भारतीय शेतकरी कामगार पक्ष

८ वे अधिवेशन – पंढरपूर

दि. २९, ३०, ३१ मे व १ जून १९६५

राजकीय ठरावाचा मसुदा

 

आंतरराष्ट्रीय परिस्थिती व परराष्ट्रीय धोरण

१९६१ साली शेतकरी कामगार पक्षाच्या जो राजकीय ठराव पास केला , त्यात आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि परराष्ट्रीय संबंध याबाबत विवेचन करताना असे म्हटले होते की , “ गेल्या १४ वर्षांचा कालखंड जागतिक राजकारणात शीतयुद्धाचा काल म्हणूनच मानला जात आहे . जुनी साम्राज्यवादी , भांडवलदारी व वसाहतवादी चौकट टिकवून धरणारी अमेरिका , इंग्लंड , फ्रान्स इ . राष्ट्रे एका बाजूला तर समाजवादाचे निशाण घेऊन जाणारे रशिया आदी कम्युनिस्ट राजवटी असलेले देश दुसऱ्या बाजुला असे या शीतयुद्धाचे स्वरूप आहे .'' “ या शीतयुद्धाच्या काळात अनेक नवी राष्ट्र उदयास येत आहेत . म्हणून नव्याने स्वतंत्र झालेल्या या राष्ट्रांच्या धोरणास या कालखंडात महत्त्व येणे क्रमप्राप्त आहे . " १९६१ नंतरचा चार वर्षांचा काल आंतरराष्ट्रीय जगतात अनेक दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे . या काळात आंतरराष्ट्रीय क्षेत्रात इतक्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत , की त्यामुळे भांडवलशाही , समाजवादी व नव्याने स्वतंत्र झालेली राष्ट्रे या सर्वांपुढेच अनेक जटिल समस्या उभ्या राहिल्या आहेत . या समस्यांची सोडवणूक कशी होणार आहे यावरच जागतिक शांतता , सुख आणि समृद्धी अवलंबून आहे . १९६२ च्या ऑक्टोबरमध्ये चीनने भारतावर उघडउघड आक्रमण केले ; आणि भारताचा हजारो चौरस मैल प्रदेश आपल्या ताब्यात ठेवून एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली . क्युबामधील जनतेने समाजवादाच्या दिशेने वाटचाल सुरू केल्यामुळे भडकून गेलेल्या अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी क्युबाची राजवट निकालात काढून क्युबाचे स्वातंत्र्य गिळंकृत करण्याचा घाट घातला . परंतु सोव्हिएट रशियाने छातीचा कोट करून आपली सर्व ताकद क्युबन जनतेच्या संरक्षणासाठी उभी केली . अणुयुद्धाचा भडका उडून त्यात सर्व जगाची आहुती पडण्याचा प्रसंग उद्भवला असताही योग्य क्षणी समझोता झाला . समाजवादी क्युबाला जीवदान मिळालेच ; परंतु जागतिक युद्धाचा भडका टळला . अण्वस्त्रांचे प्रयोग करण्याबाबत मर्यादित स्वरूपात जागतिक करार झाला ; परंतु जागतिक शांततेला पोषक अशा या करारावर चीनने सही करण्याचे नाकारले . युरोपियन बाजारपेठ उभी करण्याचा प्रयत्न केला गेला . इंग्लंडच्या जागतिक हितसंबंधाचे संरक्षण करण्याच्या प्रश्नावर या प्रयोगाला पूर्णपणे मूर्त स्वरूप आले नाही . तथापि सामुदायिक बाजारपेठेचा पाया मर्यादित स्वरूपात का होईना घातला गेला आहे . या ४ वर्षांच्या काळात सोव्हिएट रशिया , अमेरिका व इंग्लंड या राष्ट्रांव्यतिरिक्त फ्रान्स व चीन या दोन राष्ट्रांनी अणुबाँबचे स्फोट करून आपणही अण्वस्त्रांचे उत्पादन करू शकतो , हे सिद्ध केले आहे . नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांनी एकत्र यावे , परस्पर सहकार्य वाढवावे म्हणून बांडुंग परिषदेने प्रयत्न केले होते . परंतु चीनने भारतावर आक्रमण केल्यामुळे बांडुंग परिषदेच्या मूलभूत भूमिकेलाच तडा गेला आज या नवोदित स्वतंत्र राष्ट्राराष्ट्रांत पूर्वीचे परस्पर सहकार्याचे धोरण व मतैक्य दिसून येत नाही . आफ्रिकेतील अरब राष्ट्रांची एकजूट करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत . आग्नेय आशियाई राष्ट्रातही पूर्वीचे मतैक्य राहिले नाही . एवढेच नव्हे , तर गेल्या चार वर्षांत इजिप्त व इस्रायल , भारत व पाकिस्तान , इंडोनेशिया व मलेशिया या राष्ट्रातील संघर्ष राजनैतिक पातळी ओलांडून युद्धाच्या पातळीवर पदार्पण करण्याचा धोका निर्माण झाला आहे . आग्नेय आशियातील लाओस , कंबोडिया व व्हिएटनाम या देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून जे प्रयत्न झाले ते यशस्वी झालेले नाहीत . याउलट व्हिएटनाममध्ये अमेरिकेने चालविलेल्या हस्तक्षेपाविरुद्ध तेथील जनतेने गनिमी उठाव केला आहे . अमेरिकेचे व्हिएटनाममधील वर्तन कोणत्याही सबबीवर समर्थनीय नसताही व्हिएटनाम जनतेचा हा उठाव चिरडून टाकण्यासाठी राक्षसी उपायांचा अवलंब अमेरिका करत आहे . इंग्लंड व अमेरिका या दोन देशांतही आर्थिक पेचप्रसंगांचे दृश्य दिसून येत आहे . पौंडांचे संरक्षण करण्यासाठी धावून आलेल्या अमेरिकेचा डॉलरदेखील अडचणीत येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे . या औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या राष्ट्रांतून भांडवलनिर्यातीला फार मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे . आता त्यांचा मोर्चा ऑस्ट्रेलिया खंडाकडे वळला आहे . औद्योगिक व तांत्रिकदृष्ट्या पुढारलेल्या राष्ट्रातील भांडवल व इतर युरोपीय देशांतील बेकार मनुष्यबळ यांची निर्यात संघटित करण्याचे प्रयत्न चालू आहेत . गेल्या चार वर्षांतील या घटना जशा महत्त्वाच्या आहेत तशाच समाजवादी राष्ट्राराष्ट्रांत औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्राराष्ट्रांत राजनैतिक बदल घडवून आणणाऱ्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत . दुसऱ्या महायुद्धानंतरच्या पहिल्या पंधरा वर्षांत अमेरिकेकडे भांडवलदारी राष्ट्रांचे निर्विवाद नेतृत्व होते ; किंबहुना कम्युनिझमविरुद्ध उभारण्यात आलेल्या जागतिक आघाडीचे नेतृत्व सर्व जगाने आपणाकडे दिले आहे असा अमेरिकेचादावा होता . पण गेल्या चार वर्षांत ज्या घटना घडल्या आहेत त्या पाहता अमेरिकेचा हा दावा खोटा ठरत आहे . पश्चिम जर्मनी , फ्रान्स व जपान या राष्ट्रातील भांडवलदारांनी औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने वाढ घडवून आणली असल्यामुळे या राष्ट्रांनी अमेरिकेच्या राजनैतिक , आर्थिक व लष्करी नेतृत्वाला आव्हान देण्यास व प्रसंगविशेषी स्पर्धा करण्यास सुरुवात केली आहे . त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने नाटो , सिटो व सेन्टो अशा ज्या लष्करी करारसंघटना उभ्या केल्या होत्या , त्यांना तडे जाऊ लागले आहेत . भांडवलदारी राष्ट्राराष्ट्रांतील हे संघर्ष तीव्र होऊ लागले आहेत . पण या संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवणे जरूर आहे . अमेरिका व इतर सर्वच भांडवलदारी राष्ट्रातील भांडवलशाही अतिशय धूर्त व कावेबाज असल्याने त्यांच्यामधील परस्परसंघर्ष काही ठराविक मर्यादेबाहेर जाऊन देण्याचा प्रयत्न करीत आहे . तथापि याउलट समाजवादी राष्ट्राराष्ट्रांतही संपूर्ण एकजूट आहे असे नाही . सोव्हिएट रशिया व चीन या दोन राष्ट्रांमध्ये समाजवादाच्या उभारणीबाबत व इतर राजनैतिक प्रश्नांवर गेल्या तीन वर्षांत चालू असलेल्या वादामुळे समाजवादी गोटात दोन तट पडले आहेत . समाजवादी राष्ट्राराष्ट्रांत अंतर्गत संघर्ष असू शकतात हे मान्य करूनही या संघर्षावर मात करून समाजवादी राष्ट्रांची एकजूट सांधणे अतिशय महत्त्वाचे आहे . समाजवादाच्या विकासासाठी व बळकटीसाठी या एकजुटीची अतिशय गरज आहे ही गोष्ट चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला व सरकारला समजत नाही . सोव्हिएट रशिया व चीन यांच्यामध्ये चालू असलेला संघर्ष फक्त जागतिक समाजवादी चळवळीच्या पुढारीपणासाठी आहे असे म्हणून भागणार नाही . हा संघर्ष अधिक मूलभूत असल्याने त्याचा विचार या संदर्भात केला गेला पाहिजे . समाजवादी राष्ट्रांचे परस्परसंबंध त्या त्या राष्ट्रांतील समाजवादी समाजाची उभारणी , जागतिक समाजवादी चळवळीचे संघटन , समाजवादी राष्ट्रातील आर्थिक विकासाचे प्रश्न , समाजवादी राष्ट्राराष्ट्रांतील श्रमविभागणीची या अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर सोव्हिएट रशिया व चीन यांचे मतभेद स्पष्ट होत आहेत . तथापि चीनने मात्र हा वाद के वळ राजनैतिक मतभेदापर्यंतच नव्हे , तर सरहद्दीचे तंटे आंतरखंडीय व आंतरवंशीय झगडे एवढ्या पातळीपर्यंत रेटण्याचा प्रयत्न चालू ठेवला . त्यामुळे समाजवादी म्हणविणाऱ्या या दोन राष्ट्रांतील हा वाद संकुचित राष्ट्रवाद , गटबाजी व शिवीगाळीच्या पातळीवर पोचला आहे . गेल्या चार वर्षांतील वर नमूद केलेल्या घटना , वेगवेगळ्या राष्ट्रांच्या हालचाली व त्यांनी घेतलेले पवित्रे , त्यांचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर होणारे परिणाम यांचा साकल्याने विचार केला तर शेतकरी कामगार पक्षाने आंतरराष्ट्रीय परिस्थितीसंबंधी पूर्वी केलेले निदान आज पुन्हा तपासण्याची गरज निर्माण झाली आहे हे लक्षात घेतले पाहिजे . एक तपापूर्वी साम्राज्यवादी राष्ट्रे व सोव्हिएट रशियाच्या नेतृत्वाखाली समाजवादी राष्ट्रे यांच्या धोरणावर आंतरराष्ट्रीय हालचाली घडत होत्या . अनेक राष्ट्रे परतंत्र असल्याने त्यांचा आवाज आंतरराष्ट्रीय राजकारणात ऐकू येत नव्हता . तथापि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या वीस वर्षांच्या काळात आशिया , आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील अनेक परतंत्र राष्ट्र स्वतंत्र झाल्याने आपले भवितव्य ठरविण्याचा अधिकार या राष्ट्रांतील कोट्यवधी जनतेला मिळाला . स्वतंत्र झालेल्या या राष्ट्रांची संख्या शंभराच्या वर गेली असल्याने जगाचे राजकारण एवढ्या राजधान्यांतून खेळले जात आहे . सध्याचा काळ हा नवीन घडणीचा काळ आहे . आकाराने व लोकसंख्येने लहानमोठी असलेली ही राष्ट्रे लष्करी सामर्थ्याच्या दृष्टीने दुबळी असणे स्वाभाविक आहे . आपले स्वातंत्र्य टिकविणे व आर्थिक विकास घडवून आणणे हे दोन प्रश्न त्यांना महत्त्वाचे वाटतात . साहजिकच या प्रत्येक राष्ट्रातील राज्यकर्ते आपणास सोयीस्कर अशी धोरणे आखण्याचा प्रयत्न करीत आहेत . या सर्व राष्ट्रांतून अमेरिका , इंग्लंड , फ्रान्स इत्यादी राष्ट्रांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत . नवे आर्थिक दुवे जोडण्याचा प्रयत्नही केला जातो . आपल्या आर्थिक हितसंबंधांना धक्का पोचतो आहे असे दिसताच अमेरिका आदी भांडवलदारी व साम्राज्यवादी राष्ट्र या स्वतंत्र राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारात असमर्थनीय हस्तक्षेप करू लागतात . नव्याने स्वतंत्र झालेल्या या राष्ट्रांपुढे भांडवलदारी पद्धतीचा अवलंब करायचा , की समाजवादी पद्धतीचा अंगीकार करायचा हा प्रश्न प्रकर्षाने तेवत आहे . ही राष्ट्र कोणत्या धोरणाचा स्वीकार करतात यावर तेथील जनतेची भूमिका ठरत असते . त्यांनी भांडवलदारी पद्धतीचा अवलंब केल्यास ते धोरण सोडण्यास व समाजवाद आणि जागतिक शांतता यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी राज्यकर्त्यांना भाग पाडण्यासाठी तेथील जनतेला लढ्याचा मार्ग चोखाळावा लागतो . त्यामुळे ही नवोदित राष्ट्रे कोणती अर्थव्यवस्था , समाजपद्धती , शासनव्यवस्था स्वीकारतात हा जागतिक राजकारणाच्या दृष्टीने आदी भांडवलदारी राष्ट्रे आपले आर्थिक हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रांना आपल्या दावणीला व लष्करी करार संघटनांना बांधण्याचा प्रयत्न करीत असतात . पण या स्वतंत्र राष्ट्रांना मदत करण्यासाठी सोव्हिएट रशिया व इतर समाजवादी राष्ट्र कर्तव्यबुद्धीने पुढे येत असल्याने अमेरिका आदी भांडवलदारी राष्ट्रांना आपले राजकारण यशस्वी करण्यासाठी अनेक डावपेच , दहशत व प्रसंगविशेषी प्रत्यक्ष हस्तक्षेप अशा मार्गांचा अवलंब करावा लागत आहे . याउलट ही नवोदित स्वतंत्र राष्ट्र साम्राज्यवादी व महत्त्वाचा प्रश्न आहे . अमेरिका भांडवलदारी राष्ट्रांच्या जाळ्यात पुन्हा सापडू नयेत व त्यांच्या आर्थिक विकासाची दिशा ठरविण्याचा हक्क त्यांना लाभावा म्हणून सोव्हिएट रशिया व इतर समाजवादी राष्ट्रे चिकाटीचा प्रयत्न करीत आहेत . या नवोदित राष्ट्रातील राज्यकर्ते कोणत्या विचाराचे आहेत याकडे लक्ष न देता ते अमेरिकन वर्चस्वाखालून दूर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत , ही गोष्ट महत्त्वाची समजून त्यांना साह्य देण्याचा समाजवादी राष्ट्रे प्रयत्न करीत आहे . त्यामुळे जगातील कोणत्याही राष्ट्रातील अंतर्गत प्रश्न असो अगर राष्ट्रातील परस्परसंबंध असोत , त्या त्या ठिकाणी , एका बाजूने अमेरिका , इंग्लंड आदी राष्ट्र व दुसऱ्या बाजूने रशिया व इतर समाजवादी राष्ट्रे यांचा काही ना काही संघर्ष येत असतोच . हा संघर्ष केवळ दोन राष्ट्रगटांमधील नसून दोन भिन्न समाजपद्धतीमधील झगडा आहे . हा संघर्ष आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील मूलभूत प्रश्न आहे . आणि या संघर्षात कोणत्या गटाची किती प्रगती अगर पीछेहाट होते यावरच आंतरराष्ट्रीय संबंधांचे भवितव्य अवलंबून आहे . या संघर्षात अमेरिकन राज्यकर्ते अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील अंगभूत गुणधर्माप्रमाणे वागत आहेत . नवोदित स्वतंत्र व स्वयंपूर्ण होऊ देणे म्हणजे अमेरिका आदी भांडवलदारी राष्ट्रांचे जागतिक वर्चस्व नष्ट होणे होय , हे अमेरिका पूर्णपणे ओळखून आहे . समाजवादी राष्ट्रांचे वर्चस्व वाढू नये यासाठीही अमेरिकेचा प्रयत्न चालू आहे . हे साध्य करण्यासाठी अमेरिकेने कम्युनिझमविरोधी आघाडीचा झेंडा उभारून , कम्युनिझमपासून जगाचे संरक्षण करण्याचे ऐतिहासिक कार्य अमेरिकेने खांद्यावर घेतले आहे असा दावा ती मांडत आहे . या कार्याचा एक भाग म्हणून अमेरिकेने समाजवादी राष्ट्रांच्या भोवती लष्करी तळ उभारले आहेत ; निरनिराळ्या लष्करी करार संघटना उभ्या केल्या आहेत ! आणि या संघटनांमध्ये सामील झालेल्या राष्ट्रावर एक प्रकारे आपली हुकमत प्रस्थापित केली आहे . ही हुकमत पक्की करण्यासाठी अणू - अस्त्रांची मक्तेदारी आपणाकडे ठेवली आहे . काही काळ इंग्लंड , फ्रान्स , पश्चिम जर्मनी व जपान या औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रांनी अमेरिकेला आव्हान दिले नव्हते ; परंतु अमेरिकेच्या हुकमतीखाली या राष्ट्रांतील भांडवलदारांची गळचेपी होऊ लागल्याबरोबर अमेरिकेच्या हुकमतीला आव्हान मिळू लागले आहे . फ्रान्सने अण्वस्त्रांची निर्मिती करून अमेरिकन हुकमतीविरुद्ध बंड उभारले . अमेरिकन गोटातील राष्ट्राराष्ट्रांतील अंतर्गत कलह वाढतच आहेत ; आणि हे कलह मिटविण्यासाठी कम्युनिझमचा धोका वाढत असल्याची हाकाटी अमेरिकेने सुरू ठेवली आहे . ज्या ज्या राष्ट्रात अमेरिकन वर्चस्वाविरुद्ध उठाव होत आहे तेथे तो उठाव कम्युनिस्टांनीच घडवून आणला आहे असे सोयीस्कर समीकरण करून त्या देशात अमेरिका आपल्या सर्व सामर्थ्यानिशी हस्तक्षेप करीत सुटली आहे ! कांगो , दक्षिण व्हिएटनाम वगैरे अनेक उदाहरणे देता येतील . आपल्या लष्करी हस्तक्षेपातून युद्धाचा भडका उडेल याचीदेखील अमेरिकेला पर्वा वाटेनाशी झाली आहे . कम्युनिझमविरुद्ध लढण्याच्या नावाखाली अमेरिकन वर्चस्व प्रस्थापित करणे आणि आपल्या छावणीतील अंतर्गत संघर्षावर मात करणे , या दोन गोष्टी अमेरिकेच्या आजच्या धोरणाचा गाभा आहे . नवोदित स्वतंत्र राष्ट्राराष्ट्रांत परस्परसहकार्य व एकोपा वाढणे म्हणजेदेखील आपल्या वर्चस्वाला आव्हान आहे असे अमेरिकेला वाटत आहे . आणि म्हणूनच अशा राष्ट्रांतून जेथे संघर्ष असतील तेथे ते अधिक चिघळण्यासाठी व आपले बोट शिरकविण्यासाठी अमेरिका प्रयत्न करीत आहे . युरोपातील राष्ट्राराष्ट्रांतील संघर्षांनासुद्धा चिथावणी देण्याचे कार्य अत्यंत कौशल्याने अमेरिका पार पाडीत आहे . त्याचबरोबर आपल्या आर्थिक मदत योजनांचा वापर अमेरिका आपल्या साम्राज्यवादी राजकारणासाठी धूर्तपणे करीत आहे . दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम युरोपमधील राष्ट्र पंगू झाली होती . त्यांचे पुनरुत्थान करण्याच्या नावाखाली अमेरिकेने त्यांना मार्शल योजनेच्या दावणीला करकचून बांधले आणि गेली वीस वर्षे पश्चिम युरोपमधील राष्ट्रे अमेरिकेने आपल्या हुकमतीखाली ठेवली . तथापि हा प्रयत्न अमेरिकेच्या अपेक्षेप्रमाणे फलद्रूप झालेला नाही . ही राष्ट्र युद्धपूर्वकाळात एका विशिष्ट औद्योगिक पातळीला पोचलेली ; परंतु युद्धामुळे उद्ध्वस्त झालेली राष्ट्र असल्याने वैज्ञानिक , तंत्रज्ञ व यंत्रज्ञ यांची तेथे वाण नव्हती . या राष्ट्रांना थोडाफार हातभार लागल्याबरोबर पश्चिम युरोपमधील कारखानदारांनी आपले उद्योगधंदे पूर्ववत उभारले . युद्धपूर्वकाळात बेकारीचा प्रश्न या राष्ट्रांतून तीव्र झाला होता ; तोही प्रश्न थोड्याफार प्रमाणात सुटू लागला . राष्ट्रवाद आणि शांततेची हमी यामुळे या राष्ट्रांतील उद्योगधंदे झपाट्याने वाढत गेले ; आणि या राष्ट्रातील उद्योगपती अमेरिकन उद्योगपतींशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आले . नवोदित स्वतंत्र राष्ट्रांना मदत देताना अमेरिका आपले पाय अधिकाधिक कसे पसरता येतील असे धोरण आखू शकली . ही नवोदित राष्ट्र आपल्या बाजारपेठा कशा होतील व जड आणि मूलभूत उद्योगधंदे तेथेकसे निघणार नाहीत या बेतानेच अमेरिकेची आर्थिक मदत या राष्ट्रांना देण्यात येते . त्या राष्ट्रांतील अर्थव्यवस्था स्वावलंबी न होता अमेरिकेवर सातत्याने कशी अवलंबून राहील हेच अमेरिकन मदतीचे मुख्य सूत्र आहे . पी . एल . ४८० सारखे कायदे करून या राष्ट्रांना अन्नधान्याची निर्यात करणे , जुजबी उद्योगधंदे काढण्यासाठी मदत करणे अमेरिकेला फायदेशीर वाटत आहे . अमेरिकन मक्ते दार उद्योगपतींना या राष्ट्रांतून उद्योगधंदे उभारण्यासाठी सर्वप्रकारच्या सवलती मिळवून देणे आणि या राष्ट्रांतून अमेरिकनधार्जिण्यांची लॉबी संघटित करणे यासाठी अमेरिका धडपडत असते . सारांश , आपले वर्चस्व टिकविण्यासाठी अमेरिकेने जुने साम्राज्यवादी उपाय नव्या पद्धतीने अवलंबण्यास सुरुवात केली आहे . तंत्र बदलले असले तरी साम्राज्यवादी धोरण कायमच आहे . जर्मनीचे एकीकरण , जपानशी शांतता करार , संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेचे डावपेच , चीनला युनोमध्ये प्रवेश देण्याचा प्रश्न , फोर्मोसामध्ये चेंग - कै शेकच्या नकली राजवटीला पाठिंबा देण्याचे धोरण , कांगो , दक्षिण व्हिएटनाम , दक्षिण कोरिया , लाओस आदी राष्ट्रातील अमेरिकन धार्जिण्या गटांचे राजकारण या सर्व प्रकरणी अमेरिकेचे वर नमूद केलेले धोरण उघड्यानागड्या स्वरूपात स्पष्ट झाले आहे . अमेरिकेचे हे धोरण अलीकडे अधिकाधिक उघडे पडत असून दक्षिण व्हिएटनामच्या प्रकरणात तर अमेरिकेच्या धोरणाचे अक्षरश : दिवाळे वाजले आहे . हरप्रकारच्या डावपेचांचा अवलंब करूनही लोकशाहीचा बुरखा सांभाळणे अमेरिकेला कठीण होत आहे . शेवटी , आपले वर्चस्व टिकविण्याचा एकमेव मार्ग म्हणून लष्करी उपायांचा अवलंब अमेरिका करीत आहे . आणि नेमकी याच ठिकाणी सोव्हिएट रशियाची ताकद अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याला आव्हान देऊन उभी राहिली आहे व राहत आहे . अमेरिकेने आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा जेथे जेथे प्रयत्न केला तेथे तेथे स्वातंत्र्यप्रिय जनतेने अमेरिकन वर्चस्वाविरुद्ध प्राणपणाने लढा दिला आहे . अशा या स्वातंत्र्यप्रिय जनतेच्या पाठीमागे सोव्हिएट रशियाने आपली ताकद उभी करून त्या जनतेच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले . इजिप्त , भारत , क्युबा ही त्याची उदाहरणे आहेत . नवोदित स्वतंत्र राष्ट्रे आपल्या पायावर उभी राहावीत म्हणून तेथे जड व मूलभूत उद्योगधंदे उभारण्यासाठी रशियाने या राष्ट्रांना विनाअट भरीव आर्थिक व तांत्रिक मदत दिली आहे . समाजवादी राष्ट्रांच्या या धोरणामुळे भांडवलशाही बाजारपेठेची मक्तेदारी नष्ट होऊ लागली आहे . भारताच्या बोकारो कारखान्यासाठी अमेरिकेने मदत करण्याचे नाकारले ; परंतु रशियाने सदर कारखाना उभारण्यासाठी निरपेक्ष मदत देण्याचे मान्य करून अप्रगत राष्ट्रांनी आपल्या आर्थिक विकासासाठी येथून पुढे अमेरिकेच्या तोंडाकडे पाहण्याचे मुळीच कारण नाही हे दाखवून दिले आहे . नवोदित स्वतंत्र राष्ट्रांचे स्वातंत्र्य , आर्थिक विकास व जागतिक शांतता यासाठी सोव्हिएट रशियाने या नव्या राष्ट्रांना अमोल साह्य केले आहे . सोव्हिएट रशियाच्या या धोरणाला समाजवादी राष्ट्रांनी संपूर्ण साथ दिली होती आणि समाजवादी राष्ट्रांची एकजूट , परस्परसहकार्य व ताकद या गोष्टी जागतिक शांततेचा व प्रगतीचा आधार बनल्या होत्या . परंतु या धोरणाला चीनच्या कम्युनिस्ट सरकारने सुरुंग लावला आहे . चीनने केवळ समाजवादी राष्ट्रांच्या एकजुटीला भगदाड पाडले आहे असे नव्हे , तर स्वतंत्र राष्ट्रांच्या एकजुटीवर , परस्परसहकार्यावरही ' मूले कुठार ' घातला आहे . सर्व जगभर समाजवादाची वाटचाल विषमगतीने होणे स्वाभाविक आहे व ती प्रगती समाजवादी राष्ट्रांच्या परस्परसहकार्याने घडवून आणण्याच्या रशियाच्या आणि इतर समाजवादी राष्ट्रांच्या मार्गात चीनने विघ्न उपस्थित केले आहे . समाजवादी राष्ट्रांत आज जे मतभेद आहेत त्यावरून समाजवादी राष्ट्राराष्ट्रांतही अंतर्गत संघर्ष निर्माण होऊ शकतात हे मान्य केले पाहिजे ; परंतु हा संघर्ष एकाच समाजव्यवस्थेच्या प्रस्थापनेचा मार्ग ठरविण्याबद्दलचा असल्याने त्यावर मात करून ही एकजूट टिकविणे जरूर असताना , चीनचे कम्युनिस्ट सरकार आतताई मार्गाचा अवलंब करून समाजवादाच्या उभारणीला अडथळे निर्माण करीत आहे . साम्राज्यवादी व समाजवादी अशा दोन्ही गोटांत हे अंतर्गत संघर्ष असले तरी या संघर्षाचे स्वरूप पूर्णपणे भिन्न आहे . त्या त्या देशातील जनता ही समाजवादाचा आधार आहे ; तर या जनतेची पिळवणूक हीच साम्राज्यवाद्यांचा व भांडवलशाहीचा मुख्य आधार आहे . अशा या जागतिक राजकारणात भारतातील जनता कोणती भूमिका घेणार आहे या गोष्टीला अतिशय महत्त्व आहे . भारत देश हा एक मोठा देश आहे म्हणून नव्हे ; परंतु साम्राज्यशाहीशी सतत १०० वर्षे झगडा करून स्वतंत्र झालेल्या व साम्राज्यशाहीचे अतिशय कटू अनुभव आलेल्या या देशाने साम्राज्यशाहीविरोधी भूमिकेचा बालेकिल्ला व आशास्थान बनावे ही जगातील सर्वच पुरोगामी जनतेची भावना होती . बांडुंग परिषदेच्या वेळी भारत हा नवोदित स्वतंत्र राष्ट्राचे पुढारीपण करू शकेल अशा अपेक्षा निर्माण झाल्या होत्या . तथापि या राष्ट्रांचे पुढारीपण करणे तर दूरच ; परंतु भारत देशच आज खरोखरी एकाकी पडला आहे . चीनने भारतावर आक्रमण केले आहे . पाकिस्तान व चीन यांची भारताविरुद्ध गट्टी निर्माण झाली आहे . पाकिस्तानने भारताच्या भूप्रदेशावर उघडउघड आक्रमण करून कच्छमध्ये जवळजवळ युद्धाचे वातावरण निर्माण केले आहे . सिलोनमधील हिंदी नागरिकांच्या प्रश्नावर सिलोन व भारत यांची धुसपूस चालू आहे . नेपाळ , ब्रह्मदेश या शेजारी राष्ट्रांशी भारताचे जेवढे सलोख्याचे संबंध असणे जरूर आहे तेवढे ते राहिलेले नाहीत . गेल्या फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानने कच्छच्या रणात उघड उघड आक्रमण केले असताही पाकिस्तानच्या या कृत्याचा आफ्रिका व आशिया खंडांतील स्वतंत्र राष्ट्रांनी निषेधाचा शब्ददेखील उच्चारला नाही . यावरून भारत किती एकाकी पडला आहे याची कल्पना येते . भारत सरकारच्या कचखाऊ परराष्ट्रीय धोरणाचा हा परिपाक आहे . भारत सरकारने अलिप्ततेचे ( Non alignment ) धोरण स्वीकारले आहे असे सांगण्यात येते . याचा अर्थ स्वतंत्र परराष्ट्रीय धोरण असा होणे जरूर होते ; तथापि प्रत्यक्षात मात्र भारत सरकार इंग्लंड , अमेरिका आदी पाश्चिमात्य बड्या व भांडवलदारी राष्ट्रांचा अनुनय करीत आले आहे , ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे . नवोदित स्वतंत्र राष्ट्रांमधून अमेरिकन हस्तक्षेपाविरुद्ध फार मोठा असंतोष धुमसत असताना भारत सरकार अमेरिकेचा अनुनय करण्याचे धोरण स्वीकारीत असल्याने या नवोदित स्वतंत्र राष्ट्रांपासून भारत अलग पडत आहे . अमेरिकेच्या सातव्या आरमाराने हिंदी महासागरात ठाण मांडले तरी भारताने अमेरिकेविरुद्ध एक ब्र देखील काढला नाही . दक्षिण व्हिएटनाममधील अमेरिकेचा लष्करी हस्तक्षेप व राक्षसी हत्याकांड , इस्रायल वगैरे राष्ट्रांना आपले हस्तक बनविण्याच्या अमेरिकन कारवाया , भारताविरुद्ध पाकिस्तानला अमेरिकेने तिचा अनुनय दिलेली चिथावणी व पाकिस्तानच्या आक्रमक कारवायांना पाठीशी घालण्याचे अमेरिकेचे धोरण या सर्व प्रकरणांत भारताने अमेरिकेचा निषेध करणे तर दूरच ; परंतु अमेरिकेला दुखवू नये म्हणून करण्याची भूमिका घेतली , ही वस्तुस्थिती अलिप्ततेच्या धोरणाला सुरुंग लावणारी आहे . राजकीय साम्राज्यवादापुढे शरणागती पत्करणाऱ्या भारत सरकारने त्याहीपुढे जाऊन अमेरिका , इंग्लंड , पश्चिम जर्मनी , जपान , फ्रान्स , कॅनडा आदी देशांतील मक्तेदार भांडवलदारांना भारतातील खाजगी व सरकारी कंपन्यांत भांडवल गुंतविण्याचे आवाहन करून व त्यांना सर्व त - हेच्या सवलती देण्याचे जाहीर करून आर्थिक साम्राज्यवादापुढे लोटांगण घातले आहे ! आर्थिक विकासासाठी परकीय राष्ट्रांची मदत घेण्यास आमचा आक्षेप नाही . परंतु भारतातील अर्थव्यवस्था दुर्बल ठेवून आणि तेथील जनतेची लूट करून परकीय भांडवलदारांनी मिळविलेले नफे त्यांच्या देशात परत घेऊन जाण्याची सवलत देणे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था परावलंबी करण्यासारखे आहे . भारत सरकारचे हे धोरण भारतीय जनतेला महाग पडणार आहे . भारत सरकारच्या या दुबळ्या नि अमेरिकनधार्जिण्या धोरणातून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत . चीन व पाकिस्तानची युती ही त्यापैकीच परराष्ट्रीय धोरणाचा गाभा आहे . आणि पाकिस्तानची एक समस्या आहे . भारताचा द्वेष हा पाकिस्तानच्या नजर काश्मीरवर खिळलेली आहे , तर चीनची नजर भारताच्या लडाखव अकसाईचीनयाभूप्रदेशावर आहे . चीन हे स्वत : ला कम्युनिस्ट म्हणवून घेते आणि पाकिस्तान हे अमेरिकन लष्करी करार संघटनेत सामील झालेले एक हुकूमशाही राष्ट्र आहे . असे असूनही या दोन राष्ट्रांची ही युती असल्याने चीन , पाकिस्तान व इंडोनेशिया यांच्या युतीला तोंड देण्याची पाळी भारतावर आली आहे . अशा स्थितीत ब्रह्मदेश , सिलोन , नेपाळ ही भारताच्या सरहद्दीवरील राष्ट्र भारताची बाजू घेण्यास बिचकत आहेत . या परिस्थितीत नेपाळ व भारत , सिलोन व भारत , ब्रह्मदेश व भारत या संबंधात जे प्रश्न आहेत . ते तात्त्विक व न्याय्य भूमिकेवरून सोडविण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला नसल्यामुळे या राष्ट्रांचे मत भारताविरुद्ध कलुषित करण्यास चीन , पाकिस्तान व इंडोनेशिया यांच्या युतीला साहजिकच फावत आहे . या पार्श्वभूमीवर काश्मीरचा प्रश्न , चीनचे भारतावरील आक्रमण , पाकिस्तानचे भारतावरील आक्रमण , परदेशातील भारतीयांचे प्रश्न व भारताच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या परकीय मदतीचा प्रश्न या व अशाच स्वरूपाच्या प्रश्नांचा भारतीय जनतेने गंभीरपणे विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे . काश्मीर हा भारतीय संघराज्याचा एक घटक आहे . पाकिस्तानने व चीनने भारतावर आक्रमण करून भारताचा गिळंकृत केलेला प्रदेश भारताने परत मिळविला पाहिजे , ही भारतीय जनतेची रास्त अपेक्षा आहे . परंतु इंग्लंड , अमेरिकेसारख्या परकीय राष्ट्रांचा अनुनय करून हे प्रदेश परत मिळणार नाहीत अगर त्यांच्या लष्करी सामर्थ्याच्या जोरावर हे भूप्रदेश आपण जिंकून घेऊ अशी समजूत करून घेणे चुकीचे आहे . भारताचे स्वातंत्र्य , सार्वभौमत्व यांचे रक्षण करण्यासाठी इतरांच्या तोंडाकडे पाहणे म्हणजे तत्त्वशून्य व स्वाभिमानशून्य तडजोडीला व देवाणघेवाणीला मान तुकविण्याचा प्रकार आहे . कोणत्याही राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे रक्षण इतर राष्ट्रे करू शकत नाहीत . त्या राष्ट्रातील जनतेनेच ती जबाबदारी उचलावी लागते . भारतीय जनता आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास सिद्ध आहे हे चिनी आक्रमणाच्या वेळी स्पष्ट झाले आहे . परंतु भारत सरकारनेच परावलंबी धोरणाचा अंगीकार केल्यामुळे भारत सरकारचे धोरण व जनतेची स्वाभिमानी भूमिका यात एक प्रकारे विसंगती निर्माण झाली आहे . ही विसंगती दूर करण्याचा भारत सरकारने कधीच प्रयत्न केलेला नाही , असा शेतकरी कामगार पक्षाचा दावा आहे . परदेशातील भारतीय नागरिकांचा प्रश्न असाच गुंतागुंतीचा झाला आहे . आफ्रिका नि आशिया खंडातील नवोदित स्वतंत्र राष्ट्रांत प्रामुख्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे . ही राष्ट्रे आता स्वत : चे भवितव्य घडविण्याचा प्रयत्न करीत असताना तेथील भारतीय लोकांनी त्या त्या राष्ट्राच्या प्रयत्नात व सुखदु : खात सहभागी झाले पाहिजे . त्या राष्ट्रांच्या धोरणाविरुद्ध वागून भारताचे संरक्षण मागणे म्हणजे भारतीय जनतेची बदनामी करणे होय . अशा भारतीयांबाबत भारत सरकारने खंबीर धोरण स्वीकारले पाहिजे . सिलोनमधील भारतीय लोकांनी सिलोनचे नागरिक म्हणून सिलोनच्या जीवनात सहभागी झाले पाहिजे . आपले वेगळे अस्तित्व राखण्याचा प्रयत्न करून त्यांनी बहुसंख्य सिलोनी जनतेपासून अलग पडू नये . सिलोनमधील बहुसंख्य समाजाचा एक विभाग बनण्यासाठी या भारतीय लोकांना सिलोनचे नागरिकत्व मिळाले पाहिजे.

जागतिक संघर्षात भारताची भूमिका काय असावी ?

राष्ट्राराष्ट्रांचे स्वातंत्र्य , सार्वभौमत्व व स्वाभिमान यांना पोषक असेच परराष्ट्रीय संबंध भारताने प्रस्थापित केले पाहिजेत . कोणत्याही राष्ट्राचा अनुनय करण्याचे धोरण सोडून देऊन स्वतंत्र परराष्ट्रीय धोरणाचा स्वीकार करणे जरूर आहे.

आजच्या जागतिक राजकारणात भांडवलदारी व समाजवादी समाजव्यवस्थांमधील संघर्ष हा मूलभूत संघर्ष आहे . हिंदुस्थानातील जनता समाजवादाच्या बाजूने उभी राहणे हा मूलभूत दृष्टिकोन भारताने स्वीकारला पाहिजे . एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर हुकमत गाजविणे व त्याची पिळवणूक करणे ही गोष्ट समाजवादाच्या मार्गातील भलीमोठी धोंड आहे . जे राष्ट्र स्वत : ला समाजवादी म्हणवून घेते , परंतु दुसऱ्या राष्ट्रावरील हुकमतीला व पिळवणुकीला कारणीभूत होते , अशा राष्ट्राने समाजवादी तत्त्वज्ञानाचा त्याग केला आहे , असे म्हटले पाहिजे . चीनची अवस्था तीच आहे . अशा देशातील सरकारशी ठेवावयाच्या राजनैतिक संबंधाचा वेगळ्या पातळीवर विचार केला पाहिजे . चीनसारख्या देशाच्या परराष्ट्रीय धोरणास व त्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात चालविलेल्या गुंडगिरीला , फाटाफुटीला व हस्तक्षेपाला निकराचा विरोध केला पाहिजे .

जागतिक संघर्षाबाबत धोरण निश्चित करताना आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे . प्रत्येक राष्ट्रातील जनतेचा आपले भवितव्य ठरविण्याचा अधिकार मान्य केला गेला पाहिजे ; तथापि आज अमेरिका अनेक स्वतंत्र राष्ट्रांच्या कारभारात आर्थिक व लष्करी मदतीच्या आधाराने असमर्थनीय हस्तक्षेप करीत आहे . अशा हस्तक्षेपाचा भारत सरकारने तीव्र निषेध केला पाहिजे . या धोरणाचा भाग म्हणून कोणत्याही बड्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रात आपले लष्करी तळ उभारता कामा नयेत , अशी भूमिका आपण घेतली पाहिजे . आपल्या परराष्ट्रीय धोरणाची प्रमुख सूत्रे खाली नमूद केल्याप्रमाणे असली पाहिजेत , असे शेतकरी कामगार पक्षाचे मत आहे .

१ ) भारताचे स्वातंत्र्य , सार्वभौमत्व व सरहद्दीचे संरक्षण करण्याचा व भारतातील शासन ठरविण्याचा भारतीय जनतेचा मूलभूत हक्क आहे . त्यामुळे या हक्काला बाध आणण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्र चीन असो अगर पाकिस्तान असो अगर इंग्लंड - अमेरिका असो , त्याच्या हस्तक्षेपाला व गुंडगिरीला भारताने निकराचा विरोध केला पाहिजे .

२ ) भारताच्या आर्थिक व लष्करी विकासासाठी परकीय राष्ट्रांचे साह्य घेत असताना भारतीय अर्थव्यवस्था व संरक्षणसिद्धता परावलंबी होता कामा नये याची प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे . भारतीय जनतेची पिळवणूक करण्याची संधी परकीय भांडवलदारांना देण्याच्या भारत सरकारच्या धोरणास तीव्र विरोध केला पाहिजे .

३ ) पाश्चिमात्य राष्ट्रांनी आज अनेक ठिकाणी लष्करी तळ उभारले आहेत व अनेकलष्करी करार संघटना निर्माण केल्या आहेत . जागतिक शांतता व राष्ट्राराष्ट्रांतील परस्परसहकार्य यांना या लष्करी तळामुळे व लष्करी करार संघटनांमुळे फार मोठा धोका निर्माण होतो . म्हणून अशा लष्करी तळांना व लष्करी करार संघटनांना भारताने विरोध केला पाहिजे .

४ ) नवोदित स्वतंत्र राष्ट्रांना त्यांचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व अबाधित राखून त्यांचे भवितव्य ठरविण्याचा तेथील जनतेला हक्क आहे , ही गोष्ट मान्य करून या राष्ट्रांत परस्परसहकार्य व सलोखा प्रस्थापित केला पाहिजे .

५ ) राष्ट्राराष्ट्रांत शांततामय सहअस्तित्व निर्माण झाले पाहिजे . राष्ट्राराष्ट्रातील सरहद्दीचे तंटे व इतर प्रश्न लष्करी सामर्थ्याने न सोडविता वाटाघाटीच्या मार्गाने सोडविण्याची सोव्हिएट रशियाची भूमिका ही जागतिक शांतता व सहकार्य यांना पोषक असल्याने भारतीय जनतेने व भारत सरकारने सोव्हिएट रशियाच्या या प्रयत्नात सक्रिय साथ दिली पाहिजे .

६ ) जनतेला सुख आणि समृद्धी लाभण्यासाठी जागतिक शांततेची हमी मिळणे जरूर आहे . त्यासाठी अण्वस्त्रांच्या वापरावर बंदी घालण्यात आली पाहिजे.

*भारताची अर्थव्यवस्था आणि चौथी पंचवार्षिक योजना

तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटच्या वर्षात आपले हे अधिवेशन भरत असल्याने आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या चालू असल्यामुळे गेल्या पंधरा वर्षांत काँग्रेस राज्यकर्त्यांनी ज्या पंचवार्षिक योजना पार पाडल्या त्यांच्या यशापयशाचा आढावा घेणे अपरिहार्य ठरेल . दुसऱ्या व तिसऱ्या पंचवार्षिक योजनांची उद्दिष्टे म्हणून खाली नमूद केलेल्या चार गोष्टी नियोजन मंडळाने व राज्यकर्त्यांनी देशापुढे ठेवल्या होत्या :- १ ) जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नात भरघोस वाढ घडवून आणणे . ही वाढ दरवर्षी किमान ५ % अपेक्षित करण्यात आली होती . २ ) देशाचे औद्योगिकीकरण झपाट्याने घडवून आणणे ; आणि विशेषत : जड व मूलभूत उद्योगधंद्यांच्या वाढीवर भर देणे . ३ ) फार मोठ्या प्रमाणावर रोजगारधंदा उपलब्ध करून बेकारीला पायबंद घालणे . ४ ) निरनिराळ्या सामाजिक थरांमधील आर्थिक विषमता कमी करणे व आर्थिक सामर्थ्याची अधिक समप्रमाणात विभागणी करणे . नियोजनकारांनी व राज्यकर्त्यांनी दिलेली ही आश्वासने काहीही असली तरी प्रत्यक्षात तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस जेव्हा आपण देशाच्या अर्थव्यवस्थेवर नजर टाकतो त्या वेळी असे दिसून येते की , नियोजनात ग्रथित केलेली ही उद्दिष्टे साध्य करण्यात संपूर्णतया अपयश आलेले आहे . राष्ट्रीय उत्पादनात म्हणावी तशी वाढ होऊ शकलेली नाही ; एवढेच नव्हे , तर जी थोडीफार वाढ झाली तिचा फायदा सर्वसामान्य श्रमजीवी विभागाला न मिळता मूठभर पुंजीपतींनाच ही वाढलेली संपत्ती आपल्या तिजोरीत गडप केली असल्यामुळे या देशातील आर्थिक विषमता कमी होणे तर दूरच ; परंतु ती अधिकच तीव्र झाली आहे ही वस्तुस्थिती नाकारणे आत्मघातकीपणाचे ठरेल . नियोजनाच्या काळात आर्थिक सामर्थ्याची व संपत्तीची विभागणी कोणत्या पद्धतीने झाली याची छाननी करून अहवाल सादर करण्यासाठी नेहरू सरकारने प्रा . महालनवीस यांच्या अध्यक्षतेखाली काही अर्थपंडितांची एक कमिटी नेमली होती . या कमिटीने आपल्या अहवालात नियोजनाच्या काळात आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण वाढले असून श्रीमंत लोक अधिक श्रीमंत झाले आहेत , असे मत व्यक्त केले असल्याने त्याबाबत अधिक विवेचन करण्याची गरज नाही . जड व मूलभूत उद्योगधंद्यांची वाढ घडवून आणण्यातही अपेक्षेप्रमाणे यश आलेले नाही . तिसऱ्या योजनेच्या अखेरीस आपली अर्थव्यवस्था स्वयंपोषित व स्वयंगतिमान होणे जरूर होते . तथापि भारतीय अर्थव्यवस्था आजही परकीय मदत आणि चलनवाढ या कुबड्यांच्या आधाराशिवाय उभी राहू शकत नाही , ही वस्तुस्थिती खेदजनक आहे . विशेष म्हणजे जड व मूलभूत उद्योगधंद्यांवर अधिक भर न देता उपभोग्य वस्तूंच्या निर्मितीवरच अधिकाधिक शक्ती केंद्रित करावी अशा त - हेची अदूरदर्शी व परिणामी आत्मघातकी विचारसरणी आमच्या राज्यकर्त्यांच्या मानगुटीवर बसली असल्याचे प्रत्ययाला येत आहे . एवढेच नव्हे , तर जड व मूलभूत उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात केवळ सार्वजनिक मालकी विभागाचेच उद्योगधंदे काढणे हे आर्थिक नियोजनाचे सूत्र असताना त्याही क्षेत्रात इतर क्षेत्राप्रमाणेच खाजगी भांडवलदारांना भरपूर वाव निर्माण करून देण्याचे धोरण नियोजन मंडळ व सरकार अवलंबीत आहे . या धोरणामुळे आपले आर्थिक परावलंबित्व वाढणार आहे . हा धोका लक्षात घेता भारत सरकारने ही जनताविरोधी भूमिका स्वीकारू नये म्हणून जनतेने दक्ष राहिले पाहिजे . रोजगारधंदा उपलब्ध करून देण्याबाबत पंचवार्षिक योजनांना एवढे प्रचंड अपयश आले आहे , की खुद्द नियोजन मंडळ व राज्यकर्ते यांनाही तशी कबुली देण्यावाचून गत्यंतर उरलेले नाही . पहिल्या योजनेच्या शेवटी व दुसऱ्या योजनेच्या सुरुवातीला या देशात सरकारी अंदाजाप्रमाणे ५३ लाख बेकार होते . ज्यांना फक्त अंशत : काही कामधंदा मिळालेला आहे अशा अर्धबेकारांचा समावेश या ५३ लाखांच्या संख्येत नव्हता . ग्रामीण विभागात शेतीवर उदरनिर्वाह होऊशकत नसताही शेतीवर अवलंबून राहिलेल्या अर्धबेकारांची संख्या फार मोठी आहे व ही संख्या दरवर्षी फुगत आहे . या अर्धबेकारांचा प्रश्न बाजूला ठेवला तरी नियोजन मंडळ व सरकार ज्यांची बेकार म्हणून नोंद करते अशा बेकारांना रोजगारधंदा उपलब्ध करून देण्यात दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला यश आले नाही . परिणामी दुसऱ्या योजनेच्या सुरुवातीला जेथे ५३ लाख लोक बेकार होते तेथे तिसऱ्या योजनेच्या सुरुवातीला हा बेकारांचा तांडा ९० लाखांच्या घरात गेला ! तिसऱ्या योजनेच्या काळात नव्याने काम मागणाऱ्या १ कोटी ६० लक्ष लोकांची भर लक्षात घेता तिसऱ्या योजनेच्या काळात २ कोटी ५० लक्ष लोकांना रोजगारा धंदा उपलब्ध करून देणे जरूर होते . परंतु प्रत्यक्षात मात्र फारतर १ कोटी २० लक्ष लोकांना रोजगार उपलब्ध केला जाईल असा नियोजन मंडळाचा अलीकडील अंदाज आहे . सारांश तिसऱ्या योजनेच्या सुरुवातीला बेकारांची संख्या ९० लाख होती . तर योजनेच्या अखेरीस बेकारांची संख्या १ कोटी ३० लाख झालेली असेल ! काँग्रेसप्रणित तिन्ही पंचवार्षिकयोजनाया देशातील बेकारीला आळा घालू शकल्या नाहीत . एवढेच नव्हे , तर ही बेकारी वाढविण्यास त्यांचे भांडवलदारधार्जिणे स्वरूप कारणीभूत झालेले आहे . ज्या श्रमजीवी जनतेला हा नियोजनाचा तथाकथित ' जगन्नाथाचा रथ ' ओढण्यासाठी जुंपण्यात आले व ज्या जनतेच्या निढळाच्या घामातून या देशाच्या संपत्तीमध्ये वाढ झाली , त्या शेतकरी , कामगार , शेतमजूर व मध्यमवर्गीय जनतेचे दारिद्र्य एकसारखे वाढत आहे व मूठभर उद्योगपती , घाऊक व्यापारी , काळा बाजारवाले व मक्तेदार भांडवलदार यांची या देशाच्या अर्थव्यवस्थेवरील पकड फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे . या आर्थिक नियोजनाचा फायदा श्रमजीवी जनतेला मिळाला नसताही या काळात वाढत्या करांचा बोजा मात्र या सामान्य जनतेला निष्कारण सहन करावा लागला आहे . दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात ४५० कोटी रुपयांची नवी करवाढ करण्याचे उद्दिष्ट होते . परंतु प्रत्यक्षात मात्र निरनिराळ्या नव्या करांच्या रूपाने १०५२ कोटी रुपये वसूल करण्यात आले . तिसऱ्या योजनेच्या काळात नव्या करांच्याद्वारे १७१० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट जाहीर झाले होते ; तथापि प्रत्यक्षात ही रक्कम २५५० कोटी रुपयांच्या घरात गेली आहे . राज्यतंत्र राबविण्यासाठी आणि नियोजन अमलात आणण्यासाठी करआकारणी करणे आवश्यक आहे . तथापि या करांचा बोजा कोणावर पडतो या गोष्टीला अतिशय महत्त्व आहे . काँग्रेस राजवटीत झालेली करवात अतिशय प्रतिगामी स्वरूपाची आहे . ज्या लोकांची आर्थिक कुवत वाढलेली आहे व ज्यांच्यावर कर लादले असता ते देऊ शकतील अशा लोकांवर प्रत्यक्ष कर लादण्यावर अधिक भर न देता सर्वसामान्य जनतेवा ज्या करांचा बोजा पडतो अशा अप्रत्यक्ष करांची आकारणी करण्याचे सरकारी धोरण आहे . एकूण करवसुलीपैकी प्रत्यक्ष करांचे प्रमाण एकसारखे कमी कमी होत चालले आहे . १९४८-४९ साली प्रत्यक्ष करांचे प्रमाण ३४.४ % होते . १९५२-५३ मध्ये ते २९ .८ % पर्यंत खाली आले आणि आज हेच प्रमाण २४ % पेक्षाही कमी झाले आहे . १९४८-४९ साली प्रत्यक्ष करांच्या द्वारे २३९ कोटी रु . वसूल झाले . १९६२-६३ साली हेच उत्पन्न ४८४ कोटी रु . झाले . याउलट अप्रत्यक्ष करात झालेली वाढ अफाट आहे . १९४८-४९ साली अप्रत्यक्ष कराचे उत्पन्न ३६२ कोटी रु . होते . तेच उत्पन्न १९६२-६३ साली १३३४ कोटी रु . झाले . अबकारी करांचे उत्पन्न १९४८-४९ साली १०७ कोटी रु . होते , तर १९६२ ६३ साली हेच उत्पन्न ६०९ कोटी रुपयांवर गेले. अप्रत्यक्ष करात झालेली ही भयानक वाढ लक्षात घेता व ज्या वस्तूंवर हे कर लादण्यात आले आहेत त्या वस्तू जनतेच्या दैनंदिन जीवनात अत्यावश्यक आहेत हे ध्यानात घेतल्यास या करआकारणीमुळे सामान्य जनतेचे जीवन कसे उद्ध्वस्त झाले असेल याची थोडीफार कल्पना येते . नियोजनासाठी उभारावयाची रक्कम अशा रीतीने गोरगरीब लोकांच्या तोंडचा घास काढून घेऊन जमा केली जात असताना , ' चोरांच्या उलट्या बोंबा या न्यायाने या देशातील भांडवलदारवर्ग त्यांच्यावर फार मोठा करांचा बोजा लादला जात आहे अशी तारस्वरात किंकाळी फोडीत आहे . या देशातील वृत्तपत्र व्यवसायाची मक्तेदारी त्यांच्याच हातात असल्यामुळे त्यांचाच आवाज ऐकला जातो आहे . भारतातील ५१ मोठ्या उद्योगधंद्यांची पाहणी केली असता असे आढळून आले आहे की , सध्याचे करवजा या उद्योगधंद्यांना झालले नफेगेल्या काही वर्षांत वाढतच आहेत . १९६२-६३ साली या ५१ उद्योगधंद्यांना कर वजा जाता ५१ कोटी ७२ लक्ष रु . नफा झाला , तर १९६३-६४ साली हाच नफा ( कर वजा जाता ) ५९ कोटी १६ लक्ष रुपयांपर्यंत वर गेला ! या उद्योगधंद्यानी १९६२-६३ साली ३१ कोटी ६६ लक्ष रुपये डिव्हिडंड बाटला तर १९६३-६४ साली डिव्हिडंडची ही रक्कम ३४ कोटी ८४ लक्ष रुपयांवर गेली . ही पाहणी ‘ इकॉनॉमिक टाइम्स ' या पत्राने केली असल्याने व हे पत्र या देशातील भांडवलदारी हितसंबंधाची तरफदारी करणारे असल्याने या पत्राच्या पाहणीतून बाहेर आलेल्या निष्कर्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे . या देशातील २० प्रमुख उद्योगपतींचे भारतातील ८९५ कंपन्यांमध्ये आर्थिक हितसंबंध गुंतलेले असून त्या कंपन्यांचे भांडवल १९५१ साली २३६ कोटी रुपये होते . टाटा , बिर्ला , मार्टिनबर्न व डालमिया जैन या ४ प्रमुख उद्योगपतींच्या ताब्यात १९५१ साली या देशातील एकूण कंपन्यांच्या भांडवलापैकी , १७.९ % भांडवल होते . १९५८ साली हेच प्रमाण २२.३ टक्के झाले . टाटा आणि बिर्ला या दोन उद्योगपतींची या देशातील एकूण कंपन्यांच्या भांडवलापैकी १७ टक्के भांडवलावर मालकी आहे ! ज्या पंचवार्षिकयोजनांचे नगारे काँग्रेस सरकार गेली पंधरा वर्षे बडवीत आहे , त्या नियोजनाचे हे विदारक चित्र पाहिल्यानंतर येथून पुढे कितीही पंचवार्षिक योजना काँग्रेस सरकारने आखल्या तरी त्यातून आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण अधिकाधिक तीव्रतर होत जाणार आहे हे स्पष्ट आहे. आणि म्हणूनच केवळ आर्थिक नियोजन केले जात आहे एवढ्यावरच समाधान मानता येणार नाही . या नियोजनाचे भांडवलदारधार्जिणे स्वरूप पूर्णपणे बदलल्याशिवाय नियोजनाची उद्दिष्टे साध्य होण्याची सुतराम शक्यता नाही . आजपर्यंत नियोजन अयशस्वी झाले याची कारणे देताना काही लोक अंमलबजावणीतील दोषांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न करून असे भासवितात की , नियोजनाचे सध्याचे स्वरूप निर्दोष आहे . वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे . काँग्रेसच्या आर्थिक नियोजनातच असे अंगभूत दोष आहेत की त्यामुळे या देशाचे उत्पादन अपेक्षेप्रमाणे वाढू शकत नाही , भारतीय अर्थव्यवस्था स्वयंपोषित व स्वयंगतिमान होऊ शकत नाही . बेकारी कमी होण्याऐवजी ती वाढतच आहे . आणि आर्थिक विषमता कमी होण्याऐवजी गरीब व श्रीमंत यांच्यामधील विषमतेची दरी एकसारखी रुंदावत आहे . एका बाजूला देशाच्या संपत्तीमध्ये भर पडत असतानाच दुसऱ्या बाजूला सामान्य जनतेचे दारिद्र्य , हालअपेष्टा , दैनावस्था आणि उपासमार वाढत असून तिला जीवन नकोसे होते आहे . प्राध्यापक काल्डर या ख्यातनाम इंग्रज अर्थशास्त्रज्ञाच्या अंदाजाप्रमाणे या देशातील धनिक लोक दरवर्षी सुमारे २०० ते ३०० कोटी रुपयांचे कर चुकवितात . त्यांनी १९५७ साली केलेला हा अंदाज लक्षात घेता या देशात आज बिनहिशेबी पैशाच्या स्वरूपात जे अक्षरश : करोडो रुपये वावरत आहेत . त्याचे कारण समजून येते . देशातील करबुडव्या लोकांनी कर चुकवून साठविलेला काळा पैसा सुमारे ३००० ते ५००० कोटी रुपयांच्या आसपास असून या काळ्या पैशाचे मालकच खऱ्याखुऱ्या अर्थाने या देशावर सत्ता गाजवीत आहेत . भारतीय अर्थव्यवस्थेवर भांडवलदारांची विशेषत : मक्तेदार भांडवलदारांची पकड वाढत आहे, ही घटना खेदजनक व चिंताजनक आहे . परंतु दुर्दैवाने ही कथा एवढ्यावरच थांबत नाही . परकीय भांडवलदार आणि देशीभांडवलदारयांचीगेल्या काही वर्षांत अनिष्ट युती झाली असून भारत सरकारने या युतीपुढे सपशेल लोटांगण घातले आहे . ' इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स ' या उद्योगपतींच्या जागतिक महामंडळाचे अधिवेशन दिल्ली येथे डिसेंबर १९६४ मध्ये भरले होते . या संघटनेच्या प्रतिनिधींची भारत सरकारशी बोलणी झाली . या वाटाघाटीतून एकच गोष्ट निर्विवादपणे सिद्ध झाली आहे , की भारत सरकारने परकीय खाजगी भांडवलाला भारताचा दरवाजा सताड उघडा केला असून आर्थिक विकासाला हातभार लावण्याच्या नावाखालीयादेशाची बेदरकारपणे लूट करण्याची सनदच भारत सरकारने देशी व विदेशी भांडवलदारांच्या पायावर वाहिली आहे ! सारांश , आर्थिक साम्राज्यवादापुढे भारत सरकारने पूर्णतया शरणागती पत्करली असून त्यामुळे देशाचे अतोनात नुकसान झाले आहे . अमेरिका , इंग्लंड व पश्चिम जर्मनी इ . देशांतील भांडवलदारांच्या प्रतिनिधींना भारत सरकारने आपल्या स्वाभिमानाला आणि आर्थिक स्वातंत्र्याला तिलांजली देऊन नि : संदिग्ध शब्दात असे आश्वासन दिले आहे . की , परकीय भांडवलाच्या साह्याने जे उद्योगधंदे भारतात सुरू करण्यात येतील त्या धंद्यांत भारतीय नागरिकांचे भागभांडवल ५१ टक्क्यांपेक्षा अधिक असायला हवेच , अशी अट भारत सरकार घालणार नाही! हे परकीय भांडवल केवळ पूरक म्हणून न राहता काही उद्योगधंदे संपूर्णतया विदेशी खाजगी भांडवलाच्या मालकीने सुरू होणार आहेत . हे उद्योगधंदे खाजगी व सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांत निघणार आहेत ; आणि हिंदी भांडवलदारांना करविषयक व इतर ज्या ज्या सवलती मिळतात त्या सर्व सवलती विदेशी खाजगी भांडवलदारांना उपलब्ध केल्या जातील . एवढेच नव्हे , तर भांडवलावर होणारा नफा भारतातून आपापल्या देशात परत नेण्याचीही परवानगी भारत सरकारने या भांडवलदारांना दिली असल्याचा उल्लेख अर्थमंत्री ना . टी . टी . कृष्णम्माचारी यांनी आपल्या अंदाजपत्रकी भाषणात केला आहे ! परकीय भांडवलदारांनी एका दगडात दोनाहून अधिक पक्षी मारण्याचे कसब साधले आहे . त्यांच्या देशात जे भांडवल गुंतविण्यास वाव नाही असे भांडवल व त्या देशाच्या उत्पादनव्यवस्थेत निरुपयोगी ठरलेली व अडगळवजा झालेली यंत्रसामुग्री किफायतशीर अटीवर गुंतविण्यास भारतासारखा विशाल आणि खंडप्राय देशत्यांना आयताच सापडला . आपण भारतात जेवढे भांडवल गुंतवू त्याच्या कितीतरी पटीने भारतीय संपत्ती आपण आपल्या देशात खोऱ्याने ओढून नेऊ , या आत्मविश्वासाने परकीय भांडवलदार पाऊल टाकीत आहेत . भारत सरकारच्या या भांडवलदारधार्जिण्या व देशविघातक धोरणाचा केवळ जळजळीत निषेध करून भारतीय जनतेची जबाबदारी संपू शकत नाही , तर हे जनताविरोधी धोरण बदलून घेण्यासाठी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चळवळ उभारण्याची गरज निर्माण झाली आहे . अशा रीतीने तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीला आमची अर्थव्यवस्था स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने काही भरीव प्रगती होणे तर दूरच ; परंतु परकीय मदत व परकीय भांडवल आणि चलनवाढ यावर अधिकाधिक अवलंबून राहण्याचा प्रसंग भारतीय अर्थव्यवस्थेवर ओढवला असताना चौथ्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा तयार होत आहे . नियोजन मंडळाने सादर केलेला मसुदा लक्षात घेता , चौथी पंचवार्षिक योजना सुमारे २१,५०० कोटींची असेल व त्यापैकी अंदाजे १४,५०० कोटी रुपये सार्वजनिक क्षेत्रात खर्च होतील अशी अपेक्षा आहे . शेतीक्षेत्रात दरवर्षी ५ टक्के , संघटित औद्योगिक क्षेत्रात दरवर्षी ११ टक्के , छोटे उद्योगधंदे , वाहतूक , रेल्वे , बँका व विमे यांच्या क्षेत्रात दरवर्षी ६.५ टक्के वाढ होईल आणि एकूण अर्थव्यवस्थेत वार्षिक ६.५ टक्के वाढ व्हावी , अशी अपेक्षा नियोजन मंडळाने सादर केलेल्या मसुद्यात व्यक्त केली आहे . ( Memorandum on the Five Year Plan . October 1964 , Page 12 ) याच संदर्भात चौथ्या योजनेच्या साधनसामुग्रीचा विचार करणे अप्रस्तुत होणार नाही . आपण दरवर्षी सरासरीने १५० कोटी रुपयांचे अन्नधान्य आयात करीत असतो . पी . एल . ४८० अन्वये आपण अन्नधान्याची जी आयात करणार आहोत ती वगळूनही चौथ्या योजनेच्या काळात आपणास ७२०० कोटी रुपयांची आयात करावी लागेल असा नियोजन मंडळाचा अंदाज आहे . याच काळात निर्यातीच्या रूपाने ५१०० कोटी रुपयांचे परदेशी चलन आपण मिळवू शकू , अशी योजनाकारांची अपेक्षा आहे . यावरून चौथ्या योजनेच्या काळात केवळ व्यापारी तूट भरून काढण्यासाठी आपणास २१०० कोटी रुपये किमतीचे परकीय चलन उपलब्ध करावे लागेल . आपली परकीय चलनाची गरज एवढ्यावरच भागू शकत नाही . आपण पूर्वी काढलेल्या कर्जाची व त्यावरील व्याजाची परतफेड करण्यासाठी चौथ्या योजनेच्या काळात ११०० कोटी रुपयांचे परकीय चलन आपणास उभारावे लागेल . कर्जाचे हप्ते भागविण्यासाठी ५०० कोटी रुपये व व्याजापोटी ६०० कोटी रुपये असा हा हिशेब आहे . सारांश आयात - निर्यातीतील अंतरातून निर्माण झालेली २१०० कोटी रुपयांची व्यापारी तूट व कर्जाचे हप्ते व व्याज यांची परतफेड करण्यासाठी ११०० कोटी रुपये याप्रमाणे ३२०० कोटी रुपयांची परकीय चलनाची तूट भरून काढण्याची समस्या चौथ्या योजनेच्या काळात आपणास सोडवावी लागणार आहे . ही तूट भरून काढण्यासाठी आपणाजवळ परकीय चलनाचा साठाही नाही . १९५०-५१ साली आपणाजवळ ९५१ कोटी ४० लक्ष रुपयांचे परकीय चलन शिल्लक होते . गेल्या १४ वर्षांत या साठ्यात भर पडण्याऐवजी तो कमी कमी होत गेला . तिसऱ्या योजनेच्या काळात आंतरराष्ट्रीय द्रव्य निधी ( Interna tional Monetary Fund ) मधून सुमारे १०३ कोटी रुपये काढून घेतले असताही आमचा परकीय चलनाचा साठा १९६४-६५ मध्ये २३७ कोटी रुपयांपर्यंत खाली घसरला . परकीय हुंडणावळीची ही तंग परिस्थिती लक्षात घेता , ३२०० कोटी रुपयांची ही तूट भरून काढण्यासाठी नियोजनकार परकीय देश , आंतरराष्ट्रीय संस्था व परदेशातील भांडवलदारांचे खाजगी भांडवल यांच्या तोंडाकडे पाहत आहेत . भारत सरकारने १९४८ व १९५६ साली जे औद्योगिक धोरणाविषयी ठराव पास केले आहेत , त्यामुळे खाजगी मालकीच्या उद्योगधंद्यांना फार मोठा बाव देण्यात आला आहे . भारत सरकारचे हे औद्योगिक धोरण त्याच्या समाजवादाच्या घोषणेशी विसंगत असून त्यामुळे या देशात सार्वजनिक मालकीच्या उद्योगधंद्यांऐवजी खाजगी क्षेत्रातील उद्योगधंदेच मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत . सार्वजनिक मालकीचे उद्योगधंदे इतक्या मर्यादित क्षेत्रात निघत आहेत , की त्यांचा प्रभाव भारतीय अर्थव्यवस्थेवर पडू शकत नाही . सार्वजनिक मालकीचे उद्योगधंदे हे खाजगी मालकीच्या उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी पोषक व अनुकूल वातावरण निर्माण करतील अशाच पद्धतीने राबविले जात आहेत . किंबहुना नियोजन सुरू झाल्यापासून खाजगी मालकीच्या उद्योगधंद्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे . काँग्रेसप्रणित आर्थिक नियोजन नसते तर या देशातील खाजगी मालकीच्या उद्योगधंद्यांची गेल्या काही वर्षांत जितक्या झपाट्याने वाढ झाली तेवढी मुळीच झाली नसती ! ज्या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक करावी लागते व ज्यांची फळे फार उशिरा चाखायला मिळतात व ज्यात फार मोठ्या प्रमाणावर नफा मिळू शकत नाही ; परंतु जे उद्योगधंदे निघाल्याशिवाय इतर उद्योगधंद्यांना वाव , चालना व गती मिळू शकत नाही , अशाच क्षेत्रात सार्वजनिक मालकीचे उद्योगधंदे काढून बाकीचे सर्व औद्योगिक क्षेत्र खाजगी भांडवलदारांना मोकळे ठेवण्याचा धूर्तपणा काँग्रेस सरकारने प्रथमपासूनच अवलंबला असल्यामुळे या धोरणाविरुद्ध भारतीय जनतेने त्याबाबत तीव्र नापसंती वेळोवेळी व्यक्त केली असून हे धोरण बदलण्याची मागणी केली आहे . अशा रीतीने १९५६ साली सरकारने पास केलेला औद्योगिक धोरणविषयक ठराव मुळातच भांडवलदारधार्जिणा असताना तो ठराव जनताभिमुख व समाजवादाला पोषक करण्याची गोष्ट दूरच ; परंतु त्या ठरावाला मुरड घालण्याचे व खाजगी मालकीच्या उद्योगधंद्यांना अधिकाधिक व्यापक क्षेत्र निर्माण करून देण्याचे धोरण नियोजन मंडळाने व केंद्र सरकारने अलीकडेच स्वीकारले आहे . या नव्या धोरणाची दिशा चौथ्या योजनेबाबत जो मसुदा नियोजन मंडळाने सादर केला आहे त्यात व्यक्त झाली आहे . हा मसुदा म्हणतो : " There is obviously a wide field open for the operation of private enterprise . The investment programme for private industry is substantial in relation to its past perfor mance .... This investment pattern assumes a sizeable inflow of private sector resources in the field of consumer goods machinery , fertilisers and metals . In the field of fertilisers it is the intention of the State to assume the residual responsibility if the expectations of the performance of the private sector were to fall below the levels postulated under this programme . " " Memorandum on the Fourth Five Year Plan . नियोजनकारांच्या मते , या देशात खाजगी मालकीच्या उद्योगधंद्यांना खचितच फार मोठा वाव आहे हे उघड आहे . यापूर्वीच्या काळात खाजगी मालकीच्या उद्योगधंद्यांत ज्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक आली , त्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणावर ही भांडवल गुंतवणूक करण्याचा कार्यक्रम अमलात येणार आहे . भांडवल गुंतवणुकीच्या या धोरणानुसार आम्ही असे गृहीत धरून आहोत की , उपभोग्य वस्तू , यत्रसामुग्री , खते व धातू या क्षेत्रात खाजगी भांडवलाचा फार मोठा ओघ वाहत राहील . खतांच्या बाबतीत सरकारचे धोरण असे आहे की , खतांचे उत्पादन खाजगी मालकीच्या उद्योगधंद्यांकडे सोपविण्यात यावे व जर खाजगी कारखानदारांकडून अपेक्षेप्रमाणे खतांचे उत्पादन होत नाही असे आढळून आले तरच ती उणीव वा पोकळी भरून काढण्यापुरते सरकारने पुढे यावे . ही आत्मघातकी व देशविघातक भूमिका पत्करून भारत सरकारने मूठभर भांडवलदारांना घराची मालकी बहाल केली असून भारतीय जनतेला मात्र वळचणीला कसेबसे कुडकुडत उभे राहण्याची परवानगी दिली आहे , असे म्हटल्यावाचून राहवत नाही ! नियोजन मंडळाच्या या मसुद्यात या धोरणाची चर्चा करताना त्यांनी असे सांगून टाकले की , उपभोग्य वस्तूंच्या बरोबरीने यंत्रसामुग्री , खते , जंतुनाशके , खनिज पदार्थ , खनिज तेले आणि धातू या सर्वच उत्पादनक्षेत्रात खाजगी भांडवलाला येथून पुढे फार मोठी कामगिरी पार पाडावयाची आहे . शेतीसाठी योग्य त्या प्रमाणात खतांचा पुरवठा केला जात नाही ही गोष्ट नव्याने सांगण्याची मुळीच गरज नाही . भारतामध्ये खतांचे वापराचे प्रमाण अतिशय कमी आहेच ; परंतु भारतातील सर्व राज्यात महाराष्ट्र राज्यातील शेतीला दर एकरी खताचा पुरवठा अगदीच कमी होतो . भारतामध्ये दर एकरी सरासरी ३ पौंड रासायनिक खताचा वापर केला जातो . महाराष्ट्र राज्यात हे प्रमाण दर एकरी १ किलोपेक्षाही कमी आहे ! जपानमध्ये दर एकरी सरासरी २६४ पौंड रासायनिक खताचा वापर केला जातो , ही वस्तुस्थिती लक्षात घेता , भारतीय शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी खतांच्या उत्पादनाचा किती प्रचंड कार्यक्रम सरकारने तातडीने अमलात आणला पाहिजे याची कल्पना येईल . परंतु अशा महत्त्वाच्या वस्तूचे उत्पादन भारत सरकारने ( व भ्रष्ट भांडवलदारांच्या टोळक्यावर सोपविले असून सरकारने स्वत : कडे केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे . सरकारचे हे जनताविरोधी धोरण पुरोगामी जनतेने संघटितरीत्या हाणून पाडण्याची अभूतपूर्व गरज निर्माण नफेखोर झाली आहे . योजनेच्या खर्चासाठी लागणाऱ्या द्रव्याची उभारणी करताना श्रमजीवी जनतेवर असह्य करवाढ लादून तिच्या तोंडचा घास काढून घेणाऱ्या राज्यकर्त्यांना बँका , चहाचे मळे , खनिज तेले , कोळसा , लोखंड वगैरे खनिज संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करण्याची कल्पनादेखील सहन होत नाही . बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याची मागणी भारतीय जनतेने गेली अनेक वर्षे चालू ठेवली असून अलीकडे त्या मागणीला अतिशय धार प्राप्त झाली असूनही भारत सरकार बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यास तयार नाही . नेहमीप्रमाणे जनतेचा बुद्धिभेद करण्यासाठी काही प्रदेश काँग्रेस समित्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याच्या मागणीला पाठिंबा देण्याचे नाटक वटविण्यासाठी तसे ठराव पास करून दप्तरी दाखल केले आहेत . श्रमजीवी जनतेच्या मागणीचा दबाव वाढल्यामुळेच नाइलाजाने या प्रदेश काँग्रेस समित्यांनी हे ठराव पास केले आहेत हे नव्याने सांगण्याची मुळीच गरज नाही . शेती उत्पादनाच्या क्षेत्रात गेल्या तिन्ही योजनांच्या काळात जी मरगळीची अवस्था आढळून आली आहे ती बदलण्याची कोणतीही प्रभावी उपाययोजना नियोजन मंडळाच्या मसुद्यामध्ये सुचविण्यात आलेली नाही , ही बाब अतिशय चिंताजनक आहे . शेती उत्पादनाच्या वाढीच्या मार्गात ज्या मूलभूत समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची राज्यकर्त्यांची तयारी नसल्याने वरपांगी व थातूरमातूर गोष्टींवर पैसे खर्च करून शेतीक्षेत्रात योजनेच्या काळात अमुक कोटी रुपये खर्च केले अशी बढाई मारून नियोजन मंडळ व भारत सरकार आत्मवंचनेबरोबरच जनतेचीही फसवणूक करून तिला उपासमारीच्या कराल दाढेत लोटीत आहे . राज्य सरकारांनी केलेले जमीनसुधारणाविषयक कायदे म्हणजे केवळ फार्स ठरले आहेत . गळ्यात घंटा बांधून चोर पकडायला जावे म्हणजे जी गत होते तीच गत या कायद्याची झालेली आहे . हे कायदे येणार ' ' येणार अशी जाहिरात करून संबंधित जमीनदारी हितसंबंधांना सावध करण्याचे पुण्यकर्म पास राज्यकर्त्यांनी केले असल्यामुळे हे तथाकथित जमीनसुधारणा कायदे हाणून पाडण्यासाठी व पराभूत करण्यासाठी जरूर ती उपाययोजना करण्यास या जमीनदारांना वाव मिळाला . बनावट वाटणीपत्रके व बनावट बक्षीसपत्रांचा सर्रास अवलंब करून या कायद्यांचा हेतू त्यांनी केव्हाच हाणून पाडला आहे . वस्तुत : अगदी कुचकामी ठरलेल्या या कायद्यांचीसुद्धा अंमलबजावणी करण्याची हिंमत राज्य सरकारे दाखवू शकलेली नाहीत . एवढेच नव्हे , तर काही राज्य सरकारांनी आजतागायत हे कायदे पास करण्याचेही सौजन्य दाखविलेले नाही . शेतीमालाचा उत्पादनखर्च व शेतकरी आणि शेतमजूर यांना मिळणे जरूर असलेले वाजवी जीवनमान , या गोष्टी पायाभूत धरून शेतीमालाच्या किफायतशीर किमती ठरवून दिल्याखेरीज व त्या किफायतशीर किमती शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्षात पडतील , अशी हमी देण्यासाठी शेतीमालाचा व्यापार सरकारने हातात घेतल्याशिवाय शेतीक्षेत्रात भांडवलनिर्मिती व भांडवलगुंतवणूक होऊ शकत नाही व पर्यायाने उत्पादनातही अपेक्षित वाढ घडवून आणता येत नाही अशी स्पष्ट वस्तुस्थिती असतानाही शेतीमालाच्या किफायतशीर किमती ठरवून देण्याबाबत कोणताही शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला जात नाही . शेतीमालाच्या किमती ठरविण्यासाठी जी कमिटी नेमल्याचे भारत सरकारने काही महिन्यांपूर्वी जाहीर केले आहे तिचे कार्यक्षेत्र व तिला मार्गदर्शक म्हणून जी तत्त्वे भारत सरकारने विशद केली आहेत , ती लक्षात घेता शेतीमाल तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना येणारा उत्पादनखर्च व शेतकरी आणि शेतमजूर यांना मिळणे जरूर असलेले वाजवी जीवनमान या गोष्टी आधारभूत मानून या किमती निश्चित केल्या जातील अशी सुतराम शक्यता नाही . याउलट कारखानदारीसाठी लागणारा कच्चा माल स्वस्त दरात उद्योगपतींना कसा मिळेल व औद्योगिक कामगारांना द्याव्या लागणाऱ्या वेतनाची रक्कम न फुगता कशी आटोक्यात राहील या गोष्टींची चिंता वाहण्याची कामगिरी या कमिटीवर सरकारने सोपविली असल्याने या कमिटीचे निष्कर्ष शास्त्रीय असणार नाहीतच ; त्याचप्रमाणे ही कमिटी ज्या किमती निश्चित करून देईल त्या किमती शेतकऱ्यांना किफायतशीरही असणार नाहीत हे स्पष्ट आहे . आजतागायत ज्याप्रमाणे औद्योगिकीकरणाच्या वेदीवर शेतीव्यवसायाचा बळी देण्यात आला , त्याचप्रमाणे येथून पुढेही औद्योगिक क्षेत्राच्या गरजा पुरविणारी व कारखानदारीच्या तालावर नाचणारी बटीक म्हणूनच शेतीव्यवसायाला राबवून घेण्याचे आत्मघातकी धोरण आमचे राज्यकर्ते राबवू पाहत आहेत . सारांश , शेती उत्पादनात अपेक्षेप्रमाणे वाढ घडवून आणण्यात चौथी पंचवार्षिक योजना यशस्वी होणार नाही हे स्पष्ट आहे . राज्यकर्त्यांच्या या शेतीविषयक धोरणामुळे केवळ शेती उत्पादनात अपेक्षेप्रमाणे वाढ होणार नाही एवढेच नव्हे तर औद्योगिकीकरणही झपाट्याने वसातत्याने होऊ शकणार नाही या गोष्टीकडे नियोजनकार व राज्यकर्ते जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत . या देशातील शेती अधिकाधिक उत्पादनक्षम झाल्याखेरीज वाढत्या लोकसंख्येला जगविण्यासाठी आवश्यक ते अन्नधान्य व वाढत्या उद्योगधंद्यासाठी जरूर असणारा औद्योगिक कच्चामालसातत्याने पुरविला जाण्याची कोणतीही खात्री नाही . भारतासारख्या अविकसित देशातील शेतीव्यवसायाकडून अन्नधान्य व औद्योगिक कच्चा माल यांचा पुरवठा करण्याबरोबरच कारखानदारीतून बाहेर पडणाऱ्या पक्क्या मालाच्या विक्रीची खात्रीलायक बाजारपेठ निर्माण करण्याची जबाबदारी पार पाडणे जरूर असते . ग्रामीण विभागातील ८० % लोकसंख्येची उपासमार चालू असल्याने व त्यांचे दरडोई उत्पन्न अगदीच कमी असल्याने त्यांची क्रयशक्ती ( वस्तू विकत घेण्याची कुवत ) अतिशय मर्यादित आहे . त्यांच्या तोकड्या उत्पन्नापैकी ३/४ मिळकत केवळ त्यांच्या पोटाची खळगी कशीबशी भरण्याकडेच खर्च होत असल्याने बाकीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांच्या कनवटीला एक छदामही नसतो . ज्या देशातील ७०-८० टक्के जनता इतके हलाखीचे जिणे जगत आहे तेथे कारखानदारीतून बाहेर पडणाऱ्या पक्क्या मालाचा उठाव होणे केवळ अशक्य आहे . या विभागाला पूर्ववत दरिद्री राहू देऊन औद्योगिकीकरण घडवून आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आर्थिक अरिष्टाला आमंत्रण देण्याचाच प्रकार आहे . औद्योगिक क्षेत्राची बटीक म्हणून शेतीक्षेत्राचा वापर करण्याचे राज्यकर्त्यांचे हे आत्मघातकी धोरण असेच चालू राहिले तर नजीकच्या भविष्यकाळात शेतीव्यवसायाची व ग्रामीण विभागाची दुर्दशा होऊन आर्थिक अरिष्टाच्या भयानक संकटात भारतीय अर्थव्यवस्था सापडल्याचे दृश्य पाहावे लागेल अशी भीती वाटते . बेकारीला आळा घालण्याबाबत चौथ्या योजनेच्या काळात काही भरीव कामगिरी होईल अशी सुतराम शक्यता नाही . तिसऱ्या योजनेच्या अखेरीस या देशातील बेकारांची संख्या १ कोटी ३० लक्ष असेल अशी कबुली काळात नव्याने काममागणारांची संख्या दोन कोटी तीस खुद्द नियोजन मंडळानेच दिली आहे . चौथ्या योजनेच्या लक्ष असेल . म्हणजेच चौथ्या योजनेच्या काळात एकूण कोटी ६० लक्ष लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे . या ३ कोटी ६० लक्ष बेकारांशिवाय अर्धबेकारांची संख्या अशीच बेसुमार वाढत आहे . तथापि , अर्धबेकारांचा प्रश्न बाजूला ठेवला तरी ३ कोटी ६० लक्ष लोकांना रोजगार पुरविणे चौथ्या योजनेच्या काळात शक्य नाही हे आजच स्पष्ट दिसत आहे . भारतात आर्थिक नियोजन चालू आहे असा दावा राज्यकर्ते करीत असले तरी प्रत्यक्षात येथील अर्थव्यवस्थेचे खरेखुरे नियोजन होत नाही असाच अनुभव येतो . एरवी देशामध्ये मनुष्यबळ भरपूर प्रमाणात उपलब्ध असताना त्याचा योग्य वापर करण्याच्या कामात योजनाकारांनी व राज्यकर्त्यांनी जी दिवाळखोरी व्यक्त केली आहे तशी ती दिसण्याचे कारण नव्हते . आमच्या अनेक योजना परकीय यंत्रसामुग्रीच्या व साहित्याच्या अभावी पुऱ्या केल्या जात नाहीत . प्रत्येक गोष्टीसाठी परदेशावर अवलंबून राहण्याचे राज्यकर्त्यांचे धोरण समर्थनीय तर नाहीच ; परंतु निषेधार्ह आहे . देशातील मनुष्यबळाचा कौशल्याने वापर करण्याची इच्छाच राज्यकर्त्यांच्या ठायी नसल्यामुळे या देशातील अनेक धरण योजना व शेती विकास योजना आज अडून पडल्या आहेत . बेकारीलाखतपाणी घालणारे हे सरकारी धोरण आमूलाग्र बदलून आमचे नियोजन रोजगारप्रधान बनविल्याखेरीज नियोजनातील उद्दिष्टे साध्य होण्याची मुळीच शक्यता नाही . आमच्या देशातील बेकारीच्या प्रश्नाचे स्वरूप दुसऱ्या एका अर्थाने अतिशय ओंगळ आहे . बेकारांच्या संख्येमध्ये सुशिक्षितांची संख्या वाढत आहे . देशामध्ये तंत्रविशारद व यंत्रविशारद यांची विलक्षण चणचण जाणवत असताना व त्यासाठी परकीय देश व परकीय कंपन्या यांच्यापुढे तोंड गाडण्याची आपत्ती ओढवली असताना सुशिक्षित बेकारांचा तांडा एकसारखा फुगत आहे . देशाच्या सामाजिक व आर्थिक गरजा आणि शिक्षणपद्धती या दोहोंमध्ये कमालीचा विसंवाद ( Mal adjustment ) आढळून येत आहे . हे विसंवादित्व कमी होण्याऐवजी वाढतच आहे . देशाच्या सामाजिक व आर्थिक गरजांचा अभ्यास करून त्या पुऱ्या करू शकेल अशा बेताने शिक्षण पद्धतीची पुनर्घटना केली गेली पाहिजे . या बाबतीत कोणत्याही प्रकारचा विलंबलावणे म्हणजे देशाला विनाशाकडे नेण्यासारखे आहे . पंधरा वर्षांच्या आर्थिक नियोजनानंतर भारतीय अर्थव्यवस्था स्वयंपोषित व स्वयंगतिमान होणे तर दूरच राहिले ; परंतु आपण अधिकाधिक दुर्बल व परावलंबी होत आहोत . आमचे योजनाकार देशातील व परदेशातील मक्तेदारांच्या अधिकाधिक आहारी जात आहेत आणि त्यांच्यापुढे नमते घेऊन वारेमाप सवलती देत आहेत . डेव्हलपमेंट रिबेट , उद्योगधंदा सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षांत देण्यात येणारी करांची संपूर्ण माफी , इन्कमटॅक्समधून कंपन्यांना मिळणाऱ्या विविध सवलती इत्यादी गोष्टींचा फायदा उपटूनही या मक्तेदारांचे समाधान होत नाही . खाजगी मालकी क्षेत्रात निघणाऱ्या उद्योगधंद्यांना इंडस्ट्रियल फिनान्स कॉर्पोरेशनसारख्या संस्थेच्या द्वारे सरकार सर्व त - हेचे आर्थिक साह्य देत आहे . खाजगी मालकीक्षेत्रातच भांडवलदारी हितसंबंध निरंकुश सत्ता गाजवीत आहेत असे नव्हे ; तर सार्वजनिक मालकीचे जे तुटपुंजे औद्योगिक क्षेत्र या देशात अस्तित्वात आले आहे , त्या क्षेत्रातही सरकारने जी व्यवस्थापक मंडळे नियुक्त केली आहेत , त्यामध्ये मक्तेदारांच्या प्रतिनिधींचेच प्राबल्य आहे . सार्वजनिक मालकीचे उद्योगधंदे अकार्यक्षम ठरावेत व त्यांची बदनामी व्हावी असा जाणूनबुजून पद्धतशीर प्रयत्न करणाऱ्या शक्ती या उद्योगधंद्यांच्या संचालक मंडळात व सरकारात आहेत ही वस्तुस्थिती अतिशय खेदजनक आहे . अधिकाधिक उत्पादन घडवून आणणे व त्याचे न्याय्य वाटप करणे अशा दोन गोष्टी आमच्या अर्थव्यवस्थेपुढे आज तातडीच्या समस्या म्हणून उभ्या आहेत . परंतु खाजगी मालकीच्या विभागाचा या दोन्ही गोष्टींना तीव्र विरोध आहे . हा देश परक्या देशांतून येणाऱ्या मालाच्या विक्रीची बाजारपेठ ( Sellers Market ) म्हणूनच आणखी काही वर्षे राहिला तरी त्यांना त्या गोष्टीचे काहीच सोयरसुतक नाही आणि नेमकी हीच गोष्ट आमची अर्थव्यवस्था स्वयंपोषित व स्वयंगतिमान होण्याच्या मार्गातील प्रचंड धोंड आहे . सार्वजनिक मालकीचे क्षेत्र अधिकाधिक व्यापक करणे , त्याची कार्यक्षमता वाढविणे , त्या उद्योगधंद्यांचे खऱ्या अर्थाने सामाजीकरण करणे , परकीय भांडवल व परकीय तंत्रज्ञ यांच्यावर अवलंबून राहण्याच्या सध्याच्या धोरणाला संपूर्ण फाटा देणे , सामाजिक , आर्थिक व राजकीय न्याय प्रस्थापित करणे आणि मक्तेदारी हितसंबंध व या देशाची लूट करणाऱ्या परकीय शक्ती यांच्या कारवायांना कसलाही वाव न देणे हेच सध्याच्या परिस्थितीमध्ये आमच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य सूत्र असले पाहिजे . परंतु मक्तेदारी हितसंबंधांना पाठीशी घालणारे काँग्रेस सरकार हे धोरण स्वीकारू इच्छित नाही हे उघड आहे . अशा स्थितीत एकापाठोपाठ कितीही पंचवार्षिक योजना आल्या नि गेल्या तरी या देशातील सामान्य माणसाचे जीवन समृद्ध होण्याऐवजी ते अधिकच असह्य होत जाणार आहे . पंचवार्षिक योजनांची संख्या किती झाली व त्या योजनांमधून किती रक्कम खर्च केली या गोष्टीला महत्त्व नसून त्या योजनांतून सर्वसामान्य जनतेचे जीवनमान किती प्रमाणात उंचावले , रोजगारधंद्याची हमी कितपत मिळाली , आर्थिक विषमतेला मूठमाती देण्यात किती यश आले व आपली अर्थव्यवस्था किती प्रमाणात स्वयंपूर्ण झाली या गोष्टींनाच खरे महत्त्व आहे . काँग्रेस सरकारचे आर्थिक धोरण यांपैकी एकही गोष्ट साधूशकत नाही . हे पहिल्या तिन्ही योजनांतून स्पष्ट झाले आहे . आणि चौथीयोजना तोंडावर आली असताना तर भारत सरकारने देशी आणि परकीय मक्तेदारांपुढे सपशेल लोटांगण घालण्याची स्वाभिमानशून्य व देशविघातक भूमिका पत्करली असल्याने भारतीय अर्थव्यवस्था अधिकाधिक परावलंबी व दुर्बल होणार आहे . मक्तेदारांची मगरमिठी व सामान्य जनतेची नागवणूक करण्याची त्यांची शक्ती वाढतच जाणार आहे . अशा स्थितीत मक्तेदारी हितसंबंध व त्यांना पाठीशी घालणारे काँग्रेस सरकार यांनी अंगीकारलेले हे देशविघातक व जनताविरोधी धोरण हाणून पाडून खऱ्याखुऱ्या नियोजित अर्थव्यवस्थेची घडी बसविण्यासाठी देशातील पुरोगामी शक्तींनी देशव्यापी आंदोलन उभारण्याची गरज निर्माण झाली आहे . जनतेच्या प्रचंड चळवळीचा दबाव निर्माण करण्यानेच राज्यकर्त्यांचे मक्तेदारधार्जिणे धोरण बदलू शकेल . एरवी दुसरा पर्याय नाही . या आंदोलनात शेतकरी कामगार पक्ष आपल्या सर्व ताकदीनिशी भाग घेऊन श्रमजीवी जनतेशी आपले इमान कायम राखील अशी आम्ही जनतेला ग्वाही देतो .

*शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न*

भारत हा शेतीप्रधान देश असून व ७० टक्के लोकसंख्या शेतीक्षेत्रात राबत असूनही अन्नधान्याच्या बाबतीत आपणास स्वयंपूर्ण होता आलेले नाही . स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीमध्ये काहीही घडले असले तरी स्वातंत्र्योत्तर काळात शेतीकडे व शेतकऱ्याकडे पाहण्याचा राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन बदलला जाईल व शेतीधंद्याला चांगले दिवस येतील आणि शेतीची उत्पादनक्षमता वाढेल अशी जी अपेक्षा होती ती काँग्रेस राज्यकर्त्यांनी धुळीला मिळविली आहे . अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण करण्याच्या कितीही वल्गना राज्यकर्त्यांनी केल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र दरवर्षी सरासरीने १५० कोटी रुपयांचे अन्नधान्य परदेशातून आयात केले जात असूनही बहसंख्य भारतीय जनता उपासमारीच्या छायेमध्ये कसेबसे दिवस काढीत आहे. शेतीमालाला किफायतशीर किमतीची कसलीही हमी नसल्यामुळे शेतकऱ्यांची बाजारात लूट होते परिणामी शेतीक्षेत्रात भांडवलनिर्मिती होऊ शकत नाही . साहजिकच सुधारलेली खते , बी - बियाणे , अद्यावत औजारे व नवे तंत्र यांचा अवलंब करण्याची कुवत बहुसंख्य शेतकऱ्यांमध्ये राहू शकत नाही . भारतीय शेतीची उत्पादनक्षमता तुलनात्मकदृष्ट्या अतिशय निकृष्ट आहे . ती वाढविण्याचा हमखास मार्ग म्हणजे शेतीक्षेत्रात भांडवलनिर्मिती व भांडवलगुंतवणूक व्हावी म्हणून परिणामकारक उपाययोजना आखली गेली पाहिजे .

शेतीमालाच्या किफायतशीर किमती सरकारने निश्चित केल्या पाहिजेत व त्या किमती प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात पडतील अशी हमी सरकारने दिली पाहिजे . त्याशिवाय या देशातील शेती उत्पादनात अपेक्षित वाढ होणार नाही , ही भूमिका १९४८ सालापासून शेतकरी कामगार पक्षाने सातत्याने मांडली आहे . परंतु शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची हमी मिळण्याचा प्रश्न आणि शेती उत्पादन यांचा काही परस्परसंबंध आहे हे देखील मान्य करण्याची काँग्रेस राज्यकर्त्यांची तयारी नसल्यामुळे शेतीमालाच्या किफायतशीर किमतीच्या अभावी शेतकऱ्यांची होणारी लूट व शेतीची आबाळ चालूच राहील . शेतकऱ्यांच्या या लुटीला व शेतीव्यवसायाच्या दुरवस्थेला राज्यकर्त्यांचा प्रच्छन्न आशीर्वादच होता . परंतु शेतीमालाच्या किमती आगाऊ निश्चित करून दिल्या पाहिजेत . या धोरणास आजतागायत कितीही विरोध झाला असला तरी या किमती ठरवून दिल्या पाहिजेत , हे तत्त्व आता मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे या धोरणाच्या इष्टतेबद्दल अधिक विवेचन करण्याची गरज उरलेली नाही . शेतीमालाच्या किमती निश्चित करण्याच्या कामी भारत सरकारला सल्ला देण्यासाठी डॉ . एम् . एल् . दातवाला यांच्या अध्यक्षतेखाली एक ' शेतीमाल किमती कमिशन ' ( ॲग्रिकल्चरल प्राइसेस कमिशन ) नियुक्त करण्यात आले आहे . परंतु केवळ सरकारने कमिशन नियुक्त केल्यामुळे हा प्रश्न आता समाधानकारक रीतीने सुटला असे कोणी समजत असतील तर त्यांची घोर निराशा झाल्याखेरीज राहणार नाही . शेतीमालाच्या किमती कोणत्या तत्त्वावर ठरवून देण्यात आल्या पाहिजेत ही गोष्ट महत्त्वाची आहे . शेतकऱ्यांना केवळ किमती ठरवून नको आहेत , तर त्या किमती त्यांना किफायतशीर वाटल्या पाहिजेत , हा खरा प्रश्न आहे आणि म्हणूनच जर या कमिशनने केवळ किमती ठरवून दिल्या ; परंतु त्या किफायतशीर असल्या नाहीत तर पूर्वी किमती ठरवून न दिल्यामुळे शेतकऱ्याची जी लूट होत होती व शेतीची जी आबाळ होत होती ती पूर्ववत तशीच चालू राहील . सरकारने हे कमिशन नियुक्त करताना कमिशनने कोणत्या दृष्टिकोनातून शेतीमालाच्या किमती निश्चित करून द्याव्यात हे विशद केले आहे . कारखानदारीसाठी लागणाऱ्या औद्योगिक कच्च्या मालाच्या व अन्नधान्याच्या किमती वरच्या पातळीवर निश्चित करण्यात आल्यास कारखानदारांचा उत्पादनखर्च वाढेल व पक्क्या मालाच्या किमती वाढून एकूण महागाई वाढेल ; तेव्हा राहणीमानाचा खर्च , वेतनाची पातळी , औद्योगिक उत्पादनखर्च व ग्राहकांचे हितसंबंध या बाबींवर शेतीमालाच्या किमतीचा काय परिणाम होईल हे लक्षात घेऊन या कमिशनने आपल्या शिफारशी केल्या पाहिजेत , अशी भारत सरकारची भूमिका आहे . या देशातील उद्योगपतींच्या स्वार्थाच्या वेदीवर शेतकऱ्यांच्या हितसंबंधांचे बलिदान करण्याचा आदेशच भारत सरकारने या कमिशनला देऊन ठेवला आहे , असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही ; आणि म्हणूनच हे कमिशन शेतीमालाच्या किमती निश्चित करून देईल ; परंतु या किमती शेतकऱ्यांना किफायतशीर मुळीच असणार नाहीत , असे शेतकरी कामगार पक्षाचे मत आहे . शेतकऱ्यांना शेतीमालाच्या उत्पादनासाठी करावा लागणारा खर्च , शेतकऱ्याचे वाजवी जीवनमान व शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी करावी लागणारी भांडवल गुंतवणूक या गोष्टी पायाभूत धरूनच शेतीमालाच्या किमती ठरवून मिळाल्या पाहिजेत , या आमच्या मागणीचा आम्ही पुन्हा एकदा पुनरुच्चार करतो . औद्योगिकीकरणाच्या अभावी या देशातील वाढत्या लोकसंख्येला शेतीवरच उदरनिर्वाह करण्याची पाळी आल्यामुळे शेतीवर फार मोठ्या लोकसंख्येचा बोजा पडला असून दर माणशी पाऊण एकरदेखील जमीन वाटणीला येत नाही . ज्यांना अजिबात जमीन नाही अशा १९ % ग्रामीण लोकसंख्येला केवळ शेतमजुरी करूनच कसाबसा उदरनिर्वाह करावा लागत आहे . त्यांना वर्षाकाठी चार महिनेदेखील रोजगार मिळण्याची परिस्थिती नसते . या विभागाचे जीवनमान ढासळत असून त्यांचा कर्जबाजारीपणा वाढत आहे हे भारत सरकारनेच केलेल्या पाहणीवरून स्पष्ट झाले आहे . जमीनमालकीतील विषमता आजही तीव्र असल्याने वरच्या १ % जमीनदारांकडे देशातील एकूण जमिनीपैकी १६ % जमीन आहे .५ % जमीनमालकांकडे ४० % जमीन आहे तर १० % जमीनमालकांकडे ५६ % जमीन आहे . या देशातील बहुसंख्य शेतकरी कुटुंबे अगदी दरिद्री असून त्यांच्याकडे ५-६ एकरापेक्षा कमीच शेती आहे . अशा तोकड्या शेतीवर त्यांना वर्षभर पुरेल एवढा रोजगार मिळू शकत नाही . बागायती शेतीचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याने बहुतांश जमिनीत वर्षाकाठी फक्त एकच पीक निघू शकते . शेतकऱ्यांना बारमाही रोजगार उपलब्ध होण्याच्या मार्गात बागायती शेतीचा अभाव हे आणखी एक कारण आहे . मोठ्या उद्योगधंद्यांच्या अभावाप्रमाणेच शेतीला जोडून देता येण्यासारख्या जोडधंद्यांचीही पूर्तता करण्यात सरकारला यश आलेले नाही , ही वस्तुस्थिती आहे . भारत सरकारच्या शेतीखात्यामार्फत काही वर्षांपूर्वी शेतीव्यवसायाचे अर्थशास्त्र ( Economics of Farm Management ) अभ्यासण्यात आले . अहमदनगर व नाशिक हे दोन जिल्हे या अभ्यासात समाविष्ट करण्यात आले होते . सरकारच्या शेतकीतज्ज्ञांनी केलेल्या या पाहणीवरून असे निष्पन्न झाले आहे की , बहुसंख्य शेतकऱ्यांची शेती तोट्यात चालू आहे . शेतकऱ्याला दरएकरी जेवढा उत्पादनखर्च करावा लागतो तेवढादेखील बऱ्याच वेळा निघू शकत नाही असे आढळून आले आहे . ही पाहणी केली त्यावेळी म्हणजे १९५६-५७ साली ज्वारीची किंमत दर बंगाली मणास १६ रु . २१ पैसे होती . म्हणजेच दर क्विंटलला सुमारे ४३ रुपये ज्वारीचा भाव असताही बहुसंख्य शेतकऱ्यांची शेती तोट्यात चालू होती . शेतीमध्ये भांडवल गुंतविण्याचा प्रश्न बाजूला राहिला ! शेतीवर अवलंबून असणाऱ्या मनुष्यबळाची रोजंदारी ठरविताना त्यांना विशिष्ट किमान वेतनाची हमी देणे जरूर आहे . आज राहणीमान भडकले असतानाही ववर्षातून फक्त चार महिने कामधंदा मिळत असतानाही एक रुपया रोजावर काम करण्याची पाळी शेतमजुरावर ओढवली आहे , ही गोष्ट लक्षात घेता या विभागाला एक वाजवी वेतन मिळण्याची हमी दिली पाहिजे . हे वेतन ठरविताना या लोकांना वर्षातून प्रत्यक्षात किती दिवस रोजगार मिळू शकतो याचा विचार प्रामुख्याने झाला पाहिजे . नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाहणीवरून असे आढळून आले आहे की , शेतकऱ्यांच्या कुटुंबात साधारणपणे ६ ते ७ माणसे असतात व त्यापैकी निम्मी माणसे मिळवती असतात . म्हणजे ती शेतीवर काम सुमारे २५३ ते २६७ दिवस ते शेतीच्या कामात अडकलेले असतात व यापैकी प्रत्यक्षात १०७ ते १४७ दिवस ते शेतात राबत असतात . त्यांच्या बैलांना वर्षाकाठी ६ महिने शेतावर काम असते.बाकीच्या वेळी त्या बैलांना काम नसले तरी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शेतकऱ्यांना खर्च करावाच लागतो . या वस्तुस्थितीचा विचार करूनच शेतीमालाच्या किमती ठरवून दिल्या गेल्या पाहिजेत . मानवी श्रम व बैलाचे श्रम यांची किंमत आज ज्या दराने धरली जाते त्या दराने धरून हा प्रश्न सुटू शकणार नाही . वर्षाकाठी जितके दिवस त्यांना कामधंदा उपलब्ध होतो तेवढ्या मुदतीत त्यांच्या श्रमाचे एवढे मूल्य मिळाले पाहिजे , की जेणेकरून त्यांचा वर्षाचा उदरनिर्वाह झाला पाहिजे . आपल्या शेतीवर दावणीच्या बैलांना वर्षभर कामधंदा मिळू शकत नसल्याने बैल सांभाळणे महाग पडते म्हणून प्रत्येकाने रोजमजुरीवर बैल घ्यावयाचे ठरविले तर केवढा अनवस्था प्रसंग ओढवेल याचा विचार केला पाहिजे . म्हणून बैलांच्या श्रमाची किंमत धरताना ती रोजमजुरीवर धरण्याऐवजी बैल सांभाळण्यासाठी जो खर्च येतो त्यावरच आधारली पाहिजे . अशा बैलजोडीच्या मालकाने आपल्या शेतीची मशागत करून फावल्या वेळात ही बैलजोडी इतरांच्या शेतीवर भाड्याने दिली तर जी मजुरी मिळेल ती मजुरी बैलजोडी सांभाळण्यासाठी येणाऱ्या खर्चातून वजा करण्यास हरकत नाही . शेतकऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तींच्या मजुरीचा हिशेब करताना एका गोष्टीचा प्रामुख्याने विचार झाला पाहिजे . ही माणसे शेतीवर प्रत्यक्षात जितके दिवस ( मानवी दिवस किंवा man days ) काम करतात त्यापेक्षा कितीतरी अधिक दिवस त्यांना शेतीच्या संबंधात खर्च करावे लागतात . उदा . कामावर लावलेले रोजगारी गडी कामाला सुरुवात करण्यापूर्वी व ते निघून गेल्यानंतरही शेतकरी व त्यांची कुटूंबीय मंडळी शेतावर काम करीत असतात . या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारने शेतीमालाच्या किमती निश्चित करून दिल्या पाहिजेत . या ठरावामध्ये आम्ही कोणतीही विशिष्ट रक्कम नमूद करीत नाही . कारण हा प्रश्न विशिष्ट तत्त्वाच्या आधारावर सुटला पाहिजे अशी आमची मागणी आहे . रक्कम बदलू शकते ; पण तत्त्वे तीच राहणार आहेत . शेतीमालाच्या उत्पादनखर्चाचा हिशेब करताना खालील गोष्टीवर होणाऱ्या खर्चाचा अंतर्भाव केला गेला पाहिजे .

१ ) जमिनीची किंमत बाजारभावाने करून त्या रकमेवरील व्याज अगर जमिनीचा खंड .

२ ) औताची जनावरे विकत घेण्यासाठी खर्च केलेल्या रकमेवरील व्याज , बैल सांभाळण्यासाठी येणारा खर्च व बैलजोडी वृद्ध वा निकामी झाल्यानंतर दुसरी घ्यावी लागते म्हणून योग्य त्या घसाऱ्याची तरतूद , बाहेरील बैलांची मजुरी ( यातून घरच्या बैलांना बाहेरील मजुरी मिळाल्यास ती रक्कम वजा करावी . )

३ ) जमीन महसूल व इतर कर

४ ) बी - बियाणे

५ ) खते व जंतुनाशके

६ ) शेतीची अवजारे तयार करण्याच्या रकमेवरील व्याज व औजारांचा घसारा , काही औजारांचे भाडे

७ ) विहीर खोदण्यासाठी व मोट - नाडा अगर इंजिन पंप खरेदी करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चावरील व्याज , विहिरीची दुरुस्ती , मोट - नाड़ा अगर इंजिन व पंप यांचा घसारा अगर सरकारी पाटाचे पाणी असल्यास पाणीपट्टी

८ ) मजुरांची मजुरी

९ ) शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची मजुरी

१० ) जनावरे व पिके यांचा विमा उतरविण्यासाठी भरावे लागणारे हप्ते वरील बाबींवर शेतकऱ्यांना करावा लागणारा खर्च लक्षात घेऊन आणि वर विशद केलेल्या तत्त्वाच्या आधारे शेतकऱ्याची जनावरे , शेतमजूर व शेतकऱ्याच्या कुटुंबातील व्यक्ती यांच्या श्रमाचे मूल्य निश्चित करून शेतीमालाचा उत्पादनखर्च निश्चित केला पाहिजे व शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी अधिकाधिक खते , सुधारलेली औजारे , बी - बियाणे , जंतुनाशके व आधुनिक तंत्रे यांचा अवलंब करण्यासाठी भांडवलगुंतवणूक करण्याची ऐपत शेतकऱ्यामध्ये जेणेकरून येईल अशा बेताने शेतीमालाच्या किमती निश्चित करून मिळाल्या पाहिजेत . असे झाले तरच शेती उत्पादनात वाढ होईल . एरवी परिस्थिती अधिकच बिघडत जाण्याचा धोका स्पष्ट आहे . कारखानदारांना व ग्राहकांना शेतीमाल महाग पडू नये म्हणून शेतीमालाच्या किमती कृत्रिमरीत्या खालच्या पातळीवर निश्चित करण्याचे सरकारी धोरण देशाला विनाशाकडे नेणारे व पोटाला लागणाऱ्या अन्नधान्यासाठीदेखील परदेशाकडे लाचारीने पाहायला लावणारे आहे . या धोरणाने ग्रामीण भारत अधिकाधिक भुकेकंगाल होऊन त्याची क्रयशक्ती अत्यंत मर्यादित होणार आहे . परिणामी औद्योगिकीकरणांतून बाहेर पडणाऱ्या पक्क्या मालाचा उठाव करणारी बाजारपेठ देशातल्या देशात निर्माण होणार नाही . परदेशातील बाजारपेठा काबीज करण्याची तर सुतराम शक्यता नाही . अशा स्थितीत केवळ शेतीव्यवसायाचीच हेळसांड होईल असे नव्हे , तर औद्योगिक क्षेत्रातही आर्थिक अरिष्ट आपले ओंगळ तोंड वर काढल्याखेरीज राहणार नाही.

ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शेतीमालाच्या किमती खाली याव्यात असे सरकारला वाटत असेल तर शेतीमालाच्या उत्पादनखर्चात अंतर्भूत होणाऱ्या बाबींवर शेतकऱ्याला जो भरमसाट खर्च करावा लागत आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे . शेतकऱ्याला ज्या वस्तू विकत घ्याव्या लागतात त्यांच्या किमतीची घोडदौड तशीच चालू देऊन केवळ शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाच्या किमती कृत्रिम रीतीने व व्यवहारशून्य भूमिकेतून खालच्या पातळीवर निश्चित करणे म्हणजे सध्याची समस्या अधिकाधिक उग्र करण्याचाच प्रकार आहे . या प्रश्नाबाबत सरकारने आपले धोरण बदलले नाही तर ते बदलून घेण्यासाठी व शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची हमी मिळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना व शेतमजुरांना आंदोलन उभारावे लागेल , असा आम्ही सरकारला इशारा देऊन ठेवतो .