पक्ष घटना

भारतीय शेतकरी कामगार पक्ष

प्रास्ताविक

भारतीय शेतकरी कामगार पक्ष हा भारतातील श्रमजीवी जनतेचा पक्ष असून श्रमजीवी जनतेच्या वर्गीय संघटनेचे अग्रदल म्हणून राहण्यासाठी तो आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करील. भारतामध्ये समाजवाद व साम्यवाद प्रस्थापित करणे हे पक्षाचे ध्येय राहील.

    भारतीय शेतकरी कामगार पक्षाने मार्क्सवाद – लेनिनवाद यांचा मार्गदर्शक सिद्धांत म्हणून स्वीकार केला आहे. या मार्गदर्शक सिद्धांतानुसार, आर्थिक व सामाजिक समतेवर आधारलेले शेतकरी व कामगारांचे राज्य स्थापन करण्याचा आणि ज्यात मानवाची मानवाकडून पिळवणूक होणार नाही असा वर्गविहीन समाज निर्माण करण्याचा भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार आहे.
      सामाजिक विकासाच्या सिद्धांताची अचूक मांडणी फक्त मार्क्सवाद लेनिनवाद करतो व समाजवाद आणि साम्यवाद प्रस्थापित करण्यासाठी चोखाळावा लागणारा मार्ग तो अचूक दाखवितो, असा पक्षाचा विश्वास आहे. मार्क्सवाद – लेनिनवाद ऐतिहासिक भौतिकवादाच्या विरोधविकासवादाच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहतो त्याच्याशी पक्ष सहमत आहे. कल्पनावादी व अध्यात्मवादी दृष्टिकोनातून जगाकडे पाहण्याचे तत्त्व पक्षाला मंजूर नाही. मार्क्सवाद – लेनिनवाद म्हणजे ठोकळेबाजी नसून श्रमजीवी जनतेला कार्यप्रवण करणारे ते स्पर्गदर्शक तत्त्वज्ञान आहे, असे पक्षाचे मत आहे. समाजवाद व साम्यवाद यांची बांधणी करण्यासाठी झगडत असताना प्रत्यक्ष वस्तुस्थिती व आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीतील अनुभव हे लक्षात घेऊन दैनंदिन लढ्यातून निर्माण होणारे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मार्क्सवाद लेनिनवादाचा अवलंब करावा, असे पक्षाचे मत आहे. अर्थातच मार्क्सवाद लेनिनवादाचे अबाधित सिद्धांत आणि भारताच्या क्रांतिलढ्यातील प्रत्यक्ष अनुभव यांची सांगड घालण्याचा पक्ष प्रयत्न करील . कोणत्याही प्रकारच्या ठोकळेबाजीला व तत्त्वच्युतीला पक्ष आपल्या कार्यक्रमाद्वारे निकराचा विरोध करील.
    भारतामध्ये जनतेची लोकशाही ताबडतोबीने प्रस्थापित करून समाजवादाची व साम्यवादाची उभारणी करण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्ष  श्रमजीवी जनतेच्या सर्व प्रकारच्या संघटनांद्वारे अविश्रांत प्रयत्न करील.

01.

कलम नं . १ : 

या संघटनेचे नाव’ भारतीय शेतकरी कामगार पक्ष ‘ असे राहील; तथापि पक्षाच्या राज्यशाखांना त्या त्या प्रादेशिक भाषेत पक्षाचे भाषांतरित नाव वापरण्याची मुभा राहील.

02.

कलम नं . २ :  

पक्षाचा झेंडा लाल रंगाचा राहील व त्याच्या लांबीरुंदीचे प्रमाण ३ : २ असे असेल . पक्षाच्या झेंड्यावर मध्यभागी हातोडा व विळा यांचे चिन्ह राहील आणि डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यावर पंचरेषाकृती तीन तारे राहतील . वर्तुळामध्ये कोरलेला हातोडा व विळा आणि पंचरेषाकृती तीन तारे हे पक्षाचे बोधचिन्ह असेल .

03.

कलम नं .३ :  

पक्षाची मध्यवर्ती समिती ठरवील त्या ठिकाणी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय राहील .

04.

पक्ष सभासद , त्यांचे हक्क व कर्तव्ये

कलम नं . ४ :  वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या , पक्षाचे ध्येयधोरण , कार्यक्रम व घटना मान्य असणाऱ्या , पक्षाचे निर्णय अमलात आणण्याची तयारी असणाऱ्या व पक्षाची मध्यवर्ती समिती वेळोवेळी ठरवील ती सभासद वर्गणीदेणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला पक्षाचे सभासदत्व खुले राहील .

05.

कलम नं . ५ :  

नवीन सभासदांना पक्षाच्या सर्वात कनिष्ठ शाखांद्वारे सभासदत्व दिले जाईल . सभासदत्वाच्या मंजुरीसाठी खालील पद्धतीचा अवलंब केला जाईल.

१. मध्यवर्ती समितीने ठरविलेल्या नमुन्याप्रमाणे पक्षसभासदत्वाचा अर्ज पक्षाच्या सर्वात कनिष्ठ शाखेकडे केला पाहिजे . अर्जावर पक्षाच्या दोन सभासदांची शिफारस असली पाहिजे . त्या कनिष्ठ शाखेच्या सर्वसाधारण सभेने सदर अर्जाचा स्वीकार केल्यावर व त्या शाखेहून वरिष्ठ समितीने त्याला मंजुरी दिल्यावर सदर अर्जदार हा पक्षाचा उमेदवार सभासद झाला असे मानण्यात येईल . सहा महिन्यांची उमेदवारी झाल्यावर व जिल्हा समितीने मंजुरी दिल्यानंतरच तो पक्षाचा सभासद झाला असे मानण्यात येईल . तथापि , पक्षसभासदत्वासाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदार जर एखाद्या राजकीय पक्षाचा सभासद असेल तर अशा अर्जदाराने एक वर्षाची उमेदवारी पूर्ण केल्यानंतर व जिल्हा समितीने त्या अर्जाला मंजुरी दिल्यानंतरच त्याला पक्षाचे सभासदत्व मिळेल.

२. पक्षसभासदत्वाच्या अर्जाची शिफारस करणाऱ्या पक्षसभासदांनी अर्जदाराची राजकीय विचारसरणी , स्वभाव व व्यक्तिगत इतिहास यासंबंधी खरीखुरी माहिती पुरविण्याची दक्षता बाळगली पाहिजे . अर्जदाराची शिफारस करण्यापूर्वी त्यांनी त्याला पक्षाचे ध्येय, धोरण, कार्यक्रम व पक्षाची घटना समजावून दिली पाहिजे.

३. उमेदवारीची मुदत संपल्यावर सदर अर्जदार ज्या पक्षशाखेत काम करीत असेल त्या शाखेने अर्जदार हा सभासदाच्या यादीत समाविष्ट करून घेण्यास योग्य आहे किंवा नाही , याचा निर्णय घेतला पाहिजे . हा निर्णय त्या पक्षशाखेच्या सर्वसाधारण सभेने मान्य केला व जिल्हा समितीने त्याला मंजुरी दिली तरच सदर अर्जदाराचा सभासदांच्या यादीत समावेश होईल . संबंधित पक्षशाखा जरूर वाटल्यास उमेदवारीची मुदत आणखी सहा महिन्यांनी वाढवू शकेल . परंतु ही मुदत सहा महिन्यांहून अधिक वाढविता येणार नाही . जर उमेदवार हा सभासद करून घेण्यास अपात्र ठरला तर उमेदवार म्हणून त्याचा जो दर्जा असेल तो देखील संपुष्टात आला असे मानण्यात येईल . ज्या व्यक्तीचा सभासदत्वाचा अर्ज नामंजूर झाला असेल त्या व्यक्तीला त्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर , नवीन अर्ज करण्याची मुभा राहील . पक्षशाखेने उमेदवाराची मुदत वाढविण्याबाबत किंवा उमेदवार म्हणून असलेला दर्जा रद्द करण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयाला पक्षाच्या जिल्हा समितीची मंजुरी घेतली पाहिजे .

06.

कलम नं . ६ :   पक्षसभासदांची कर्तव्ये खाली नमूद केल्याप्रमाणे राहतील .

१. मार्क्सवाद – लेनिनवादाचा अभ्यास करणे व आपली ग्रहणशक्ती व कुवत वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.

२. पक्षाची एकजूट बांधणे व पक्षाचे ऐक्य अबाधित राखणे.

३. पक्षाचे धोरण व निर्णय यांची निष्ठापूर्वक अंमलबजावणी करणे व पक्षाने नेमून दिलेले काम निरलसपणे करणे.

४. पक्षाच्या घटनेचे तंतोतंत पालन करणे.

५. व्यक्तिगत हितसंबंधापेक्षा पक्षाच्या हितसंबंधांना प्राधान्य देणे व जर या दोहोंचा झगडा निर्माण झाला तर पक्षाच्या हितसंबंधांना अग्रस्थान देणे.

६. जनतेची सेवा अंत : करणपूर्वक करून तिच्याशी असणारे संबंध दृढमूल करणे आणि पक्षाचे धोरण व निर्णय जनतेला समजावून सांगणे.

७. टीका आणि आत्मटीका यांचा अवलंब करून पक्ष कार्यातील चुका व उणिवा दाखवून देणे व त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणे आणि त्यासंबंधीची माहिती पक्षाच्या संबंधित समितीला, वरिष्ठ समितीला व मध्यवर्ती समितीला कळविणे.

८. पक्षाने खास सवलत दिली नसेल तर ज्या क्षेत्रात तो काम करीत असेल त्या क्षेत्रातील जनतेच्या संघटनेत स्वत : सहभागी होणे. पक्ष समितीच्या नेतृत्वाखाली कार्य करणे.

07.

कलम नं . ७ :  पक्षसभासदांना खाली नमूद केलेले हक्क राहतील .

१. पक्षाच्या धोरणाशी व कार्यक्रमाशी संबंधित अशा सिद्धान्तविषयक व दैनंदिन प्रश्नाबाबत खुल्या चर्चेत व पक्षाच्या बैठकीत भाग घेणे.

२. पक्षकार्यासंबंधी सूचना करणे.

३. पक्षातील विविध पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीत आपले मत देणे. स्वत : त्या पदाच्या निवडणुकीसाठी उभे राहणे .

४. पक्षाच्या बैठकीमध्ये पक्षाच्या कोणत्याही संघटनेवर वा कार्यकर्त्यांवर विधायक टीका करणे.

५. पक्षसंघटनेकडून शिस्तभंगाचा इलाज केला जात असेल त्या वेळी स्वत: हजर राहून आपली भूमिका मांडणे.

६. ज्या वेळी पक्षाने घेतलेला निर्णय मान्य नसेल त्या वेळी पक्षाच्या प्रमुख समितीला आपले स्पष्ट मत सादर करणे . तथापि मध्यंतरीच्या काळात पक्षनिर्णयाची बिनशर्तपणे अंमलबजावणी करणे.

७. पक्षाच्या मध्यवर्ती समितीसह कोणत्याही पक्षसंघटनेला एखादे निवेदन, विनंतीपत्र वा तक्रार पाठविणे

08.

कलम नं . ८ : 

उमेदवार सभासदांची कर्तव्ये सभासदांच्या कर्तव्याप्रमाणेच राहतील . परंतु त्यांना पक्षांतर्गत निवडणुकीला उभे राहण्याचा, इतरांना निवडून देण्याचा अगर कोणत्याही प्रश्नावर मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

09.

कलम नं . ९ : 

 पक्षाची घटना , धोरण व कार्यक्रम मान्य असणाऱ्या व पक्षाच्या मध्यवर्ती समितीने ठरविलेली वर्गणी देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला  पक्षाचा हितचिंतक होता येईल . पक्षाच्या प्राथमिक संघटनेच्या कोणत्याही बैठकीला शाखेच्या पूर्वपरवानगीने हितचिंतकाला हजर राहता येईल व चर्चेत भाग घेता येईल . तथापि मतदान करण्याचा किंवा इतरांना निवडून देण्याचा किंवा स्वत : निवडून जाण्याचा अधिकार त्यास असणार नाही .

10.

लोकशाही मध्यवर्तित्व

कलम नं . १० :  पक्षाची उभारणी लोकशाही मध्यवर्तित्वाच्या तत्त्वावर झालेली आहे . लोकशाही मध्यवर्तित्व म्हणजे लोकशाही मार्गाने निर्माण केलेले केंद्रीकरण आणि केंद्रीय मार्गदर्शनाखालील लोकशाही . लोकशाही मध्यवर्तित्वाची मूलभूत सूत्रे खाली दिल्याप्रमाणे असतील.

१. पक्षाच्या सर्व पातळीवरील समित्यांच्या निवडणुका होतील.

२. पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन ही पक्षाची सर्वोच्च संस्था राहील. आणि ज्या ज्या विभागाची परिषद ही त्या त्या विभागापुरती सर्वोच्च संस्था राहील. राष्ट्रीय अधिवेशन हे मध्यवर्ती समितीच्या सभासदांची निवड करील आणि विभागीय परिषदा आपापल्या समित्यांच्या सभासदांची निवड करतील. मध्यवर्ती समिती व विभागीय समित्या अनुक्रमे राष्ट्रीय अधिवेशन व विभागीय परिषदा यांना जबाबदार राहतील आणि आपापल्या कामाचे अहवाल सादर करतील.

३.पक्षाच्या सर्व पातळीवरील समित्या , पक्षसभासदांच्या व कनिष्ठ शाखांच्या मतांची दखल घेतील , त्यांच्या अनुभवाचा अभ्यास करतील व त्यांचे चळवळीतून निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यास त्यांना तातडीने मदत करतील.

४. पक्षाच्या कनिष्ठ समित्यांनी आपल्या कामाचा अहवाल वरिष्ठ समित्यांना नियमितपणे पाठविला पाहिजे व ज्या प्रश्नावर वरिष्ठ समित्यांकडून निर्णय हवे असतील त्या प्रश्नावर मार्गदर्शन मागितले जाईल.

५. पक्षाच्या सर्व संघटना सामुदायिक नेतृत्व व वैयक्तिक जबाबदारी या तत्त्वावर काम करतील. सर्व त – हेच्या महत्त्वाच्या प्रश्नावरील निर्णय सामुदायिकरीत्या घेतले जातील. तथापि प्रत्येक व्यक्तीला आपली जबाबदारी जास्तीत जास्त पार पाडण्याच्या कामी मदत केली जाईल.

६. सर्व पातळीवरील पक्ष समित्या पक्षाच्या सर्वसाधारण धशेरणाशी सुसंगत राहून त्यांच्या कार्यक्षेत्रात स्वत : च्या जबाबदारीवर पुढाकार घेऊन कामे करतील.

७. पक्षाचे निर्णय बिनशर्त अमलात आणले जातील. प्रत्येक पक्षसभासद पक्षाचा निर्णय मानील. अल्पसंख्याक हे बहुसंख्याकांचा निर्णय मानतील. कनिष्ठ समित्या वरिष्ठ समित्यांचा व पक्षाच्या सर्व संघटना पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा व मध्यवर्ती समितीचा निर्णय मानतील.

11.

कलम नं . ११:   

पक्षाच्या धोरणासंबंधी प्रमुख समित्यांनी निर्णय घेण्यापूर्वी कनिष्ठ पक्षसमित्या व पक्षसभासद हे पक्षांतर्गत सभेत सदर प्रश्नावर खुली व विधायक चर्चा करतील व आपल्या सूचना प्रमुख समित्यांकडे पाठवतील , मात्र पक्षाच्या प्रमुख समित्यांनी एकदा निर्णय घेतल्यावर ते सर्वांनी मान्य केले पाहिजेत . पक्षाच्या वरिष्ठ समितीने घेतलेला निर्णय हा प्रत्यक्ष वस्तुस्थितीशी विसंगत आहे असे कनिष्ठ समितीला वाटले तर ती समिती त्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती वरिष्ठ समितीला करील . परंतु तरीही वरिष्ठ समितीने पूर्वीचा निर्णय कायम केला तर कनिष्ठ समितीने त्या निर्णयाची बिनशर्त अंमलबजावणी केली पाहिजे.

      राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धोरणाबाबत पक्षाच्या मध्यवर्ती समितीने कोणतेही निवेदन करण्यापूर्वी अगर निर्णय घेण्यापूर्वी कनिष्ठ पक्षसमित्या व पक्षसभासद यांना त्या संबंधात कोणत्याही प्रकारचे विधान सार्वजनिकरित्या करण्याची किंवा निर्णय घेण्याची परवानगी असणार नाही. तथापि त्या प्रश्नांवर पक्षाच्या बैठकीत खुली चर्चा करण्याचा व आपल्या सूचना प्रमुख समित्यांना पाठविण्याचा अधिकार राहील.

12.

 कलम नं . १२ :  

अ.  पक्षाची नवीन शाखा स्थापन करण्याचा अधिकार वरिष्ठ समितीला राहील.

ब.  पक्षाची अस्तित्वात असलेली एखादी शाखा तहकूब अगर बरखास्त करावयाची झाल्यास ती शाखा ज्या पक्षसमितीच्या नियंत्रणाखाली असेल ती समिती त्याबाबत तिच्याहून वरिष्ठ अशा पक्ष समितीकडे आपला अहवाल सादर करील. त्यासंबंधी अंतिम निर्णय ती वरिष्ठ समिती घेईल.

12.

 कलम नं . १२ :  

अ.  पक्षाची नवीन शाखा स्थापन करण्याचा अधिकार वरिष्ठ समितीला राहील.

ब.  पक्षाची अस्तित्वात असलेली एखादी शाखा तहकूब अगर बरखास्त करावयाची झाल्यास ती शाखा ज्या पक्षसमितीच्या नियंत्रणाखाली असेल ती समिती त्याबाबत तिच्याहून वरिष्ठ अशा पक्ष समितीकडे आपला अहवाल सादर करील. त्यासंबंधी अंतिम निर्णय ती वरिष्ठ समिती घेईल.

13.

पक्षाची रचना

कलम नं . १३ :  पक्षाची रचना खाली नमूद केल्याप्रमाणे राहील.

१. पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन.

२. पक्षाची मध्यवर्ती समिती

३. मध्यवर्ती चिटणीस मंडळ

४. जिल्हा परिषद

५. जिल्हा समिती

६. जिल्हा चिटणीस मंडळ

७. तालुका परिषद

८. तालुका समिती

९. प्राथमिक शाखा

१०. प्राथमिक समिती

14.

कलम नं . १४ : 

पक्षाची  नवीन शाखा उघडण्यास खाली नमूद केल्याप्रमाणे किमान सभासदांची आवश्यकता राहील.

१. प्राथमिक शाखा : १० सभासद

२. तालुका परिषद :  २५ सभासद

३. जिल्हा अधिवेशन : २०० सभासद

४. राज्य परिषद ज्या राज्यात किमान तीन जिल्हा परिषद कार्य करीत असतील, त्या राज्यासाठी राज्य परिषद निर्माण केली जाईल.

15.

कलम नं . १५ : 

पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका तसेच पक्षाच्या परिषदा व राष्ट्रीय अधिवेशनाला पाठवावयाच्या प्रतिनिधींच्या निवडणुका मध्यवर्ती समिती ठरवील त्या नियमानुसार गुप्त मतदान पद्धतीने होतील . तथापि प्राथमिक शाखेस जरूर वाटल्यास हात वर करून मतदान घेता येईल. अशा वेळी प्रत्येक उमेदवारासाठी वेगवेगळे मतदान घेण्यात येईल.

16.

कलम नं . १६ :  

 १. मध्यवर्ती समिती , राज्य समित्या व जिल्हा समित्या त्यांना जरूर वाटल्यास त्या त्या क्षेत्रातील पक्षकार्यास चालना देण्यासाठी वेगवेगळ्या पोटसमित्या नेमतील.

 २. निरनिराळ्या राज्यातील पक्षकार्याला मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती समिती तिला जरूर वाटल्यास हंगामी समित्या नेमील.

17.

घटना राष्ट्रीय अधिवेशन व मध्यवर्ती समिती

कलम नं . १७ :  पक्षसभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे राष्ट्रीय अधिवेशन होईल .

  राष्ट्रीय अधिवेशनाला पाठवावयाच्या प्रतिनिधींची संख्या व त्यांच्या निवडणुकीची पद्धती मध्यवर्ती समिती ठरवील. मध्यवर्ती समितीने राष्ट्रीय अधिवेशन किमान चार वर्षांतून एकदा तरी बोलाविले पाहिजे.

       काही विशिष्ट परिस्थितीत मध्यवर्ती समिती सदर अधिवेशन पुढे ढकलील अगर मुदतीपूर्वी बोलावील. काही विशिष्ट परिस्थितीत तसेच राष्ट्रीय अधिवेशन मुदतीत बोलाविणे अशक्य झाल्यास मध्यवर्ती समिती स्वत : ची विस्तृत सभा बोलावील व त्यामध्ये मध्यवर्ती समितीचे सभासद व राज्य समित्यांनी निवडलेले प्रतिनिधी यांचा समावेश होईल. सदर सभा ज्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी बोलाविली असेल त्याच प्रश्नांचा विचार करून निर्णय घेईल.

         राज्य समित्यांपैकी १/२ समित्यांनी किंवा मध्यवर्ती समितीच्या १/२ सभासदांनी मागणी केली तर मागणी केलेल्या तारखेपासून चार महिन्यांच्या आत मध्यवर्ती समितीने राष्ट्रीय अधिवेशन बोलाविले पाहिजे.

18.

कलम नं . १८ :  

पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे कार्य व अधिकार खाली नमूद केल्याप्रमाणे राहतील.

१. मध्यवर्ती समितीने सादर केलेल्या राजकीय ठरावावर व इतर अहवालावर विचारविनिमय करणे व त्याला मंजुरी देणे.

२. पक्षाच्या धोरणाची दिशा निश्चित करणे.

३. पक्षाची घटना दुरुस्त करणे.

४. पक्षाचे हिशेब तपासणे व त्यांना मंजुरी देणे.

५. सरचिटणीस, खजिनदार व मध्यवर्ती समितीच्या सभासदांची निवड करणे.

६. सरचिटणीस, खजिनदार तसेच मध्यवर्ती समिती सदस्य यांची जागा रिक्त झाल्यास , पक्षाची मध्यवर्ती समिती या जागेवर नवीन सदस्याची निवड करील.

19.

कलम नं . १९ : 

१. मध्यवर्ती समितीच्या सभासदांची संख्या सरचिटणीस व खजिनदार या व्यतिरिक्त ६१ राहील.

२. अ . सरचिटणीस आणि खजिनदार हे मध्यवर्ती समितीचे पदसिद्ध सभासद राहतील. 

२. ब . पक्षाचे आमदार , खासदार व जिल्हा चिटणीस हे मध्यवर्ती समितीचे निमंत्रित सदस्य राहतील.

३. नवीन मध्यवर्ती समिती निवडली जाईपर्यंत जुनी मध्यवर्ती समिती काम पाहील.                     

४. दोन अधिवेशनांच्या मध्यंतरीच्या काळात मध्यवर्ती समिती पक्षाच्या सर्व कार्यात मार्गदर्शन करील आणि राष्ट्रीय अधिवेशनाचे निर्णय अमलात आणील आणि नवीन मध्यवर्ती समिती निवडली जाईपर्यंत मध्यवर्ती समितीला राष्ट्रीय अधिवेशनाचे सर्व अधिकार असतील.

५. मध्यवर्ती समिती जनतेच्या राष्ट्रव्यापी संघटनांतील तसेच वैधानिक आघाडीवरील पक्षकार्याचे मार्गदर्शन व नियंत्रण करील.

20.

कलम नं .२० : 

१. मध्यवर्ती समिती आपल्या पहिल्या बैठकीत आपले चिटणीस मंडळ निवडील. सरचिटणीस व खजिनदार हे चिटणीस मंडळाचे पदसिद्ध सभासद राहतील. चिटणीस मंडळाची एकूण सभासद संख्या १९ राहील.

२. पक्षाचे आमदार व खासदार यांना चिटणीस मंडळ बैठकीसाठी आवश्यकतेनुसार निमंत्रित करण्यात येईल.

 ३. मध्यवर्ती समितीच्या दोन बैठकांच्या दरम्यानच्या काळात मध्यवर्ती समितीचे कार्य व अधिकार चिटणीस मंडळाकडे राहतील.

४. मध्यवर्ती समितीची बैठक वर्षातून किमान तीन वेळा बोलाविली जाईल.

५. मध्यवर्ती समितीच्या एक तृतीयांश सभासदांनी विनंती केल्यास त्या तारखेपासून एक महिन्याच्या आत मध्यवर्ती समितीची बैठक बोलाविली जाईल.

 ६. मध्यवर्ती समिती व चिटणीस मंडळ यांच्या बैठका सरचिटणीस बोलावतील.

जिल्हा परिषद व जिल्हा समिती

21.

कलम नं . २१ :  

  • जिल्ह्यातील पक्षसभासदांनी निवडलेल्या प्रतिनिधींची जिल्हा परिषद राहील.
  • जिल्हा परिषदेवर पाठवावयाच्या प्रतिनिधींची संख्या व त्यांच्या निवडणुकीची पद्धती जिल्हा समिती ठरवील व त्यास मध्यवर्ती समितीची मंजुरी घेईल.
  • जिल्हा परिषदेची बैठक वर्षातून किमान एक वेळ तरी बोलाविली जाईल . जर एक तृतीयांश तालुका समित्यांनी अगर जिल्हा समितीच्या एक तृतीयांश सभासदांनी तशी मागणी केली तर त्या तारखेपासून एक महिन्याच्या आत जिल्हा परिषदेची बैठक बोलाविली जाईल.
22.

कलम नं. २२ :  

जिल्हा परिषदेची कामे व अधिकार खाली नमूद केल्याप्रमाणे राहतील.

  • १. जिल्हा समिती व पक्षाच्या इतर संघटनांच्या अहवालावर विचारविनिमय करणे व त्यांना मंजुरी देणे.
  • २. पक्षाचे धोरण व कार्यक्रम यांच्याशी संबंधित प्रश्नांची चर्चा करणे व त्यावर निर्णय घेणे.
  • ३. जिल्हा चिटणीस , खजिनदार व जिल्हा समितीच्या इतर नऊ सभासदांची निवड करणे.
  • ४. जिल्हा समितीचे हिशेब तपासणे व त्यास मंजुरी देणे.
23.

कलम नं . २३ : 

जिल्हा समितीच्या सभासदांची संख्या खालीलप्रमाणे राहील.

  • १. जिल्हा चिटणीस , खजिनदार व जिल्हा परिषदेने निवडलेले नऊ सभासद.
  • २. तालुका समित्यांचे चिटणीस व त्यांनी निवडलेला प्रत्येकी एक प्रतिनिधी व ज्या ठिकाणी तालुका समिती नसेल त्या तालुक्यातील पक्ष सभासदांनी निवडलेला प्रतिनिधी.
  • ३. संघटनात्मक क्षेत्रातील ( शेतकरी सभा, शेतमजूर संघटना, संघटना, महिला संघटना, युवक, विद्यार्थी संघटना) व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षाच्या गटाचा त्या गटाने निवडलेला प्रत्येकी एक प्रतिनिधी कामगार जिल्हा समितीचे निमंत्रित सदस्य असतील.
24.

कलम नं . २४ : 

  •  जिल्हा परिषदेच्या दोन अधिवेशनांच्या दरम्यानच्या कालावधीत जिल्हा समिती पक्षाचे निर्णय व आदेश अमलात आणील. पक्षाच्या स्थानिक स्वरूपाच्या सर्व कार्यात मार्गदर्शन करील, संघटनात्मक क्षेत्रातील व स्थानिक स्वराज्य संस्थांतील पक्षसभासदांच्या कार्यात मार्गदर्शन करील व मध्यवर्ती समितीला आपल्या कामाचा अहवाल नियमितपणे पाठवील.
25.

कलम नं . २५ :

  •  १. नवीन जिल्हा समिती निवडली जाईपर्यंत जुनी जिल्हा समिती काम पाहील.
  • २. जिल्हा समितीची बैठक दोन महिन्यांतून किमान एक वेळ तरी भरेल.
  • ३. जिल्हा समितीच्या एक तृतीयांश सभासदांनी विनंती केल्यास जिल्हा चिटणीस त्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत जिल्हा समितीची बैठक बोलावील.
26.

कलम नं .२६ :  

जिल्हा चिटणीस मंडळ

  • जिल्हा समिती आपल्या पहिल्याच बैठकीत जिल्हा चिटणीस मंडळाच्या नऊ सभासदांची निवड करील. याशिवाय जिल्हा चिटणीस व जिल्हा खजिनदार हे जिल्हा चिटणीस मंडळाचे पदसिद्ध सभासद राहतील. जिल्हा समितीच्या बैठकांच्या दरम्यान जिल्हा समितीचे कार्य व अधिकार जिल्हा चिटणीस मंडळाकडे राहतील.

तालुका परिषद व तालुका समिती

27.

कलम नं . २७ : 

  • ज्या ठिकाणी पक्षाच्या सभासदांची संख्या ५० हून कमी नसेल त्या प्रत्येक तालुक्यात त्या सभासदांची तालुका परिषद राहील. जर बाकीच्या अटी पूर्ण होत असतील तर ५०,००० हून अधिक लोकसंख्या असलेल्या नगराला तालुक्याचा दर्जा दिला जाईल.
28.

कलम नं २८ : 

  • १. तालुका परिषद ही तालुक्यातील पक्षसभासदांची असेल.
  • २. तालुका परिषद वर्षातून किमान दोन वेळा तरी भरेल.
  • तालुका समितीच्या एक तृतीयांश सभासदांनी तशी मागणी केल्यास त्या तारखेपासून एक महिन्याच्या आत तालुका परिषद बोलाविली पाहिजे. तालुका परिषद पहिल्याच बैठकीत खाली नमूद केलेल्या गोष्टी पार पाडील.
  • अ. तालुका समितीच्या अहवालावर व तालुक्यातील पक्षाच्या इतर संघटनांच्या अहवालावर विचारविनिमय करणे व त्यास मंजुरी देणे.
  • ब. तालुका समितीचे हिशेब तपासणे व त्यांना मंजुरी देणे.
  • क. पक्षाचे धोरण व स्थानिक कार्य यासंबंधी चर्चा करणे व निर्णय घेणे.
  • ड . तालुका चिटणीस , तालुका खजिनदार व तालुका समितीच्या ९ सभासदांची निवड करणे . चिटणीस व खजिनदार हे तालुका समितीचे पदसिद्ध सभासद राहतील.
29.

कलम नं . २९ : 

  •  तालुका परिषदेच्या दोन बैठकांच्या दरम्यान तालुका समिती तालुक्यातील पक्षकार्याचे मार्गदर्शन करील. तालुक्यातील संघटनात्मक कार्यात व स्थानिक स्वराज्य संस्थांतील पक्षसभासदांना मार्गदर्शन करील व आपल्या कामाचे अहवाल जिल्हा समितीकडे नियमितपणे पाठवील.
30.

कलम नं . ३० :  

  • तालुका समिती तिला वाटल्यास आपले तालुका चिटणीस मंडळ निवडील . त्यांची सभासद संख्या ५ + २ = ७ असेल. तालुका समितीची बैठक किमान दोन महिन्यांतून एक वेळ तरी भरेल. तालुका समितीच्या एक तृतीयांश सभासदांनी तशी विनंती केल्यास तालुका चिटणीस त्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत तालुका समिती बैठक बोलावील.
31.

कलम नं .३१ :  

  • ज्या ठिकाणी पक्षाची प्राथमिक शाखा नसेल त्या ठिकाणी तालुका समिती पक्षाच्या प्राथमिक शाखेच्या जबाबदाऱ्या पार पाडील.
32.

कलम नं . ३२ :  

  • ज्या वेळी एखाद्या तालुक्यातील पक्षसभासदांची संख्या आवश्यक त्या संख्येपेक्षा कमी असेल त्या वेळी त्या तालुक्यातील पक्षसभासद हे जिल्हा समिती ठरवून देईल त्या तालुका समितीच्या अधिकारक्षेत्राखाली राहतील.

प्राथमिक शाखा व प्राथमिक समिती

33.

कलम नं . ३३ :  

  • ज्या वॉर्डात, खेड्यात किंवा खेड्यांच्या गटांत, कारखान्यात अगर व्यवसायात पक्षाचे पाच किंवा त्याहून अधिक सभासद असतील, त्या ठिकाणी पक्षाची प्राथमिक शाखा सुरू करता येईल.

  • पक्षाची प्राथमिक शाखा आपल्या सर्वसाधारण सभा घेतील व आपला चिटणीस, खजिनदार आणि प्राथमिक समिती निवडतील.

  • पक्षाच्या प्राथमिक शाखेची सर्वसाधारण सभा महिन्यातून किमान एक वेळ बोलाविली जाईल. प्राथमिक समितीच्या एक तृतीयांश सभासदांनी मागणी केल्यास त्या तारखेपासून सात दिवसांच्या आत प्राथमिक शाखेची बैठक बोलाविली पाहिजे.

34.

कलम नं . ३४ :  

  • पक्षाच्या प्राथमिक शाखेची कामे व अधिकार खाली नमूद केल्याप्रमाणे राहतील.

    १. पक्ष आणि पक्षाच्या प्रमुख संघटनांशी , कामगार, शेतकरी, शेतमजूर, युवक – विद्यार्थी, बुद्धिजीवी आणि इतर लोकशाहीवादी जनता यांचे संबंध पक्के करणे.

    २. पक्षाचे धोरण व कार्यक्रम तसेच पक्षाच्या वरिष्ठ शाखांनी दिलेले आदेश व निर्णय यांची अंमलबजावणी करणे. जनतेमध्ये पक्षप्रचार व संघटनात्मक कार्य करणे.

    ३. जनतेच्या भावना व मागण्या यांची सदैव दखल घेणे व पक्षाच्या वरिष्ठ शाखांकडे त्यासंबंधी अहवाल पाठविणे.

    ४. नवीन पक्षसभासद करून घेणे, पक्षसभासदांची वर्गणी गोळा करणे, पक्षसभासदांसाठी आलेल्या अर्जाची छाननी करणे, त्यांना उत्तेजन देऊन सक्रिय करणे आणि त्यांच्या अंगी पंक्षशिस्त बाणविणे.

    ५. मार्क्सवाद – लेनिनवाद आणि पक्षाचे धोरण, कार्यक्रम व अनुभव यांचा अभ्यास करण्याची पक्षसभासदांना प्रेरणा देणे, पक्षसभासदांची तात्त्विक व राजकीय ज्ञानाची पातळी व आकलन वाढविण्यासाठी त्यांची अभ्यास शिबिरे घेऊन त्यांना संघटित करणे.

    ६. देशाच्या राजकीय जीवनात सक्रिय भाग घेण्यासाठी जनतेला उद्युक्त करणे.

    ७. पक्षसभासदांमध्ये टीका आणि आत्मटीका यांना वाव देणे.

    ८. पक्षाचे हितचिंतक नोंदविणे.

शिस्तभंगावर इलाज

35.

कलम नं . ३५: 

  • १. पक्षाच्या सर्व पातळीवरील संघटनांना आपापल्या सभासदांवर ताकीद देणे , अविश्वास व्यक्त करणे यासारख्या साध्या स्वरूपाचा शिस्तभंगाचा इलाज करण्याचा अधिकार राहील.
  • २. जिल्हा समिती व तिच्याहून वरिष्ठ समित्यांना आपापल्या क्षेत्रातील पक्षसभासदांचे विरुद्ध कोणत्याही समितीतून व संघटनेतून काढून टाकणे अगर पक्षसभासदत्व रद्द करणे यासारखा कडक स्वरूपाचा शिस्तभंगाचा इलाज करण्याचा अधिकार राहील. मात्र तसे करण्यापूर्वी त्या समितीने तिच्याहून वरिष्ठ समितीची मंजुरी घेतली पाहिजे.
  • ३. ज्या सभासदांविरुद्ध शिस्तभंगाचा इलाज योजला जात असेल तो सभासद जर मध्यवर्ती समितीचा सभासद असेल तर मध्यवर्ती समितीला त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाचा इलाज करण्याचा अधिकार असेल.
  • ४. पक्षाच्या ज्या समितीच्या बैठकीत शिस्तभंगाच्या इलाजाचा प्रश्न चर्चेला घेतला जाईल, त्या बैठकीला हजर असणाऱ्या दोन तृतीयांश सभासदांनी तो ठराव संमत केला पाहिजे.
36.

कलम नं . ३६

  •  शिस्तभंगाच्या कारवाईसंबंधी खालील पद्धतीचा अवलंब केला जाईल.

    १. संबंधित समिती पक्षसभासदांवर शिस्तभंगाचा इलाज करण्यापूर्वी त्या सभासदाला त्याच्याविरुद्ध असणाऱ्या आरोपांची दखल देईल व संभाव्य इलाजाची कल्पना देईल आणि त्याला त्यासंबंधी खुलासा करण्यासाठी योग्य मुदत देईल.

    २. सदर मुदत संपल्यानंतर संबंधित पक्ष समिती आपल्या बैठकीत सदर सभासदावर शिस्तभंगाचा इलाज करण्याबाबत निर्णय घेईल व आपला निर्णय मंजुरीसाठी वरिष्ठ समितीकडे पाठवील.

    ३. पक्ष समितीने दिलेल्या निर्णयामुळे एखाद्या पक्ष सभासदाला आपल्यावर अन्याय झाला असे वाटत असेल तर त्या निर्णयाविरुद्ध पक्षाच्या मध्यवर्ती समितीपर्यंत दाद मागण्याचा त्याला अधिकार राहील.

    ४. पक्षाच्या मध्यवर्ती समितीचा निर्णय अंतिम समजला जाईल.

37.

कलम नं . ३७ : 

  •  ताकीद देणे, अविश्वास व्यक्त करणे, निर्भर्त्सना करणे , एखाद्या अधिकारपदावरून तात्पुरते दूर करणे.
  • पक्षसभासदत्व काही काळ निलंबित करणे अगर पक्षातून काढून टाकणे असे शिस्तभंगावरील इलाजाचे स्वरूप राहील.

संघटनात्मक क्षेत्र व कायदेमंडळे यांमधील पक्षाचे गट

38.

कलम नं . ३८ : 

 शेतकरी सभा, कामगार संघटना, महिला संघटना , सहकारी संस्था, युवक संघटना, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना यासारख्या जनतेच्या कोणत्याही संघटनेत, कायदेमंडळात अगर स्थानिक स्वराज्य संस्थांत जर कमीत कमी तीन अगर अधिक सभासद असतील तर ते पक्षाचा गट म्हणून काम करतील.

१. असा पक्षगट सामुदायिकरीत्या त्या त्या पातळीवरील पक्षाच्या समितीच्या नियंत्रणाखाली काम करील व आपल्या कामाचा अहवाल त्या समितीला नियमितपणे पाठवील.

२. अशा पक्षगटांचे कार्य, पक्षाचे धोरण व निर्णय यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी स्वीकारणे आणि जनता व इतर कार्यकर्त्यांशी दृढ संबंध बांधणे हे राहील.

पक्षनिधी

39.

कलम नं .३९ :

१. पक्षाच्या प्राथमिक शाखा, पक्षसभासदांकडून सभासद वर्गणी व सहानुभूतिदारांकडून देणगी नियमितपणे वसूल करतील. तथापि प्राथमिक शाखा , एखाद्या सभासदाला, तो कैदेत असेल अगर आजारी असेल अगर अशाच इतर योग्य कारणासाठी सभासद वर्गणी किंवा इतर कोटा ( Quota) माफ करू शकेल.

२. सभासद वर्गणी व सहानुभूतिदारांकडून आलेली देणगी यांची विभागणी मध्यवर्ती समिती वेळोवेळी ठरवील त्याप्रमाणे होईल.

३. पक्षाच्या सर्व पातळीवरील समित्या जनतेकडून देणग्यांच्या रूपाने व सभासद, हितचिंतकांकडून कोट्याच्या (Quota ) रूपाने निधी जमवू शकतील.

४. पक्षाची मध्यवर्ती समिती ही पक्षाच्या सर्व पातळीवरील समित्यांच्या हिशेबांची तपासणी करण्यासाठी तपासनीस किंवा तपासनीत मंडळाची नेमणूक करील.

५. संबंधित पक्ष समित्यांनी ठरविलेल्या पद्धतीने पक्षाच्या सर्व पातळीवरील समित्यांचे हिशेब ठेवले जातील.

40.

पक्षाच्या घटनेची दुरुस्ती

कलम नं . ४० : 

 पक्षाची घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला राहील. घटना दुरुस्त करताना खाली नमूद केलेल्या पद्धतीचा अवलंब केला जाईल.

१. मध्यवर्ती समिती घटनेत बदल सुचवील आणि पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनापूर्वी किमान २१ दिवस पक्षांतर्गत माहितीसाठी विचारविनिमयासाठी ती दुरुस्ती जिल्हा समित्यांकडे प्रसृत करील.

२. कोणताही पक्षसभासद अगर पक्षशाखा पक्षाच्या घटनेत बदल सुचवू शकेल . अशा त – हेचा बदल अगर सूचना मध्यवर्ती समितीकडे राष्ट्रीय अधिवेशनापूर्वी किमान तीन महिने पाठविली पाहिजे . मध्यवर्ती समिती राष्ट्रीय अधिवेशनापूर्वी किमान एक महिना ती सूचना आपल्या मतासह पक्षांतर्गत चर्चेसाठी प्रसृत करील.

३. राष्ट्रीय अधिवेशनाला हजर असणाऱ्या प्रतिनिधींपैकी दोन तृतीयांश प्रतिनिधींनी अशी घटनादुरुस्ती संमत केली तरच पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन ती दुरुस्ती मान्य करील.

41.

पक्षाची मालमत्ता

कलम नं . ४१ :

१. पक्षाची स्थावर व जंगम मालमत्ता राहील . या मालमत्तेत पक्ष निधी, पक्षाला मिळालेल्या देणग्या, सभासद वर्गणी, बँक ठेवीवरील व्याज इत्यादींसह पक्षाच्या कार्यालयाच्या इमारती, पक्षाच्या विविध कार्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या अथवा देणगी म्हणून मिळालेल्या जागांचा व इमारतींचा अंतर्भाव पक्षाच्या मालमत्तेत केला जाईल. अशी मालमत्ता पक्षाच्या नावे धारण करण्यात येईल. त्याचबरोबर पक्षाच्या जागा,इमारती,सभागृह, मुद्रणालय, प्रकाशन विभाग इत्यादी मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंतर्भावही पक्षाच्या मालमत्तेत राहील.

२. पक्षासाठी मालमत्ता खरेदी करणे, असलेल्या मालमत्तेची विक्री करणे, मालमत्ता हस्तांतरीत करणे, भाड्याने देणे यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या चिटणीस मंडळाला असेल व त्यास मध्यवर्ती समितीची मंजुरी घेणे आवश्यक राहील.

३. हिशेब तपासनीचे वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च राहील.

४. पक्षाच्या खात्यातील रक्कम काढणे किंवा पक्षाच्या खात्यात रक्कम भरणे हा बँक खात्यातील व्यवहार पक्षाचे सरचिटणीस व खजिनदार यांच्या संयुक्त स्वाक्षरीने केला जाईल.

५. पक्षाच्या कार्यालयातील दैनंदिन खर्च भागविण्यासाठी स्वतंत्र स्वरूपाचे दैनंदिन खर्चखाते बँकेत उघडण्यात येईल. या खात्यातील दैनंदिन खर्चाची रक्कम सरचिटणीस, खजिनदार व कार्यालयीन चिटणीस यापैकी कोणाही दोघांच्या संयुक्त स्वाक्षरीने काढण्यात येईल . पक्षाच्या दैनंदिन व अन्य खर्चास चिटणीस मंडळाची मान्यता घेणे अनिवार्य राहील.

६. पक्षाच्या स्थावर व जंगम मालमत्तेसंबंधी एखादी तक्रार करण्यात आल्यास अथवा वाद निर्माण झाल्यास यासंबंधी पक्षाच्या मध्यवर्ती समितीने घेतलेला निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.

42.

पोटनियम

कलम नं . ४२ :  

पक्षाच्या निरनिराळ्या शाखांच्या कार्यात सुसूत्रता व कार्यक्षमता आणण्यासाठी पक्षाच्या घटनेस बाध न आणता पक्षाच्या मध्यवर्ती समितीला नियम तयार करण्याचा अधिकार राहील .

 

सभासदत्वाचा अर्ज

भारतीय शेतकरी कामगार पक्ष

सभासदत्वाचा अर्ज

सन्माननीय चिटणीस

१ ) मी आपल्या पक्षाची घटना वाचली आहे . त्या घटनेत निदर्शित केलेल्या ध्येयावर माझा पूर्ण विश्वास असून पक्षाची घटना मला पूर्णपणे मान्य आहे .

२ ) मी आपल्या पक्षाचा हितचिंतक सभासद / सभासद होण्यासाठी हा अर्ज करीत आहे .

३ ) माझ्यासंबंधी खाली जरूर ती माहिती दिली आहे .

पूर्ण नाव :————————-———————————————————————————–

पूर्ण पत्ता  :———————-—————————————————————————————

मुळगाव  :-————————– तालुका :——————————– जिल्हा :————-—————- 
वय :——————————— व्यवसाय :———————–———————————————-

कामगार, शेतकरी, मध्यमवर्ग, विद्यार्थी, महिला इत्यादीपैकी कुठल्या आघाडीवर काम करू इच्छिता?

—————————–—————————————————————————————————-

तारीख :—————–

 

आम्ही सदर ‘अर्जदार’ यांना ओळखतो. आमच्या समजुतीप्रमाणे सदर अर्जदार हा पक्षाचा सभासद होण्यास पात्र असून, तो पक्षाचे कार्य करू शकेल.

पक्ष सभासदाचे नाव : ——————————————————————————————
पत्ता : —————————————————————————————————————————————-
सही——————–
पक्ष सभासदाचे नाव : ——————————————————————————————
पत्ता : ———————————————————————————————————————————————–

सही——————–

अर्ज पोहोचल्याची तारीख                                                अर्ज घेणाऱ्या पदाधिकाऱ्याची सही ——————-

                                                                                                         तारीख

जिल्हा कमिटीचा ठराव नं . ———— ने मान्यता देण्यात आली .

तारीख:——————                                                                    जिल्हा चिटणीस

प्रतिज्ञा

   वर्गविहीन समाजरचना निर्माण करण्याच्या ध्येयावर अढळ निष्ठा ठेवून ते ध्येय साधण्यासाठी शक्य तितक्या  लवकर  श्रमजीवी वर्गाचे राज्य देशात प्रस्थापित करण्याकरिता अविश्रांतपणे झगडण्याची मी प्रतिज्ञा करतो.

    मी जातीभेद मानणार नाही. जातीभेदामुळे समाजात फुटीरपणा माजतो आणि खऱ्या मानवी समतेवर आधारलेली नवसमाजरचना अस्तित्वात येणे अशक्य होते . सबब जातीभेद नष्ट करण्यासाठी मी नित्य झटेन.

 शेतकरी – कामगारवर्गाची पळवणूक करणाऱ्या सरंजामशाही, भांडवलशाही, साम्राज्यशाही, हुकूमशाही यांची सत्ता नष्ट करून समाजात कोणत्याही स्वरूपात पिळवणुकीला अवसर मिळणार नाही, यासाठी सतत प्रयत्न करीन.

देशात खरीखुरी लोकशाही स्थापन केल्यावाचून देशाचे स्वातंत्र्य बळकट होणार नाही आणि किसान – कामगारांचे राज्य स्थापन केल्याशिवाय खरी लोकशाही अस्तित्वात येणार नाही. सबब देशात खरीखुरी लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी व स्वातंत्र्यरक्षण करण्यासाठी मी सदैव झटेन.

मार्क्सवादावर अढळ विश्वास असणारा पक्षच किसान – कामगारांचे राज्य प्रस्थापित करू शकेल, अशी माझी निष्ठा आहे. समाजवादी विचारसरणीचा निर्भेळपणे अंगीकार करून वर्गीय संघटनेवर आधारलेला पोलादी शिस्तीचा शेतकरी कामगार पक्षच हे ध्येय गाठू शकेल. सबब या पक्षाच्या आदेशाप्रमाणे वागून व पक्षाची शिस्त पाळून ध्येयपूर्तीसाठी सतत लढण्याची मी प्रतिज्ञा करतो.

ता. —————-                                                                              सही