भाई दिनकररावजी नलवडे

भारताच्या स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतर आजही राजर्षी शाहू महाराजांचा लोकाभिमुख कार्यकाळ हा आज महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशासाठी सुद्धा अनुकरणीय आणि प्रासंगिक आहे. याच लोकाभिमुख परिवर्तनवादी परंपरेचा वारसा चालविणाऱ्या लोकनेत्यांची खाण म्हणून कोल्हापूर जिल्हा सुपरिचित आहे. याच खाणीतील एक स्वयंप्रकाशित रत्न म्हणजे आमचे आदर्श, प्रेरणास्थान ‘भाई दिनकररावजी नलवडे’. कसल्याही राजकीय महत्त्वाकांक्षांचा स्पर्शही नसणारे, त्यागी, निगर्वी, निःस्पृह, अशा भाई भाई दिनकररावजी नलवडे यांचा जन्म पूर्वीच्या गारगोटी तालुक्यातील मडिलगे येथे १९१८ साली झाला. “समाजाचे परिवर्तन व उत्कर्ष घडविण्यासाठीच व्यक्तिचे सार्वजनिक जीवन असते” हा ध्येयवाद त्यांच्या जीवनाचा समांतर श्वास होता. सार्वजनिक जीवनातील सर्व बरेवाईट, कटू अनुभव व दगेफटके पचवून सुद्धा, त्यांच्या सबंध आयुष्यात हा ध्येयवाद त्यांनी कधीच सोडला नाही. 
 
     १९४२ च्या ‘चलेजाव’ आंदोलनातील संघटनात्मक कार्यातील सहभाग ही, भाईंच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात होती. ऐन तरूणाईत देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या या तरूण स्वातंत्र्य सैनिकाने स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्र उभारणीसाठीच पुढील जीवन समर्पित केले. सत्यशोधकी वैचारिक बैठक आणि राजर्षींच्या कृतीशील परंपरेची प्रेरणा, यांमुळे भाईंनी शेतकरी कामगार पक्षाशीच एकरूप होणे हे स्वाभाविक आणि नैसर्गिकच होते. *’राधानगरी हायड्रो-इलेक्ट्रिक कामगारांच्या’* न्याय मागण्यांसाठीचा संघर्ष व २२ दिवसांचा यशस्वी संप ही या लोकनेत्याची सार्वजनिक जीवनातील नेतृत्वाची सुरूवात आणि कष्टकरी हिताशी प्रतिबद्धता दर्शविणारी पहिली यशस्वी सलामीच होती. कामगारांच्या हक्कांबाबत आग्रही असणार्‍या *भाईंनी शेतकरी वर्गाच्या उत्कर्षासाठी असणारे सहकाराचे महत्त्व फार पुर्वीच ओळखले होते.* बिद्री साखर कारखान्याच्या स्वप्नपूर्तीसाठी भाईंनी प्रसंगी पायी फिरूनही शेअर्स गोळा केले होते. ते बिद्री कारखान्याचे संस्थापक संचालक होते. तसेच भाई, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वस्त सुद्धा होते.
 
     लोकसहभाग आणि लोकशाही प्रक्रिया सुनिश्चित करत सामाजिक सर्वांगीण प्रगतीचे उद्दिष्ट गाठण्याची क्षमता फक्त ‘स्थानिक स्वराज्य संस्थां’ मधेच आहे, याचे महत्त्व ओळखण्यासाठी स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्र सरकारला ६० चे दशक उजडावे लागले होते. परंतु हेच महत्त्व त्याआधीच ओळखून प्रत्यक्ष कृती करणार्‍या मोजक्याच दृष्ट्या लोकनेत्यांमधे भाई दिनकररावजी नलवडे यांचा प्रगल्भपणा अधोरेखित होतो. त्यांच्या कृतीशीलतेने आणि लोकप्रियतेच्या जोरावर १९५२ च्या लोकल बोर्डाच्या निवडणुकीत ते विजयी तर झालेच, परंतु शेतकरी कामगार पक्ष अल्पमतात असूनही, अजातशत्रू असणारे भाई कोल्हापूर लोकल बोर्डाचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष झाले. विशेष म्हणजे पुढच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व कळल्यानंतर मेहता आयोगाच्या शिफारशीनुसार नव्या संरचनेत जिल्हा परिषद स्थापन झाल्या. त्यावेळी विसर्जित होऊ घातलेल्या लोकल बोर्डाचे शेवटचे अध्यक्ष सुद्धा भाईच होते. जिल्हा परिषदेच्या नव्या संरचनेत सुद्धा भाईंना जनतेने उदंड प्रतिसाद देत निवडून दिले. १९६७ नंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्था गटातून भाईंनी विधानपरिषद निवडणुक लढवली होती.
 
     चलेजाव आंदोलनात संघटनात्मक कार्यातील सहभागाने सुरूवात करणारे भाई कुशल संघटक होते. लोकल बोर्डाच्या त्यांच्या कार्यकाळात शेतकरी कामगार पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील बांधणीमधे त्यांच्या या संगठन कौशल्याचा पक्षाला अतिशय फायदा झाला. भाईंनी त्यांच्या सहकार्‍यांसोबत अनेक सभा, समारंभ, परिषदा घडवून आणत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यापैकी कोल्हापूरचे सुपुत्र ‘मेजर एस. पी. थोरात’ यांचा नागरी सत्कार घडवण्यात भाईंचाच पुढाकार होता. स्थानिक सार्वजनिक जीवनात मातीशी जुडलेले भाई, त्याचवेळी आपणास राष्ट्रीय प्रश्न व संघर्षाशी एकरुप झालेले दिसतात. मग ते संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन असो, गोवा मुक्ती संग्राम असो, सीमा प्रश्न वा दुष्काळ निवारण असो, अशा सर्वच व्यापक प्रश्नांवर भाई दिनकररावजी नलवडे यांनी नेतृत्वाची धुरा समर्थपणे सांभाळली.
 
     दुर्दैवाने शेतकरी कामगार पक्षाला मध्यंतरीच्या काळात लाभलेल्या एकांगी, हेकेखोर आणि राजकीय अव्यवहारी नेतृत्वामुळे पक्षाची संघटनात्मक प्रचंड मोडतोड झाली आणि परिणामी अनेक सक्षम नेते कार्यकर्ते संधीपासून वंचित राहिले आणि पक्षापासून दुरावले. अशा प्रवृत्तींमुळे, तीच बाब भाईंच्या बाबतीत दोनदा झाली आणि कोल्हापूर जिल्हा एका सक्षम संभाव्य आमदाराच्या कारकिर्दीस मुकला. यातून भाईंचे व्यक्तिशः काही नुकसान झाले नाही. पण चळवळीचे, शेकापचे आणि पर्यायाने समाजाचेही नुकसान झाले. शेतकरी कामगार पक्षाला लागलेली ओहोटी हा विषय भाईंच्या मनाला अखेरपर्यंत वेदना देत राहीला. परंतु यानिमित्ताने चळवळीतील एखादा चेहरा संस्थानिकासारखा प्रस्थापित होतो आणि दुसरीकडे *”त्याच चळवळी-संघटना-पक्ष मोडतात, डाव्या काही नेतृत्वाचे वरचढ ठरणारे व्यक्तीदोष आणि खरे लोकाभिमुख राजकीय पर्याय क्षीण होत जाणे”*, हे समीकरण मात्र आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना चिंतनाचे विषय आहेत. परंतू एक मात्र निश्चित आहे, की भाई दिनकररावजी नलवडे यांच्या सारख्या निःस्पृह नेत्यांच्याच प्रेरणा व योगदानाचे स्मरण करूनच आजच्या समाजाला या गर्तेतून काढत प्रगतीची दिशा नव्याने देणे शक्य व आवश्यक आहे.
 
     सर्वसामान्य जनतेच्या प्रपंचाचा ध्यास असणार्‍या बहुसंख्य डाव्या कार्यकर्त्यांचे त्यांच्या वैयक्तिक प्रपंचाकडे नेहमीच दुर्लक्ष होते आणि याला भाई सुद्धा अपवाद ठरले नाहीत. मुळातच फार मोठ्या राजकीय महत्त्वाकांक्षा नसणाऱ्या या दृष्ट्या नेत्याचे आज स्मरण करण्याचाच हा कालखंड आहे. तो यासाठी की, आज राजकारण हे गुन्हेगारांचे शेवटचे खात्रीशीर आश्रयस्थान आणि धनदांडग्यांचे वाहन-साधन झाले आहे. समाजामधे प्रतिष्ठेच्या संकल्पना गेल्या तीस वर्षात झपाट्याने बदलत सधनतेशी जोडल्या गेल्या. डिजिटल लावून सामाजिक परिचयाची सुरूवात आणि वाढदिवसांचे अवडंबराने तो उथळ परिचय टिकवण्याची धडपड हा आजकाल सार्वत्रिक नियम बनला आहे. अगतिक आणि भरकटलेल्या आजच्या या सामाजिक कालखंडात, निःस्पृह, निगर्वी, त्यागी, सच्चे समाजसेवक नेते याच भूमीत होऊन गेले, याचे स्मरण करणे आणि आजच्या पिढीला असे लोकनेते ही काल्पनिक गोष्ट नसून एक ज्वलंत वास्तव होते हे पुन्हा एकदा सांगण्याची गरज आहे. आणि म्हणूनच भाई दिनकररावजी नलवडे यांचे आज दि. १४ जुलै रोजी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त स्मरण हा फक्त औपचारिक विषय उरत नाही, तर परिवर्तनवादी चळवळीचे ते आद्य कर्तव्यच बनते. त्यांचे स्मरण करीत माझे भाईंना विनम्र अभिवादन.
 
शब्दांकन: भाई चंद्रशेखर पाटील