राज्याची आरोग्य व्यवस्था सक्षम करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी लिहिले मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांना पत्र

मुंबई ( ११ मे ) : कोविड -१९ च्या संसर्गामुळे महाराष्ट्रातील सध्या : ची असलेली रुग्णसंख्या राज्याच्या लोकसंख्येनुसार आवश्यक लसीकरण व अत्यावश्यक आरोग्य सेवा यासाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर , नर्सेस , फार्मासिस्ट , टेक्निशियन , सफाई कर्मचारी यांची आवश्यकता आहे.त्यामुळे रुग्णवाढीच्या संख्येनुसार रुग्ण खाटांची संख्या व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, टेक्निशियन, सफाई कर्मचारी आदिंची आवश्यक व्यवस्था राज्यात तात्काळ करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

शेतकरी कामगार पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात भाई जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, गेल्या १ वर्षांच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागाची रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालये आणि महानगरपालिका रुग्णालयांना कामाचा प्रचंड ताण आला आहे. आपल्या सरकारी आरोग्य व्यवस्थेतील अपुरे मनुष्यबळ व अपुरी यंत्रसामग्री व खाटांची संख्या व इतर बाबीबद्दलआपल्याला खरी परिस्थिती कळाली. या सर्वासाठी गेल्या १ वर्षात काही पदभरती झाली आणि काही पदभरती प्रगतिपथावर आहे. तरी अजूनही बहुतेक जिल्ह्यात शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. परंतु आता दुसऱ्या लाटेमध्ये कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यासाठी उपलब्ध रुग्णखाटा आणि मनुष्यबळ अपुरे पडत आहे. ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेड न मिळाल्यामुळे अनेक कोविड रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. यासर्व परिस्थितीचा शासकीय आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, टेक्निशियन, सफाई कर्मचारी व इतर सर्व रिक्त पदे भरण्यासाठी तात्कालिक आणि दीर्घकालीन नियोजन करण्यात यावी अशी अपेक्षाही भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

NHM अंतर्गत दीर्घ कालावधी पासून काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेण्यात यावे.डॉक्टर MBBS , specialist आणि superspecialist हा आरोग्य व्यवस्थेतील एक महत्वाचा घटक आहे. तरी डॉक्टरांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येणारी सर्व रुग्णालये , वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये , महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेची रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये यासाठी तत्कालीन आणि दीर्घकालीन नियोजन होणे आवश्यक असल्याचे मत भाई जयंत पाटील यांनी या निवेदनाद्वारे मांडले आहे.

सार्वजनिक आरोग्य सेवा आयुक्तालयाने १६ एप्रिल २०२१ च्या नोटीस द्वारे २४०० MBBS डॉक्टरांची सेवा सक्तीने करून घेण्याचे ठरविले आहे पण ह्यातील फक्त १०४८ डॉक्टरांना ३० एप्रिल २०२१ पर्यंत नियुक्त्या देण्यात आल्या आहेत, उरलेल्या १४०० डॉक्टरांसाठी ३ मे ला एक नोटिफिकेशन काढून ९ मे २०२१ पर्यंत मुदत देऊन त्यांना १० ते १२ मे २०२१ ला नियुक्त्या देणार आहेत. हा विलंब तात्काळ दूर करून डॉक्टरांना तात्काळ सेवेत रुजू करून घ्यावे. विधानपरिषदेतील तारांकित प्रश्न क्रमांक ३४७४३ याला १८ डिसेंबर २०१७ रोजी तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी दिलेले उत्तरानुसार १०,००० पेक्षा जास्त डॉक्टरांनी आपली बंधपत्रित सेवा पूर्ण केली नव्हती. या आकडेवारीत मागील साडेतीन वर्षाच्या कालावधीत नक्कीच वाढ झालीच असणार . ह्यासर्वाची यादी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मिळवून त्यांना राज्यातील महापालिका , वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदावर तत्काळ नेमणूका देण्यात याव्यात, अशी मागणीही आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे.

राज्य सरकारने जर हे वेळीच केले नाही तर डॉक्टर कमी पडून रुग्ण सेवा प्रभावित होईल, अशी चिंता आहे.  त्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या सदरच्या सुचनांवर आपल्यास्तरावर योग्य ती कार्यवाही होईल ही आशा व्यक्त करुन राज्याची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी ही चांगली संधी असल्याचे मला वाटते, करीता शेतकरी कामगार पक्षाच्या या मागणीची तात्काळ दखल घ्यावी असेही सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *