अमलात आणले होते.

रशियात जेव्हा लेनिनची सत्ता आली तेव्हा त्याने रशियाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवले. आजारी व्यक्तींना चांगले अन्न, योग्य औषधोपचार व विश्रांती मिळावी याची त्याने काळजी घेतली. लहान मुलांना वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत मोफत अन्न देण्याची व्यवस्था केली. जिथे जाईल तिथे सर्वांसोबत जे उपलब्ध असेल तेच खाणारा, लोकांनी आपल्याला घरी काय खाद्यपदार्थ दिले तर ते मुलांसाठी बालभवनला पाठवणारा लेनिन हा एक कर्तव्यदक्ष राष्ट्राध्यक्ष होता. लेनिनने स्वतःच्या पत्नीला शिक्षण उपमंत्री करून विविध शैक्षणिक योजना राबवल्या. हातात घेतलेल्या कामात मन ओतायची कला लेनिनजवळ जास्त होती. सर्वांना पाव मिळाल्याशिवाय कोणालाच केक मिळणार नाही हे रशियन कम्युनिस्टांचे त्यावेळचे ब्रीदवाक्य होते. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी लेनिनने खूप प्रयत्न केले. मंत्र्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना सारखेच जेवण मिळेल याची व्यवस्था त्याने केली. लेनिनने अत्यंत प्रभावशाली उपक्रमांची आखणी करून रशियाला आमूलाग्र बदलून टाकले.

सैद्धांतिक कार्याची व्यापक व्यावहारिक कार्याशी सांगड घालणाऱ्या लेनीनचे ज्ञान विश्वकोशाच्या तोडीचे होते. लेनिनच्या राहत्या घरी प्रत्येक खोलीत पुस्तकाचे कपाट तर होतेच पण क्रेमलिनमधल्या अभ्यासिकेत खच्चून भरलेल्या 6 तिजोऱ्या पुस्तके होती. शिवाय त्याच्या खाजगी ग्रंथालयात दहा हजारापेक्षा जास्त पुस्तके व नियतकालिके होती. मार्क्स व एंगल्सचे ग्रंथ लेनीनचे कायमचे पाठ्यग्रंथ तर होतेच, शिवाय त्याच्या दररोज उशाला सोव्हीयत प्रजासत्ताकाचे ‘कायद्याचे पालन करा’ ही छोटीशी पुस्तिका ठेवलेली असायची. लेनिन रात्रीचे दोन वाजेपर्यंत आपल्या अभ्यासिकेत बसून अभ्यास करायचा तर लगेच पुन्हा सकाळी सहा वाजता अभ्यासिकेत परतायचा. सरकार हाती आल्यानंतर लेनीनने सरकारी कर्मचाऱ्यांना अनुभवांनी समृद्ध व्हा व कार्यक्षमतेने दप्तर दिरंगाई टाळून काम करा, असा संदेश दिला होता. अधिकार्‍यांना त्याने सक्त आदेश दिला होता की, जनतेच्या लेखी तक्रारी 24 तासाच्या आत तर तोंडी तक्रारी 48 तासांच्या आत माझ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तसेच अपराध्यांना अटक करताना सुट्टीच्या दिवशी अटक करावी व कामाच्या दिवशी त्याला सोडावे म्हणजे त्याच्या कामात व्यत्यय येणार नाही. असाही त्याचा आदेश असायचा. अशा या असाधारण शिस्तबद्ध पुरुषाने लाचलुचपत, दप्तर दिरंगाई, दुसऱ्याबद्दल बेपर्वाईचे वर्तन हे सर्वात मोठे गुन्हे ठरवून देशाच्या कायद्यावर कुरघोडी करणाऱ्या, त्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या, व्यक्तिगत फायद्यासाठी आपल्या स्थानाचा उपयोग करून घेणाऱ्या व्यक्तींबद्दल लेनिनने कधीच दया दाखवली नाही. असे कोणतेही क्षेत्र नाही की लेनीनने त्याबाबत मार्गदर्शन केले नाही. अगदी लिहिणाऱ्यांना ही तो नेहमी बजवायचा की लिहिणार्‍यांनी बुद्धिजीवी वर्गाऐवजी श्रमिक जनता, जनमानस, सर्वसामान्य कामगार, शेतकरी यांच्यासाठी लिहावं. लेनीन म्हणत असे की केवळ कायदे करून भागत नाही तर सरकारच्या सनदा, आम कामगार जनतेला विशद करून सांगितल्या पाहिजेत आणि त्यांची सक्त अंमलबजावणी झाली पाहिजे. अशा शिस्तीत त्याने रचनात्मक काम केल्यामुळेच रशिया महासत्तेकडे जाऊ शकला.

लेनिन म्हणजे देशोदेशींच्या सीमा ओलांडून साम्यवादाचा विचार प्रत्यक्षात आणणारा आणि भगतसिंग सारख्या तरुणांना आकर्षित करणारा क्रांतीचा प्रणेता होता. त्याने जगातील पहिली साम्यवादी क्रांती घडवून आणली. जगभरातील शोषितांच्या, कामगारांच्या लढ्याचे तो प्रेरणास्थान होता. मार्क्सचा वरकड मूल्याच्या सिद्धांताचा अभ्यास करून तो प्रत्यक्ष प्रशासनात आणणारा आदर्श राज्यकर्ता होता. त्याने 1921 मध्ये कामगार कायदा व सिव्हिल कोडनुसार नोकरदार, कामगार, शेतमजूर यांचे केलेले वर्गीकरण आणि त्यासंबंधी केलेली नियमावली पुढे जगभरात मान्यता पावली. आज मध्यमवर्ग सरकारी, निमसरकारी, खाजगी संस्थांमध्ये काम करतो. त्यांच्या कामाचे ठराविक तास ठरलेले असतात. याची नियमावली लेनिन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या लढ्यानंतर जगभर ठरवली गेली. त्यापेक्षा जादा काम केल्यास ओव्हर टाईम, राहायला क्वार्टर्स, घर मालकाला द्यायला कंपनीकडून घरभाडे, प्रवासभत्ता, हक्काच्या सुट्ट्या, मेडिकल बील, फंड, ग्रँज्युएटी हे सर्व लेनिन व त्याच्या कॉमरेडस्नी दिलेल्या लढ्यानंतरच यशस्वी झालेले आहे. जगभर या मागण्यांसाठी कामगारांचे लढे उभा राहिले. मोठ्या स्वरूपात आंदोलने झाली. तेव्हा आज आपण सुखाचे चार घास घेऊ शकतोय. बँक, शिक्षक, प्राध्यापक, रेल्वे, सरकारी कर्मचारी यांच्या मागण्यांचा मोर्चा आजही लाल बावट्याच्या सावलीतच निघतो. तो लालबावटा याच ब्लादिमीर लेनिनने जगाला दिला.

1922 साली मार्च महिन्यात लेनिनला पक्षाघाताचा पहिला झटका आला. त्यातून तो सावरतो न सावरतो तोपर्यंतच डिसेंबरला त्याला दुसरा झटका आला. त्यामुळे डाव्या बाजूचे संपूर्ण शरीर निकामी झाले. तरीही या माणसाने आजारपणातही आपले काम सुरूच ठेवले. “दररोज किमान अर्धा तास काम करण्याची परवानगी मिळाली नाही तर मी कोणतेही औषधोपचार करून घेणार नाही.,” असे त्यांनी डॉक्टरांना सांगितले होते. प्रचंड काम, प्रचंड लिखाण, प्रचंड वाचन आणि लोकहित याकडेच लेनिनने आयुष्यभर लक्ष दिले. शेवटी 25 जानेवारी 1924 ला पक्षाघाताने लेनिनचे निधन झाले. लेनिन इतका लोकप्रिय होता की, त्याचे शव पाहण्यासाठी अलोट गर्दी जमली आणि त्या दिवसापासून ती गर्दी आजही तशीच आहे. म्हणून रशियन सरकारने लेनिनच्या प्रेतावर रासायनिक प्रक्रिया करून लेनिनचे शव रशियातील मध्यवर्ती लाल चौकात आजही जपून ठेवले आहे…

साभार : मारुती शिरतोडे

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *