भारतीय शेतकरी कामगार पक्ष

९ वे अधिवेशन – पोयनाड

दि.२८ फेब्रुवारी व १ व २ मार्च १९६९
 

राजकीय ठरावाचा मसुदा

 

प्रस्तावना

गेली वीस वर्षे भारताचा राज्यकारभार काँग्रेसच्या हातात आहे . १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी तर निरंकुश सत्ता होती . काँग्रेसने कल्याणकारी राज्यापासून समाजवादी समाजपद्धतीपर्यंत एकूण एक घोषणा केल्या आहेत . पार्लमेंटमध्ये ठराव पास करून समाजवादी समाजपद्धती प्रस्थापित करण्याची घोषणा सरकारीरीत्या करण्यात आली . नियोजनाचा अंगीकार करून काँग्रेस सरकारने तीन पंचवार्षिक योजना राबविल्या . या तीन योजनांच्या काळात एकूण वीस हजार सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली , असे सांगण्यात येते . राष्ट्रीय उत्पन्नात पहिल्या दोन योजनांच्या काळात एकूण ४२.६ टक्के व तिसऱ्या योजनेच्या काळात १३.८ टक्के वाढ झाली . पहिल्या दोन योजनांच्या काळात दरडोई उत्पन्नात १७.५ टक्के वाढ झाली , तर तिसऱ्या योजनेच्या काळात ही फक्त १.७ % एवढीच आहे . लोकशाही , सर्वांना समान संधी ही राज्यकारभाराची सूत्रे म्हणून सांगण्यात आली होती . वैधानिक लोकशाही हा राज्ययंत्रणेचा प्रकार कायम करण्यात आला . सर्व राष्ट्रांशी मैत्री आणि कोणत्याही लष्करी गटात सामील न होणे अशा प्रकारची तटस्थता हे आमच्या परराष्ट्रीय राजकारणाचे सूत्र ठरविण्यात आले होते . गेल्या वीस वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था स्वावलंबी , समर्थ व स्वयंगतिमान होईल , स्वातंत्र्य व सार्वभौमत्व यांचा विकास होईल आणि ऐक्य व राष्ट्रीयत्व भारतीय समाजात वाढीस लागेल , अशा अपेक्षा बाळगण्यात येत होत्या . काँग्रेसने या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत असाच निर्वाळा सर्व विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ आज देत आहेत . भारतीय अर्थव्यवस्थेची पाहणी केल्यास राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येईल . १९५०-५१ साली भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ९५३० कोटी रु . होते , ते १९६४-६५ साली २००१० कोटी रुपयांचे झाले . याच काळात म्हणजे मे १९६८ अखेर भारताने परकीय देशांकडून ९८९२ कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे . या प्रचंड कर्जाचे हप्ते व व्याज भरण्याची ऐपत नसल्यामुळे नवीन कर्ज काढून आपण जुन्या कर्जाचे हप्ते व व्याज भागवीत असतो . परदेशातून फार मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची आयात करावी लागत आहे . स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या दहा वर्षांत आपण दरवर्षी सरासरी १५० कोटी रुपयांचे अन्नधान्य आयात करीत होतो . भाकरीसाठी परकीय देशांवर अवलंबून राहण्याची परिस्थिती कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस हे परावलंबन अधिकाधिक वाढत आहे . १९६० ते १९६६ या ७ वर्षांत भारताने १७२४ कोटी रुपयांचे अन्नधान्य आयात केले ! ( पाहा पॉकेट बुक ऑफ इकॉनॉमिक इन्फर्मेशन १९६७ , पृ . ४५ , भारत सरकारच्या अर्थखात्याचे प्रकाशन ) हे परावलंबित्व भयानक आहे . आमच्या स्वातंत्र्याला व सार्वभौमत्वाला ते एक आव्हानच आहे . राष्ट्रीय उत्पन्नात काही वाढ झाली असली तरी दरमहा दरमाणशी उपभोगाचे सरासरी प्रमाण ग्रामीण भागात २२.३१ रुपये व शहरी भागात ३२.९ ६ रु . एवढेच आहे . रोजगार विनिमय केंद्राकडे नोकऱ्यांसाठी नांवे नोंदविणाऱ्यांची संख्या ३८ लाखांवर गेली आहे . एकूण बेकारांची संख्या दीड कोटीपेक्षा अधिक झाली आहे . ग्राहक किमतीचा निर्देशांक १९५१ साली १०२.३ होता , तो १९६७ साली २०३.४ पर्यंत चढला आहे . कामगारांची खरी मिळकत वाढण्याऐवजी ढासळत आहे . त्यांच्या खऱ्या वेतनाचा निर्देशांक १९५१ साली १०९ .२ होता , तो १९६४ साली १०२ पर्यंत खाली आलेला आहे . रुपयाच्या अवमूल्यनानंतर तर तो आणखी खाली आला आहे . शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणात झपाट्याने वाढ होत आहे . शेतमजुरांच्या संख्येतही वाढ झाली आहे याच कालात कारखानदारांच्या नफ्यात वाढ झाली आहे . १९६७ हे वर्ष मंदीचे मानण्यात येत असले तरी कारखानदारी , व्यापारी संस्था , बँका यांच्या नफ्याची सरासरी १० टक्क्यांच्या आसपास राहिलेली आढळून येते . शेती उत्पादनात चढउतार आढळून येतात . तथापि शेती उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यास सरकारला कधीच यश आलेले नाही . भारतीय अर्थव्यवस्थेतील अनागोंदी कारभाराचे परिणाम समाजव्यवस्थेवर होणे साहजिकच आहे . १९६४ सालापासून गेल्या चार वर्षांत समाजजीवनातील अस्थिरता वाढू लागली आहे . विशेषत : जातीय दंग्यांनी उत्तर भारतातील बहुतेक शहरे ग्रासून टाकलेली आढळतात . हिंदी व इंग्रजी हा भाषिक वाद चिघळून निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय मालमत्तेची खूप मोठी हानी करण्यात आली . १९६४ नंतरच्या काळात सरकारी कर्मचारी , बँक कर्मचारी , आयुर्विमा कर्मचारी , शिक्षक , वृत्तपत्रक्षेत्रातील कर्मचारी इत्यादी पांढऱ्या कॉलरवाल्या कर्मचाऱ्यांनी संप , निदर्शने या मार्गाचा अवलंब केला आहे . ठिकठिकाणचे विद्यार्थी एकसारखे उफाळून उठत आहेत . भारतातील प्रत्येक राज्यात विद्यार्थ्यांची आंदोलने उठत आहेत . या सर्व असंतोषावर उपाय म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचा नारा लावण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे . गेल्या ४-५ वर्षांत यासाठी अनेक परिषदा व परिसंवाद घेण्यात आले . तथापि राष्ट्रीय एकात्मता म्हणजे नेमके काय याचाच राज्यकर्त्यांना आणि तथाकथित विचारवंतांना निर्णय करता आलेला नाही . राष्ट्रीय एकात्मतेची घोषणा करीत करीत सरकारने अतिशय क्रूर व पाशवी पोलिसी दडपशाहीचा अवलंब करून विद्यार्थ्यांची व कर्मचाऱ्यांची आंदोलने चिरडून टाकण्याचा सपाटा लावला आहे . काही ठिकाणी तर लष्कराची मदतसुद्धा वापरायला सरकारने मागेपुढे पाहिलेले नाही . तेवढ्यानेही भागत नाही म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर व आंदोलनांवर बंदी घालण्यासाठी वटहुकूम काढण्यात आले . आणि सरतेशेवटी पार्लमेन्टमधील बहुमताच्या जोरावर संपाला बंदी घालणारा कायदाही पास करून घेतला . खाजगी कारखानदारीतील कामगारांना अशा सरकारकडून सवलती अथवा संरक्षण मिळण्याची तर सुतराम शक्यता नाही . औद्योगिक क्षेत्रात बेकारी आल्याची हूल उठवून टाळेबंदीचा राक्षस कामगारांच्या समोर उभा करण्यात आला आहे . या टाळेबंदीच्या आणि तद्जन्य बेकारीच्या दहशतीखाली कामगारांवर कामवाढ , वेतनकपात व काही ठिकाणी अर्धे काम लादण्यात येत आहे . गेल्या दोन वर्षांत पांढरपेशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या आंदोलनांमुळे वेतन मंडळे अथवा लवाद ही तरी मिळाली ; परंतु खाजगी कारखानदारीतील कामगारांना कोणतीही सवलत मिळाली नाही . उलट त्यांच्यावर जेवढे म्हणून अत्याचार करणे शक्य आहे तेवढे केले जात आहेत . लाचलुचपत , वशिलेबाजी , पित्तेबाजी हे दोष तर समाजाचे स्थायीभाव होऊन बसले आहेत . आमदार , खासदार , राजकीय नेते , मंत्री विकत घेतले जाऊ शकतात , तेथे सरकारी कर्मचारी म्हणजे कोणत्या झाडाचा पाला ? अफरातफर , निरनिराळी कुलंगडी तर सर्व सरकारी खात्यांत नियम होऊन बसली आहेत . सहकारी संस्थाही अफरातफरीचे अड्डे बनले आहेत . या सर्वांच्या भरीला गटबाजी , गुंडगिरी , दबाव या गोष्टी राजकारणातील उघडउघड साधने बनली आहेत . मतांची खरेदी करणे हा निवडणुकीतील साळसूद मार्ग ठरत आहे . माणसाची माणुसकी ही चीज आता वाङ्मयातच राहिली असून प्रत्यक्ष व्यवहारात मात्र माणसाच्या ज्ञानाची , विज्ञानाची अथवा कलेची किंमत पैशाच्या स्वरूपात मोजली जाऊ लागली आहे . माणूस , त्याचे ज्ञान , कला या सर्व बाबी विक्रीयोग्य वस्तू होऊन बसल्या आहेत . या सर्वांचा परिणाम म्हणून जनतेचा शासनयंत्रणेवरचा विश्वास डळमळू लागला आहे . काँग्रेस पक्षाविषयीचा असंतोष वाढू लागला आहे . जातीयवादी , धर्मवादी व प्रतिगामी शक्तींनी आपले डोके वर काढले आहे . सारी समाजव्यवस्था विकल होत चालली आहे . काँग्रेस पक्ष देशाचे नेतृत्व करू शकेल हा विश्वास राहिलेला नाही . अशा स्थितीत देशाचे स्वातंत्र्य , सार्वभौमत्व सामर्थ्यशाली होईल , अर्थव्यवस्था स्वावलंबी बनेल , सामाजिक सुधारणा होईल व राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल , असा विश्वासच जनतेला मिळू शकत नाही . मग समाजवादी समाजपद्धतीची निर्मिती काँग्रेस पक्षाच्या हातून होईल अशी कल्पनादेखील करवत नाही . भारतीय समाजव्यवस्थेत आज जी विकलता व विफलता आढळून येत आहे तिची कारणपरंपरा शोधणे आवश्यक आहे . ही कारणे समाजाच्या अर्थव्यवस्थेत आढळून येतात . समाजाची अवस्था , सामर्थ्य ही शेवटी जनतेच्या आर्थिक कुवतीवर अवलंबून असतात . आर्थिकदृष्ट्या दुबळ्या लोकांचा समाज समर्थ होऊ शकत नाही . देशाला स्वावलंबी बनवू शकत नाही . काँग्रेस राज्यकर्त्यांनी भारतीय समाजाला गेल्या वीस वर्षांत अधिक दुर्बळ आणि विकल केले आहे .

*प्रतिगामी भांडवलशाहीचा व्याप वाढला*

१९४७ साली काँग्रेसच्या हातात भारताचा राज्यकारभार आला त्या वेळी भारताची अर्थव्यवस्था वासाहतिक स्वरूपाची होती . ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी भारताला कच्च्या मालाच्या खरेदी व पक्क्या मालाच्या विक्रीची बाजारपेठ म्हणून वापरण्याचे अर्थकारण केले होते . पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कापड , ज्यूट आदी उपभोग्य वस्तूंचे उत्पादन सुरू झाले होते . ग्रामीण अर्थव्यवस्थेवर संस्थानिक , जहागिरदार , सावकार यांची हुकमत होती . ब्रिटिश भांडवलदार व्यापारी भांडवलाच्या साह्याने भारताची सर्वांगीण लूट करीत होते . १९४७ नंतर या परिस्थितीत फरक पडू लागला . काँग्रेसने देशी भांडवलदारांना कारखानदारीत शिरण्यास उत्तेजन दिले . बँकधंद्याला प्रोत्साहन दिले . पंचवार्षिक योजना आखून सार्वजनिक मालकीक्षेत्रात काही मूलभूत उद्योगधंदे काढण्याचे धोरण स्वीकारले . खाजगी कारखानदारीला परकीय कर्जे , तांत्रिक मदत वगैरे मिळवून दिली . खेरीज इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशनसारख्या संस्था स्थापन करून उद्योगपतींना पुरविण्याची व्यवस्था केली . या धोरणाचा परिणाम म्हणून भारतात कारखानदारीचा व्याप वाढू लागला . १९५१ साली कारखानदारीतील जॉइंट स्टॉक कंपन्यांचे भरणा झालेले भांडवल ७७ कोटी रुपयांचे होते . १९६६-६७ साली ते ३१० कोटी रुपयांचे झाले . १९५१ साली खाजगी कारखानदारीत काम करणाऱ्या कामगारांची दैनिक हजेरी २९ लाख होती , ती १९६५ साली ४७ लाखांच्या आसपास गेली . १९६०-६१ साली १३३३ निवडक कंपन्यांच्या मालाची विक्री २९८२.७ कोटी रु . होती , ती १ ९६४-६५ साली ४३६ ९.९ कोटी रुपयांची झाली . गेल्या वीस वर्षांत बँक व्यवसायाचा व्याप असाच वाढला आहे . १९५०-५१ साली शेड्युल्ड बँकांच्या ठेवी ८८० कोटी रुपयांच्या होत्या . १९६८ साली या ठेवींचा आकडा ३८७४.४ कोटी रुपयांवर गेला आहे . १९५१ साली या बँकांनी कारखानदारांना १९६ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा केला होता . १९६६ साली हा कर्जपुरवठा १५०० कोटी रुपयांवर गेला आहे . बँकांनी दिलेल्या एकूण कर्जापैकी ६४ टक्के कर्ज उद्योगधंद्यांना व २० टक्के कर्ज शेतीमालाची घाऊक खरेदी करणाऱ्या व्यापारी कंपन्यांना दिले आहे . भारतातील कारखानदारीचा आणि बँक व्यवसायाचा व्याप वाढत असला तरी या कंपन्या संपूर्णपणे भारतीय नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे . भारतातील खाजगी कंपन्यांतून जून १९४८ २८४.६ कोटी रुपये किमतीचे परकीय भांडवल होते . १९६५ साली ते ९३५ कोटी रुपयांचे झाले आहे . तेलधंद्यात ते २२.३ कोटी रु . होते . आज ते १७७.८ कोटी रु . झाले आहे . कारखानदारीत ते ७०.७ कोटी रुपयांवरून ४५८.६ कोटी रुपयांवर गेले आहे . १९४८ सालापर्यंत फक्त ब्रिटिश भांडवल भारतीय अर्थव्यवस्थेत मोक्याच्या जागा अडवून बसले होते . आता अमेरिका , पश्चिम जर्मनी , जपान , कॅनडा या भांडवलदारी देशांतून भारतात फार मोठ्या प्रमाणावर परकीय भांडवल येत आहे . भारतातील बहुतेक मोठ्या कंपन्यांतून परकीय कंपन्यांची रीतसर भागिदारी सुरू झाली आहे . भारतातील वाढत्या कारखानदारीच्या क्षेत्रात आणखी काही ठळक गोष्टी नजरेस येतात . त्यातील पहिली म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपन्यांच्या संख्येत झालेली घट ही होय . १९५०-५१ साली भारतात १२५६८ पब्लिक लिमिटेड कंपन्या होत्या . १९६५-६६ साली ही संख्या ५९०२ पर्यंत खाली आली . म्हणजेच या काळात मोठमोठ्या कंपन्यांनी लहान कंपन्या गिळंकृत केल्या . त्यांचे भरणा झालेले भागभांडवल ५७ कोटींवरून १३२ कोटी रुपयांवर गेले . यावरून भारतीय औद्योगिक क्षेत्रातील केंद्रीकरणाच्या वेगाची कल्पना येते . औद्योगिक क्षेत्रातील हे केंद्रीकरण इतक्या झपाट्याने वाढत आहे , की भारताच्या एकंदर औद्योगिक क्षेत्रात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या कंपन्या आणि ६०-७० औद्योगिक घराणी सर्व अर्थव्यवस्थेवर निरंकुश सत्ता गाजवितात . भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवलशाही मक्तेदारीचा व्याप वाढला आहे , एवढेच नमूद करून भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप पूर्णपणे स्पष्ट होत नाही . भारतीय शेतीव्यवस्था भारताच्या समाजव्यवस्थेची प्रमुख भागीदार आहे . भारतीय लोकसंख्येपैकी ७० टक्के लोकसंख्या शेतीव्यवस्थेवर अवलंबून आहे . शेतीव्यवसायात जे उत्पन्न निर्माण होते त्यावरच या ७० टक्के लोकसंख्येचे जीवन अवलंबून आहे . शेतीव्यवसायात जमीन व शेतीवर राबणारांचे श्रम हेच मुख्य भांडवल आहे . भारतात १९४८-४९ साली पिकाखाली १११.९ दशलक्ष हेक्टर जमीन होती , ती १९६४-६५ साली १५८.१ दशलक्ष हेक्टर झाली . या जमिनीची मालकी मात्र केंद्रीत होत आहे . जमीन मालकीसंबंध सुधारण्यासाठी म्हणून अनेक कायदे झाल्यानंतरही ७४.५ टक्के शेतकऱ्यांकडे फक्त ३० टक्के जमीन आहे . या शेतकऱ्यांकडे प्रत्येकी ३ हेक्टरपेक्षा ( ७१/२ एकर ) कमी जमीन आहे . याउलट २४.५ टक्के जमीनमालकांकडे ७० टक्के जमीन आहे . आणखी खोलात गेल्यास असे दिसून येते की , फक्त ६.६ टक्के जमीनमालकांकडे ५८ टक्के जमीन आहे , तर सर्वात वरच्या फक्त ०.३ टक्के बड्या जमीनमालकांकडे ११.६ टक्के जमीन आहे . वेगवेगळ्या कुळकायद्यांची अंमलबजावणी होऊनही मोठ्या प्रमाणावर कुळांचीच ते कसत असलेल्या जमिनीवरून हकालपट्टी झाली आहे . शेतीव्यवसायातून १९६५-६६च्या अंदाजाप्रमाणे ६९०८ कोटी रुपयांचे उत्पन्न आले . त्याच सालच्या अंदाजाप्रमाणे २०९४ कोटी रुपयांचा खर्च खते , पाणी , बी - बियाणे , बांधबंधिस्ती यासाठी झाला . उरलेली रक्कम केवळ शेतीव्यवसायातील लोकांसाठीच नव्हे , तर सर्व ग्रामीण विभागासाठी राहिली . ज्यांची जमीन अधिक त्याला त्या प्रमाणात अधिक उत्पन्न राहणार हे ओघानेच आले . सुमारे ४० कोटी लोकसंख्येला वर्षाच्या श्रमाचा मोबदला म्हणून सरासरीने १२५ रुपये पदरात पडणार . शेतीधंद्याच्या निकृष्ट अवस्थेचे हे विदारक चित्र आहे . शेतीव्यवसाय निकृष्ट आहे , मागासलेला आहे , शेतकरीवर्ग अज्ञानी आहे , या गोष्टी गेली वीस वर्षे आम्हाला पुन : पुन्हा सांगण्यात येत असतात ; परंतु या परिस्थितीत काही सुधारणा झाली आहे , असे सांगण्याचे धाडस सरकारचा कोणताही प्रवक्ता करू शकणार नाही . मागासलेली शेतीव्यवस्था म्हणजे भांडवलदारांना सापडलेले कुरण होय . शेतीव्यवसायात भांडवल निर्मिती होत नाही , अशी तक्रार ब्रिटिश राजवटीपासून करण्यात येत होती . गेल्या वीस वर्षांच्या काँग्रेस राजवटीत या परिस्थितीत काही सुधारणा झाली असे म्हणावयास वाव नाही . चौथ्या पंचवार्षिक योजनेसाठी नियोजन मंडळाने जमा केलेल्या माहितीवरून १९६०-६१ साली शेतीव्यवसायात शेतकऱ्यांनी आपल्या श्रमाव्यतिरिक्त १८९० कोटी रुपये गुंतविले होते असे दिसून येते . १९६५-६६ साली ही रक्कम २०९४ कोटी रुपये असावी असा अंदाज करण्यात येतो . पाच वर्षांत भांडवलगुंतवणुकीत झालेली ही वाढ अतिशय उपेक्षणीय आहे . शेतीव्यवसायातील भांडवलनिर्मितीचा मुख्य आधार म्हणजे शेतीउत्पन्न . या शेतीमालाची भांडवलदारांनी एवढी प्रचंड लूट चालविली आहे , की शेतकरीवर्ग उठून उभा राहूच शकत नाही . भारताचे शेतीउत्पन्न ६९०८ कोटी रुपयांचे असून त्यापैकी अन्नधान्याचा हिस्सा ३३२५ कोटी रुपयांचा आहे . उरलेला हिस्सा बाजारी पिकांचा आहे . अन्नधान्याच्या विक्रीचा प्रश्न बाजूला ठेवला तरी शेती उत्पादनापैकी निम्म्या उत्पादनाचे भवितव्य बाजार पेठेतील चढउतारावर अवलंबून आहे हे स्पष्ट आहे . अन्नधान्याच्या व्यापारात सरकारने हस्तक्षेप केला असला तरी तो इतका जुजबी व सदोष आहे , की त्याचा प्रत्यक्षात कसलाही प्रभाव पडलेला नाही . शेती मालाच्या किमती काय येणार यावर शेतकऱ्यांचे उत्पन्न व त्याची भांडवलनिर्मिती अवलंबून आहे . कारण त्याला मिळालेल्या उत्पादनातूनच त्याला त्याच्या कुटुंबाची भूक आणि जमिनीची भूक भागवावी लागते . शेतीमालाची बाजारपेठ आज वेगवेगळ्या कायद्यांनी नियमित केली असल्याचा व शेतकऱ्यांची लुबाडणूक थांबविली असल्याचा कितीही डांगोरा पिटला जात असला तरी कारखानदार , घाऊक व्यापारी , अडते आणि बँका यांच्याच ताब्यात ही बाजारपेठ आजही आहे . अन्नधान्याच्या व्यापारापैकीदेखील ७५ टक्के व्यापार खाजगी व्यापाऱ्यांच्या हातात आहे . शहरी लोकसंख्येला पुरवावे लागणारे धान्य खरेदी करण्यापलीकडे सरकारने फारशी प्रगती केलेली नाही . अशा स्थितीत बँक भांडवलाचा पगडा या बाजारपेठेवर असणे स्वाभाविक आहे . रिझर्व्ह बँकेकडून या बँक भांडवलाचे नियंत्रण केले जाते , असे सांगण्यात येते . परंतु प्रत्यक्षात अनुभव असा येतो की , सुगीच्या वेळी रिझर्व्ह बँक खाजगी बँकांवर मर्यादा घालते व सुगी संपताच या मर्यादा सैल केल्या जातात . परिणामी सुगीवर शेतीमालाच्या किमती घसरतात आणि शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्यांच्या गुदामात गेल्यानंतर किमती चढू लागतात . बहुसंख्य शेतकरी हे अडलेले विक्रेते असतात . त्यामुळे योग्य किंमत येईपर्यंत तो माल साठवून ठेवूशकत नाहीत . शेतकऱ्याला किफायतशीर किमती मिळू शकत नाहीत . त्याने घातलेले भांडवल व केलेले श्रम यांचा मोबदला त्याच्या पदरात पडत नाही . त्याचा व्यवसाय तोट्यात चालू असल्यामुळे शेतीव्यवसायात भांडवलनिर्मिती होऊ शकत नाही . शेतकरी शेतीव्यवसाय पर्यायाने कारखानदार व बँका यांचा बळी ठरत आहे . काँग्रेस सरकारने यावर उपाययोजना म्हणून सहकारी संस्था व सहकारी यंत्रणेमार्फत कर्जपुरवठा करण्याचे ठरविले . भांडवल म्हणून कर्ज देण्याची व्यवस्था झाली तरी बाजारपेठेतील किमतीच्या लहरी आणि शेतकऱ्यांचा आतबट्ट्याचा व्यवहार या गोष्टी लक्षात घेता शेतकऱ्यांच्या ठिकाणी कर्ज फेडण्याची कुवत त्यामुळे निर्माण होत नाही . १९६५-६६ साली सहकारी संस्थांमार्फत ३४५ कोटी रुपयांची कर्जे शेतकऱ्यांना वाटण्यात आली ; परंतु त्यातून शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा कमी होण्यास मदत झाली नाही . सहकारी सोसायट्यांच्या कर्जाचा काँग्रेसला मात्र एक उपयोग झाला . सहकारी संस्थांतील दादा म्हणून शेतकऱ्यांच्या डोक्यावर एक नवीन ' दादा ' आला . आतापर्यंत भारतातील उद्योगपती बाजारपेठेमार्फत शेतीव्यवसायावर नियंत्रण ठेवीत आले . आता प्रत्यक्षात शेतीव्यवसायात शिरण्याचा प्रयत्न ते करीत आहेत . आपणाला शेती करण्यासाठी मोठमोठी क्षेत्रे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी त्यांनी सरकारकडे सुरू केली . सरकारने ही मागणी मान्यही केली ; परंतु लोकमत बिथरल्यामुळे ही योजना काही काळ स्थगित करण्यात आली आहे . उद्योगपतींनी आता दुसरा मार्ग काढला आहे . तो म्हणजे शेतीव्यवसायाला कर्जपुरवठा करण्याचा . सधन शेतकऱ्यांना यांत्रिक औजारे घेण्यासाठी , पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी व जमीनसुधारणा करण्यासाठी व्यापारी बँका कर्जपुरवठा करणार आहेत . अशा रीतीने बँक भांडवलाला शेतीव्यवसायाची दारे खुली करून देण्याचे सरकारने ठरविले आहे . शेती कर्जपुरवठा संस्था अखिल भारतीय स्वरूपात निघणार आहेत . या भांडवलाला शेतीव्यवसायात प्रवेश मिळाल्यास शेतीव्यवसायावर उद्योगपती , कारखानदार , पकड बसेल . हा काळ आता फारसा दूर राहिलेला नाही. काँग्रेसने नागपूर अधिवेशनात सहकारी शेतीच्या कार्यक्रमाचा पुकारा केला होता . शेतीव्यवसाय करणाऱ्या सहकारी संस्था अजून कुठेच मूळ धरू शकलेल्या नाहीत . एवढेच नव्हे , तर काँग्रेस राज्यकर्त्यांचा सहकारी शेतीबाबतचा उत्साह पार मावळला आहे . याउलट शेतकऱ्यांनी बिगर शेती उद्योगधंदे उभारावेत , शेतीचे आधुनिकीकरण करावे , सुधारलेले बी - बियाणे वापरावे , अशा योजना पुढे येत आहेत . सरकारच्या धोरणाकडे पाहता , सहकारी शेतीचा कार्यक्रम त्यांनी सोडून दिला आहे हे स्पष्ट होते . शेतीत सुधारित बी - बियाणे , खते , यांत्रिक औजारे यावर भर देणे म्हणजे सधन व मोठ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे होय . कमी जमीन असलेला , कमी पत असलेला शेतकरी या आधुनिकीकरणाच्या कार्यक्रमात भाग घेऊ शकत नाही . सहकारी संस्थांचे जाळे खेडोपाड्यापर्यंत पोहोचले आहे असे मानले तरी थोडाफार कर्जपुरवठा करण्यापलीकडे या सहकारी संस्थांची मजल गेलेली नाही . कर्जवसुली वेळेवर न होऊ शकल्यामुळे कागदोपत्री वसुली झाल्याचे दाखविणे एवढेच काम या सोसायट्या करीत आहेत . व्यापार , शेतीमालावर प्रक्रिया करून तेल , साखर , सूत वगैरे तयार करणाऱ्या लहानमोठ्या कारखान्यांची उभारणी सहकारी तत्त्वावर गेल्या काही वर्षांत झाली आहे . तथापि या सहकारी संस्थांचा कारभार पाहिल्यास भांडवली कंपन्या आणि या सहकारी संस्था या दोहोत फक्त नाममात्र फरक आढळतो . या संस्था भरमसाट उधळमाधळ करीत असतात . शिवाय या संस्था त्या त्या भागातील काँग्रेसचे अड्डे बनण्यातच धन्यता मानीत आहेत . कर्ज व भांडवलाच्या रूपाने जमा केलेले भांडवल निवडणुका व काँग्रेसमधील गटबाजीचे संवर्धन यासाठीच खर्च होत आहे . त्यामुळे सरकारी संरक्षण असूनदेखील या संस्था वाजवी नफे मिळवू शकत नाहीत. शेतीव्यवसाय हा जसा बाजारपेठेच्या जुगारावर अवलंबून आहे , तसाच तो निसर्गाच्या लहरीवर पावसाच्या कमीअधिक प्रमाणावर - अवलंबून आहे . या अडचणीतून मार्ग काढण्याचा सरकारने अजूनही गंभीर प्रयत्न केलेला नाही . १९४८ साली सरकारी कालव्याखाली भिजणारी जमीन ६.४ दशलक्ष हेक्टर होती , ती १९६४-६५ साली ९.९ दशलक्ष हेक्टर झाली . विहिरीसह एकूण बागायतीक्षेत्र १९४८-४९ साली १८.९ दशलक्ष हेक्टर होते , ते १९६४-६५ साली २६.२ दशलक्ष हेक्टर झाले . भारतातील बागायत जमिनीचे प्रमाण सुमारे २० टक्के एवढेच पडते . महाराष्ट्रात तर हे प्रमाण ९ टक्क्यांच्या आसपासच आहे . या देशातील बहुतांश जमीन कोरडवाहूच आहे . तिची सर्व मशागत व उत्पन्न पावसाच्या लहरीवर अवलंबून आहे . अशा स्थितीत उत्पादन वाढविण्याचा कोणताही खात्रीलायक कार्यक्रम काँग्रेस सरकारजवळ नाही हे स्पष्ट झाले आहे . यामुळे शेतीक्षेत्रात शेतकऱ्याकडे त्याचे श्रम व तुटपुंजी जमीन याखेरीज दुसरी कोणतीही सुविधा नाही . मग भांडवलनिर्मिती होणार कधी ? आणि शेतीव्यवसायाची उत्पादनक्षमता वाढणार कशी ? या स्थितीत हा दुबळा आणि आतबट्ट्याचा व्यवसाय उद्योगपतींच्या वर्चस्वाखाली गेला नाही तरच नवल !

*आर्थिक नियोजनाचा बोजवारा*

आर्थिक नियोजनाचा कार्यक्रम आखताना देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात भरघोस वाढ करणे , जड व मूलभूत उद्योगधंद्यांची उभारणी करून झपाट्याने औद्योगिकरण घडवून आणणे , रोजगारधंद्यात वाढ करून बेकारीला आळा घालणे आणि देशातील आर्थिक विषमता कमी करणे ही उद्दिष्टे जाहीर करण्यात आली होती . शेती उत्पादनात अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही हे खुद्द योजनाकारच मान्य करतात . औद्योगिक क्षेत्रातही उपलब्ध उत्पादनक्षमता पूर्णपणे वापरली जात नाही . आर्थिक विषमता तर कमी होण्याऐवजी वाढत आहे . राष्ट्रीय उत्पन्नात थोडीफार वाढ झाली आहे ; परंतु ती देखील अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे . तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस घेतलेल्या आढाव्यावरून कॉस्टिक सोडा , डिझेल इंजिन्स व सिंथेटिक फायबर्स या वस्तू वगळल्यास इतर क्षेत्रात एकही उद्दिष्ट गाठण्यात यश आलेले नाही . मूलभूत उद्योगधंदे तसेच वस्तूंचे उत्पादन या दोन्ही क्षेत्रात हीच अवस्था आहे . १९५६ साली भारत सरकारने औद्योगिक धोरण जाहीर केले होते . त्यानुसार जड व मूलभूत उद्योगधंदे खास सार्वजनिक मालकी विभागात काढले जाणार होते . परंतु तीन पंचवार्षिक योजनांच्या अखेरीस असे दृश्य दिसत आहे , की तेल , कोळसा , ॲल्युमिनियम , खते व रसायने अशा महत्त्वाच्या मूलभूत उद्योगधंद्यांमध्ये सरकारनेखाजगीभांडवलाला प्रवेश दिला आहे . परकीय भांडवलदारी कंपन्या यांना जहाजवाहतूक , ॲल्युमिनियम , लोखंड , कोळसा , खते या वस्तूंच्या उत्पादनक्षेत्रात अभूतपूर्व सवलती दिल्या गेल्या आहेत . खाजगी कंपन्यांच्या संचालकानाच सरकारी कंपन्यांच्या व्यवस्थापन मंडळात मानाच्या व मोक्याच्या जागा देण्याचे धोरण काँग्रेस सरकारने अवलंबले आहे . सार्वजनिक मालकीच्या कारखान्यांतून अगर खाणीतून निर्माण होणाऱ्या मालाच्या किमती ठरविताना खाजगी कंपन्यांच्या दडपणाला सरकार बळी पडते हा अनुभव नेहमीचाच आहे . परिणामी सार्वजनिक मालकी विभाग हा खाजगी कारखानदारीच्या शेपटासारखा झाला आहे . सार्वजनिक मालकी विभागाचे क्षेत्र काहीसे वाढूनदेखील एकूण अर्थव्यवस्थेवर अजूनही त्याचा काहीच प्रभाव पडू शकत नाही . राष्ट्रीयीकरणाखाली आलेले स्टेट बँक आणि विमा व्यवसाय आहेत . यामधून जे भांडवल निर्माण होते त्यापैकी बराच मोठा भाग खाजगी कारखानदारीला मिळतो . आयुर्विमा कॉर्पोरेशनने गुंतविलेल्या एकूण रकमेपैकी १९ टक्के रक्कम खाजगी कंपन्यांतून गुंतविलेली आहे . याखेरीज इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन , इंडस्ट्रियल क्रेडिट आणि इन्व्हेस्टमेंट सेंटर यासारख्या संस्था काढून खाजगी कारखानदारीला सरकारने उत्तेजन दिले आहे . १९४८ व १९५६ अशा दोन्ही वेळेस पास केलेल्या औद्योगिक धोरणविषयक ठरावांना सरकारने आपल्या धोरणानेच मूठमाती दिली आहे . या पार्श्वभूमीवर भारतातील नियोजनाची दिशा व स्वरूप स्पष्ट होते . हे नियोजन राष्ट्रीय विकासासाठी नसून भांडवलशाहीच्या हितासाठीच राबविले जात आहे . भांडवलशाहीला मुळातच नियोजन नको होते . भांडवलशाहीवर कोसळणाऱ्या आर्थिक अरिष्टापासून तिला वाचविण्यासाठी सरकारचे संरक्षण हवे होते . ते त्यांनी गेल्या वीस वर्षांत भरपूर प्रमाणात मिळविले आहे . भारताच्या आर्थिक नियोजनाचा डोलारा मुख्यत : परकीय मदतीवरच रचण्यात आला होता . देशातल्या देशात भांडवलनिर्मिती करण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले . परकीय मदत व कर्जे मिळवून सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात कारखानेही निघाले . परंतु या कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या मालाला गिऱ्हाईक मिळेना . उपलब्ध उत्पादनक्षमता पूर्णपणे वापरता येईना . नफ्याचे प्रमाण कायम ठेवून मालाची विक्री होऊ शकत नाही . कर्जाचे हप्ते व व्याज तर दिले पाहिजे . नवीन कर्जे मिळविली पाहिजेत . साम्राज्यवाद्यांचे नियंत्रण असलेल्या इतर बाजारपेठांतून भारतीय मालाला योग्य भाव मिळू शकत नाही . त्या बाजारपेठांतून माल विकायचा झाल्यास अतिशय स्वस्त दराने विकण्याची तयारी करावी लागते . कारखानदारांचे नफे तर टिकविण्याचा प्रयत्न चालूच आहे . निर्यात मदत देण्यात आली . परदेशी बाजारपेठेत माल विकल्यामुळे जेवता तोटा आला असेल तेवढी भरपाई करून देण्याचाही प्रयत्न करण्यात आला . सरकारी खजिन्यातून करोडो रुपयांची सबसिडी कारखानदारांना देण्यात आली . परकीय चलनाची अतिशय चणचण असतानाही निर्यातीमधून उपलब्ध होणारे काही परकीय चलन त्या त्या कंपन्यांना देण्याच्या धोरणाचाही अवलंब करण्यात आला , एवल्यानेही हा प्रश्न सुटला नाही . अमेरिकन सामाज्यवाद्यांनी आणि जागतिक बँकेच्या मुत्सद्यांनी भारत सरकारला रुपयाचे अवमूल्यन करण्यास भाग पाडले . सरकारने काही खळखळ करताच साम्राज्यवाद्यांनी त्यांना दिली जाणारी मदत बंद केली व चौथ्या योजनेसाठी आपण किती मदत करू याबाबत निश्चित काही बोलायचे टाळण्यास सुरुवात केली . भारत सरकार नाक मुठीत धरून शरण गेले आणि रुपयाचे अवमूल्यन करण्याचा निर्णय घेण्यात आला . अवमूल्यनाने भारताचा फायदा होण्याची सुतराम शक्यता नव्हती . भारतीय मालाची परकीय बाजारपेठेतील किंमत वाढली . अवमूल्यनानंतर आमची निर्यात फार मोठ्या प्रमाणावर वाढेल व परकीय चलनाची चणचण कमी होईल असे सरकारतर्फे सांगण्यात येत होते . परंतु अनेक अर्थशास्त्रज्ञ असे सांगत होते , की भारत सरकारचे हे समर्थन लंगडे आहे . आमची निर्यात ही बहुतांश पारंपरिक असल्याने व फारशी लवचीक नसल्यामुळे अवमूल्यनामुळे ती फारशी वाढणार नाही . प्रत्यक्षात तसेच घडले आहे . अवमूल्यनानंतर आमची निर्यात फारशी वाढली नाही . थोडीफार निर्यात वाढली . असे असले तरी त्यातून जे परकीय चलन मिळाले ते कमीच होते . १९६५-६६ साली भारताची निर्यात ८०५.६ कोटींची होती . अमेरिकन डॉलरमध्ये तिची किंमत १६९ .२ कोटी डॉलर्स होती . १९६६-६७ साली भारताची निर्यात १०९४.९ कोटी रु . होती . परंतु अमेरिकन डॉलर्समध्ये त्यातून फक्त १५५.८ कोटी डॉलर्स मिळाले . याउलट आयातीचा बोजा वाढत गेला . १९६५ ६६ साली भारताची आयात १४१०.१ कोटी रुपयांची हाती . अमेरिकन डॉलर्समध्ये तिची किंमत २९६.२ कोटी होती . परंतु १९६६-६७ मध्ये अमेरिकन डॉलर्समध्ये २७१ कोटी डॉलर्स किमतीचा माल आयात करण्यात आला व त्याची भारतीय रुपयांत १९०१.८ कोटी रु . किंमत झाली . साम्राज्यवाद्यांनी भारतावर रुपयाचे अवमूल्यन लादून भारताची किती लूट चालवली आहे हे यावरून लक्षात येईल . याहीपेक्षा आणखी एका मार्गाने त्यांनी भारताची आहे . भारताने अमेरिकन साम्राज्यवाद्यांकडून व त्यांच्या दोस्तांकडून घेतलेल्या परकीय कर्जाचा बोजा रुपयाच्या अवमूल्यनामुळे एका रात्रीत ५७ टक्क्यांनी वाढलेला आहे . यापायी भारताला सुमारे १५०० ते १६०० कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे . देशाची अशा रीतीने लूट चालू असतानाच हिंदी उद्योगपतींनी मात्र व्याजाचा दर , अबकारी कर , कॉर्पोरेशन टॅक्स वगैरे बाबतीत फार महत्त्वाच्या सवलती सरकारकडून पदरात पाडून घेतल्या आहेत . परकीय खाजगी भांडवलाच्या भागीदारीत ( Collaboration ) निरनिराळे उद्योगधंदे काढण्यासाठी अनेक सवलती मिळविल्या . रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परकीय भांडवलदारी कंपन्यांचा व साम्राज्यवादी शक्तींचा प्रभाव वाढला हे तर खरेच ; परंतु भारतीय नियोजनाचे कंबरडेच मोडून पडले आहे . तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर चौथ्या योजनेच्या आकारमानाविषयी मोठमोठ्या चर्चा चालू होत्या . चौथी योजना २५ हजार कोटी रुपयांची असावी असा मसुदा तयार झाला . नंतर ती २१ हजार कोटींच्या आसपास खाली आणण्यात आली . परंतु परकीय मदत किती मिळेल याचा निश्चित अंदाज लागेना आणियांची योजना तर परकीय मदतीच्या कुबड्यांखेरीज एक पाऊल पुढे टाकू शकत नाही . अशा स्थितीत नियोजनाला एक वर्ष सुटी देण्यात आली . नंतर ही सुटी एकसारखी वाढविण्यात आली . गेली तीन वर्षे या देशात नियोजनाला सुटी देऊन आता नव्याने चौथ्या योजनेचा विचार चालू आहे . स्वावलंबी अर्थव्यवस्था उभारण्याची घोषणा करणाऱ्या राज्यकर्त्यांना आता आढळून आले आहे की , भारतीय अर्थव्यवस्था स्वत : च्या पायावर पुढे तर जाऊ शकत नाहीच ; परंतु ती स्वत : च्या पायावर ताठपणे उभीदेखील राहू शकत नाही . या भयानक घसरगुंडीला आमचे राज्यकर्तेच सर्वस्वी जबाबदार आहेत . गेल्या वर्षी ( १९६७ साली ) औद्योगिक क्षेत्रात विशेषत : इंजिनीयरिंग व कापडधंद्यात मंदीची लाट आली असे सांगण्यात येत होते . कोळसा , इंजिनीयरिंग माल , कापड यांचे साठे पडून होते . त्या मालाला परदेशात मागणी नव्हती आणि देशातल्या गिऱ्हाईकाजवळ तो माल खरेदी करण्याइतपत क्रयशक्ती नव्हती . अनेक कारखान्यांनी टाळे बंदीची व वेतनकपातीची तयारी चालविली . गेल्या वीस वर्षांत भांडवलशाहीने भारतीय अर्थव्यवस्थेत जो धुडगुस घातला होता , त्याचा हा अपरिहार्य परिणाम होता . देशात करोडो लोक अर्धनग्नावस्थेत वावरत असतानाही गिरण्यांतून कापडाचे साठे पडून राहतात . इंजिनीयरिंग धंद्यात मालाला उठाव नाही म्हणून कोळसा पडून आहे . पोलाद पडून आहे . साऱ्या औद्योगिक क्षेत्रात उत्पादन कमी होऊनदेखील मालाचे साठे वाढत होते . मालाचा उठाव होत नाही म्हणून तो करण्यासाठी किमतीमध्ये घट करण्याची कारखानदारांची बिलकूल तयारी नाही . याउलट याही काळात त्यांनी किमतीमध्ये थोडीफार वाढच केली . कारखानदारांना नफे हवेत ; उत्पादनवाढ नको होती . नफ्याला कात्री लावण्याची गरज पडू नये म्हणून त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे कर्जाची मागणी केली . रिझर्व्ह बँकेने त्यांना त्यांच्या साठ्यावर भरपूर कर्जे दिली . व्याजाच्या दरात सवलती दिल्या . सरकारने निर्यातीसाठी वारेमाप सवलती दिल्या . कारखानदारांचे नफे टिकविण्यासाठी सरकारने राष्ट्रीय संपत्तीचा आणखी काही भाग हा उद्योगपतींच्या पदरात टाकला . देशातील जनतेची क्रयशक्ती वाढवून देशी बाजारपेठेचा विकास करण्याऐवजी देशातील जनता या वस्तूंशिवाय राहिली तरी चालेल , कारखानदारांचे नफे सुरक्षित राहिले पाहिजेत , हीच भूमिका सरकारने स्वीकारली . भारतीय भांडवलशाहीचे खरे स्वरूप या मंदीच्या काळात स्पष्ट झाले आहे . भारतीय भांडवलशाहीचा व्याप वाढला आहे ; परंतु सरकारी संरक्षण असूनदेखील तीस्वत : च्या पायावर उभी राह शकलेली नाही . भारतीय भांडवलशाहीने आपलेसामर्थ्य वाढविण्यासाठी परकीय साम्राज्यवादी मक्तेदार भांडवलाची फार मोठ्या प्रमाणावर मदत घेतली . परिणामी , भारतीय भांडवलशाही परकीय मक्तेदार भांडवलाची शेपूट बनली आहे आणि भारतीय जनतेच्या रक्तशोषणावर ती जगू पाहत आहे . भारतीय अर्थव्यवस्थेवर मक्तेदारी भांडवलाची पकड अधिक बळकट झाली हे जरी खरे असले तरी प्रत्यक्षात परकीय भांडवलाचा आणि साम्राज्यवाद्यांचा प्रभाव वाढणारच आहे . भारतीय अर्थव्यवस्था अधिकाधिक परावलंबी होणार आहे . भारतीय समाजव्यवस्थेच्या वृक्षावर वाढलेले बांडगूळ असे भारतीय भांडवलशाहीचे स्वरूप आहे . हे बांडगूळ असेच निर्वेध वाढू दिल्यास एक दिवस ते सबंध समाजवृक्षच ग्रासून टाकील , हा धोका वेळीच ओळखला पाहिजे . भारतीय भांडवलशाहीचा व्याप वाढत असताना आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होत असतानाही भांडवलशाहीच्या या अवस्थेत भारतीय अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष काहीही सुधारणा झालेली नाही . जगातील इतर मागासलेल्या देशांच्या अर्थव्यवस्थेशी भारतीय अर्थव्यवस्थेची तुलना केल्यास त्यांच्यापेक्षाही आपली प्रगती मंदावलेली दिसून येईल . भारतीय अर्थव्यवस्थेला भांडवलशाहीने ग्रासल्यामुळे येथील समाजव्यवस्थेवर अपरिहार्यपणे काही गंभीर परिणाम झाले आहेत . त्याची फळे आपण गेली वीस वर्षे भोगीत आहोत . भांडवलशाहीला संरक्षण देऊन तिच्या व्यापाला हातभार लावणाऱ्या काँग्रेसचे स्वरूपच त्यामुळे आरपार बदलून गेले आहे . स्वातंत्र्यपूर्वकाळातही काँग्रेसमध्ये भांडवलदारांचा प्रभाव होता , ही गोष्ट जरी खरी असली तरी राष्ट्रीयत्वाने भारलेले असंख्य कार्यकर्ते काँग्रेसच्या निशाणाखाली एकत्र आले होते . स्वातंत्र्योत्तरकाळात काँग्रेस हा एक राजकीय पक्ष बनला . राजकीय पक्ष हा वर्गीय राजकारणात कोणत्या ना कोणत्या जनविभागाचे हत्यार बनतो . भांडवलशाही वाढविण्यास कारणीभूत असणारा काँग्रेस पक्ष भांडवलशाहीचेच हत्यार बनणे क्रमप्राप्त होते . वीस वर्षांच्या कालावधीत काँग्रेस पक्ष भांडवलशाहीचा विशेषत : मक्तेदार भांडवलदारांचा दलाल बनला आहे . राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रीय नेतृत्वाची जागा काँग्रेसने केव्हाच सोडली आहे . मक्तेदार भांडवलदारांचा आदेश किंवा त्यांना पोषक होतील असे कार्यक्रम राज्ययंत्रणेमार्फत अमलात आणणे हेच कार्य काँग्रेस पक्ष करीत आहे . भांडवलशाहीने आपल्या पुरस्कर्त्या राजकीय पक्षाला - काँग्रेसला- आपण जसे आपला दलाल बनविले आहे तसेच या देशातील बुद्धिजीवी समाजघटक , नोकरशाही , वृत्तपत्रे यांनाही आपल्या वर्चस्वाखाली घेतले आहे . वृत्तपत्राच्या क्षेत्रात तर अखिल भारतीय साखळ्या निर्माण झाल्या आहेत . ही साखळी वृत्तपत्रे निरनिराळ्या मक्तेदार उद्योगसमूहांच्या हातात आहेत . उच्चशिक्षण क्षेत्रात , विद्यापीठीय क्षेत्रात प्रतिगामी विचारांना खतपाणी घालण्याचे कार्य अतिशय पद्धतशीर रीतीने केले जाते . भिन्नभिन्न उद्योगसमूहांकडून सामाजिक संस्था , शैक्षणिक संस्था , व्यायाम संस्था इत्यादी कार्यांना मदत देताना , या सर्वच क्षेत्रात प्रतिगामी विचारांची मंडळी वाढावीत असा दृष्टिकोन ठेवून संस्थांवर देणग्यांची खैरात केली जात आहे . ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्यांना लागणारे कारकून तयार करण्यासाठी इंग्रजी शिक्षणाचा या देशात प्रसार केला , तर दुबळ्या समाजव्यवस्थेत प्रतिगामी विचारांचा प्रसार करणारे सुशिक्षित तयार करणे भांडवलशाहीला आवश्यक वाटू लागले आहे . म्हणून शिक्षणाचा व्याप वाढविण्यापेक्षा बहुजनसमाजाला शिक्षणाची दारे बंद कशी करता येतील याचा विचार ते करीत आहेत . याच विचाराचा मासलेवाईक नमुना म्हणजे कोठारी कमिशनचा अहवाल होय . नोकरीधंद्याच्या उपलब्धतेच्या प्रमाणातच उच्च माध्यमिक व उच्चशिक्षण मर्यादित करण्याची शिफारस या अहवालात अंतर्भूत आहे . आणि एवढ्या मोजक्या लोकांनाच सरकारने हे शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा असा त्यांचा सल्ला आहे . यावरून भांडवलशाहीने भारतीय समाजव्यवस्थेवर आपली हुकमत प्रस्थापित केली आहे , हे जरी खरे असले तरी भारतीय भांडवलशाही मूलत : दुबळी , प्रतिगामी व गतिशून्य आहे . भारतीय समाजव्यवस्थेचे मूलभूत नव्हे तर तात्कालिक स्वरूपाचेदेखील प्रश्न सुटू शकणार नाहीत . मूलत : दुबळी असणारी भारतीय भांडवलशाही भारताचे स्वातंत्र्य , सार्वभौमत्व सामर्थ्यशाली करण्याचा प्रयत्न करू शकणार नाही . तिच्या मार्गाने गतिमान अर्थव्यवस्थाही निर्माण होऊ शकणार नाही , हे स्पष्ट आहे .

*भारतापुढील मुख्य समस्या

गेल्या वीस वर्षांत काँग्रेस राजवटीत जनतेच्या किमान गरजा अन्न , वस्त्र , निवारा , आरोग्य व शिक्षण भागल्या तर नाहीतच ; परंतु नजीकच्या काळातदेखील या गरजा भागल्या जातील अशी परिस्थिती दिसत नाही . आज देशामध्ये ५० कोटी लोकसंख्या आहे . १९६१ च्या खानेसुमारीप्रमाणे श्रम करणारांची टक्केवारी ४३ होती . काम मागणारांना या देशात पुरेसे काम मिळत नाही . बेकारांची व अर्धबेकारांची संख्या एकसारखी फुगत आहे . काम करणाऱ्या बहुसंख्य लोकांना पुरेसे वेतन मिळत नाही . आठ तास घाम गाळणारा माणूस आपल्या कुटुंबीयांचे पोषण करू शकत नाही . देशातील काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला काम व पुरेसे वेतन मिळवून देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी होती . परंतु काँग्रेस सरकारने गेल्या २० वर्षांत ही जबाबदारी पार पाडण्याची तर नव्हेच ; परंतु स्वीकारण्याचीसुद्धा तयारी दाखविलेली नाही . काँग्रेस सरकारने फक्त कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे . तथापि कुटुंबनियोजनाने हा प्रश्न सुटू शकणार नाही . कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम या देशातील प्रचंड व प्रगाढ अज्ञानामुळे बहुतांशी अयशस्वी झाला आहे हे तर खरेच ; तथापि तो कार्यक्रम १०० टक्के यशस्वी झाला असे गृहीत धरले तरी आज श्रम करण्यास समर्थ असलेले व आज जन्माला येणारे पुढील काही वर्षांच्या कालखंडात काम मागायला पुढे येणार आहेतच . या सर्वांना पुरेसे काम व योग्य वेतन मिळवून देण्याचा वकूब काँग्रसे सरकारजवळ बिलकूल नाही . भारताची ८२ टक्के लोकसंख्या ग्रामीण विभागात राहते . त्यांचे एकूण भवितव्य शेतीव्यवसायाशी निगडित आहे . देशात तयार होणाऱ्या मालाची ही मुख्य बाजारपेठ आहे . साहजिकच शेतीव्यवसायातील सुधारणांवर भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती अवलंबून आहे . शेतीची उत्पादनक्षमता वाढवण्यावरच भारतीय जनतेच्या अन्नाचा , कपड्याचा व निवाऱ्याचा प्रश्न अवलंबून आहे . एवढेच नव्हे , तर देशाच्या औद्योगिकीकरणाचा पायाच मुळी शेतीव्यवसाय आहे . म्हणूनच शेती व औद्योगिक क्षेत्रातील समस्या याच भारतापुढील प्रमुख समस्या आहेत . त्यांचे स्वरूप जसे आर्थिक आहे तसेच ते सामाजिक व राजकीयही आहे .

१ ) शेतीक्षेत्रातील जमीन मालकीसंबंध अजूनही बहुतांशी सरंजामी स्वरूपाचे आहेत . त्यांनाच सरकारने भांडवलशाही स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे . त्यामुळे हजारो एकर जमिनीवर मालकी सांगणारे परंतु शेतीच्या प्रगतीसाठी काडीचीही भागीदारी न करणारे जमीनमालक आजही आहेत . सरकारच्या ताब्यातही लक्षावधी एकर जमीन कसण्यायोग्य अशी निव्वळ पडून आहे . या साऱ्या जमिनी गोरगरीब शेतकरी व शेतमजूर यांना वाटून दिल्या पाहिजेत . मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी या जमिनी उपलब्ध होतील तेथे शेतमजुरांच्या सहकार्याने सरकारी शेतीसंस्था काढल्या पाहिजेत .

२ ) शेतीक्षेत्रात श्रम करणाऱ्या शेतकरी शेतमजुरांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळण्याची हमी देणे अतिशय महत्त्वाचे आहे . शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या उत्पन्नात वाढ होणे जरूर आहे व त्यासाठी शेतीमालाच्या किफायतशीर किमतीचा प्रश्न सुटला पाहिजे . काँग्रेस सरकारच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणामुळे शेतीमालाच्या किमती ठरविण्याची नाडी उद्योगपती , अडते व बँका यांच्याच हातात आहे . ही व्यवस्था पार बदलून शासनाने हा प्रश्न आपल्या पातळीवरून सोडवला पाहिजे . सर्व प्रकारच्या घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण केले पाहिजे . शेतकऱ्याला येणारा उत्पादनखर्च व शेतकरी आणि शेतमजूर यांना मिळणे जरूर असलेले वाजवी जीवनमान या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन शेतीमालाच्या किफायतशीर किमती शासनसंस्थेने ठरवून दिल्या पाहिजेत व त्यांची हमी दिली पाहिजे . शेतीक्षेत्रात भांडवलनिर्मिती करण्याचा व अधिकाधिक भांडवल गुंतवणूक करण्याचा आणि शेती उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांची व शेतमजुरांची मिळकत वाढविण्याचा हा एक मार्ग आहे . शेतीव्यवसायाच्या आधुनिकीकरणाचीदेखील ती गुरुकिल्ली आहे . शेतीव्यवसाय दुबळा व आतबट्ट्याचा राहू देऊन केवळ कर्जरूपाने भांडवलपुरवठा करून शेतीव्यवसाय सुधारू शकणार नाही .

३ ) ग्रामीण विभागातील तरुणांना आधुनिक शेतीशास्त्रात पारंगत करावयाच्या सार्वत्रिक सक्तीच्या वमोफत शिक्षणाची मोहीम प्रभावीपणे अमलात आणणे जरूर आहे . त्यामुळे शेतीला विज्ञानाची जोड तर मिळेलच ; परंतु समाजपुरुष परंपरागत दुष्ट रूढी , जातिभेद , अंधश्रद्धा आणि दैववाद यांच्या जोखडातून मुक्त होईल . भारतीय समाजव्यवस्थेच्या प्रगतीची ती एक पूर्वअट आहे .

४ ) आजच्या औद्योगिक धोरणात आमूलाग्र बदल करावा लागेल . १९५६ च्या सरकारी औद्योगिक धोरणाप्रमाणे जड व मूलभूत उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात सार्वजनिक उद्योगधंद्यांची वाढ करण्याचे व गरज पडेल तेथेच पूरक म्हणून खाजगी उद्योगधंद्यांना वाव देण्याचे धोरण अभिप्रेत होते . परंतु प्रत्यक्षात मात्र उलटा प्रकार झाला . खाजगी कारखानदारीने शेष जबाबदारी उचलण्याऐवजी सरकारी कारखानदारीलाच बहुतेक क्षेत्रांतून गचांडी देण्यात यश मिळविले आहे . सरकारने खाजगी कारखानदारीपुढे सपशेल लोटांगण घातले आहे . खत उत्पादनासारख्या मूलभूत उद्योगधंद्यात खाजगी मालकीच्या कारखानदारीला मुक्तद्वार देण्याचे व जेथे खाजगी कारखानदारी अपुरी पडेल तेथेच फक्त शेष जबाबदारी घेण्यासाठी सार्वजनिक मालकीच्या उद्योगधंद्याने पुढे यावे असे धोरण अलीकडेच भारत सरकारने स्वीकारले आहे . वस्तुत : जड व मूलभूत उद्योगधंदे सरकारी क्षेत्रात तर आले पाहिजेतच ; परंतु मोठमोठ्या उद्योगधंद्यांवर सरकारी मालकी प्रस्थापित झाली पाहिजे . शेतीव्यवसायाचे आधुनिकीकरण करण्यासाठी यांत्रिक औजारे , खते , वीज , इंजिन्स , वाहतुकीची साधने , रसायने , जंतुनाशके इ . उद्योगधंद्यांना प्राधान्य देऊन औद्योगिक क्षेत्र व शेतीव्यवसाय यांची सांगड घातली पाहिजे .

५ ) परदेशी व्यापार , बैंका , अंतर्गत घाऊक व्यापार , मालवाहू जहाजवाहतूक , जनरल विमा योजना इ . व्यवसायांचे राष्ट्रीयीकरण करून उद्योगपतींच्या हातात अडकून पडलेले भांडवल मुक्त करून राष्ट्रीय विकासाच्या कार्यक्रमात त्याचा वापर केला पाहिजे . भारतीय अर्थव्यवस्था मक्तेदारी व परकीय भांडवलदारी कंपन्या यांच्या दुष्ट युतीतून सोडविण्याचा हा मार्ग आहे . भारतीय अर्थव्यवस्थेपुढील या समस्या आहेत . याच मार्गाने भारतीय अर्थव्यवस्थेला प्रगतिपथावर वाटचाल करण्यास सामर्थ्य येईल , देशातील जनतेला काम व किमान जीवनवेतन मिळवून देण्याची हमी देता येईल आणि घरे , रस्ते , पाटबंधारे , शैक्षणिक सोयी व आरोग्यविषयक कार्यक्रम पुरेशा प्रमाणात हाती घेता येईल . हा कार्यक्रम अमलात आणायचा झाल्यास काँग्रेस सरकार आणि त्यांचे कायदे यांचा फार मोठा अडसर आहे . काँग्रेस सरकारने भारतीय संविधानात तरतूद करून भांडवलशाहीला कायद्याचे संरक्षण दिले आहे . त्याच्या जोडीला त्यांनी शासनव्यवस्था पूर्णपणे प्रतिगामी नोकरशाहीच्या हातात दिली आहे . यात बदल करायचा म्हणजे राजसत्ताच बदलणे जरूर आहे . ही शासनव्यवस्था बदलणे ही भारतातील मुख्य राजकीय समस्या आहे .

काॅग्रेसने तर शासनव्यवस्थेलादेखील भांडवलशाही स्वरूप दिले आहे . ही शासनव्यवस्था बदलून जनतेची शासनव्यवस्था निर्माण करायची म्हणजे काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचून त्या ठिकाणी पर्यायी शासनव्यवस्था निर्माण केली पाहिजे . भांडवलशाहीला समाजवादाशिवाय अन्य पर्याय नाही . अर्थातच समाजवाद हा काही एका रात्रीत प्रस्थापित होणार नाही . त्यासाठी आवश्यक ती आर्थिक , राजकीय व सामाजिक परिस्थिती निर्माण केली पाहिजे .

नियोजनाचे भवितव्य

चौथी पंचवार्षिक योजना १ एप्रिल १९६६ रोजी अमलात यायला हवी होती . परंतु तिसऱ्या योजनेचे दिवाळे वाजल्यानंतर चौथी योजना नियोजित तारखेला सुरू होणे केवळ अशक्य होते . योजनेला सुट्टी दिल्यापासून ३ वर्षे होत आली आहेत . सध्या कामचलाऊ नियोजन चालू आहे . पूर्वी चौथ्या योजनेचा जो आराखडा तयार करण्यात आला होता , त्यानुसार ६३०० कोटी रुपयांची परकीय मदत अपेक्षित करण्यात आली होती . आता परकीय मदत मिळण्याची शक्यता बरीच दुरावली असल्याने चौथ्या योजनेचा आकार बराचसा मर्यादित केला जाणार आहे . पहिल्या तिन्ही पंचवार्षिक योजनांतील अनेक उद्दिष्टे अजून साध्य झालेली नाहीत . त्यांच्या जोडीला या योजनेत शक्य तितक्या लवकर स्वावलंबी बनणे , किमतीची पातळी स्थिर करणे , शेती उत्पादनात जास्तीत जास्त वाढ घडवून आणणे आणि कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम यशस्वी करणे या गोष्टींवर भर दिला जाणार आहे . जड व मूलभूत उद्योगधंद्यांची वाढ करणे , अन्नधान्य उत्पादनात भरघोस वाढ करून स्वयंपूर्णता साध्य करणे , मनुष्यबळाचा अधिकात अधिक वापर करून बेकारीला आळा घालणे , आर्थिक सामर्थ्याचे विकेंद्रीकरण करून आर्थिक विषमता नष्ट करणे ही उद्दिष्टे यापूर्वीच्या पंचवार्षिक योजनांमधून मांडण्यात आली होती ; परंतु यापैकी एकही उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही . तेव्हा चौथ्या योजनेच्या संदर्भात मांडल्या जाणाऱ्या उद्दिष्टांचे भवितव्य काय होणार आहे हे सांगण्यासाठी ज्योतिष्याची बिलकूल गरज नाही . भांडवलशाहीच्या नेतृत्वाखाली समाजवाद प्रस्थापित करण्याची काँग्रेसची घोषणा जशी हास्यास्पद होती तशीच भांडवलशाहीच्या नेतृत्वाखाली स्वयंपूर्ण , स्वयंगतिमान अर्थव्यवस्था निर्माण करण्याची त्यांची भाषा अधिकच हास्यास्पद आहे . जागतिक बँकेचे अध्यक्ष रॉबर्ट मॅक्नामारा यांनी अलीकडेच भारतास भेट दिली होती . सध्या देशात अस्तित्वात असलेल्या उत्पादनक्षमतेचा वापर करून जो माल तयारा होतो त्याच्या उठावासाठी आवश्यक ती बाजारपेठ देशात अगर परदेशात उपलब्ध नसल्याने नवीन कारखानदारीच्या योजना आखणे चूक आहे , अशा अर्थाचा सल्ला त्यांनी भारत सरकारला दिला आहे . जागतिक बँकेच्या अध्यक्षांचा सल्ला धुडकावून लावून पुढे जाण्याची भारतीय भांडवलदारांची अगर काँग्रेस सरकारची हिंमत नाही . कारण परकीय मदतीची सर्व सूत्रे जागतिक बँकेच्या हातात आहेत . भारतातील औद्योगिक विकासथांबविण्याची पाळी भारत सरकारवर आली आहे . भारतीय भांडवलशाहीच्या पुरस्कर्त्यांचे हेच मत आहे . नियोजनाला सुटी द्यावी अशी मागणी भारतीय भांडवलदारांच्या प्रतिनिधींनी तीन वर्षांपूर्वी केली होती . आज त्यांच्या जागतिक नियंत्यानेही तीच सूचना केली आहे . अशा स्थितीत एकंदर नियोजनच बासनात गुंडाळून ठेवले जाणार आहे . पहिल्या तीन योजनांच्या काळात जी उद्दिष्टे घोषित करण्यात आली होती ती साध्य करण्याऐवजी सोडून देण्याची घाई आज चालू आहे . औद्योगिक क्षेत्रात भांडवलशाहीला त्याचमुळे आपली मक्तेदारी प्रस्थापित करणे शक्य झाले आहे . काँग्रेस सरकारची ही वाटचाल नियोजनाची नसून औद्योगिक स्वातंत्र्याची आहे . याचाच अर्थ अर्थव्यवस्थेतील अराजक कमी होण्याऐवजी वाढणार आहे . या अराजकामुळे मक्तेदारी , परकीय कंपन्यांची अधिकाधिक भागीदारी आणि पर्यायाने व एकंदर अर्थव्यवस्थेवरच देशी व परदेशी मक्तेदारी कंपन्यांचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे . भारतीय स्वातंत्र्य व सार्वभौमत्व हे देखील अपरिहार्यपणेधोक्यात आले आहे .

काँग्रेस सरकारला पर्यायी सरकार

काँग्रेससत्तेला खाली खेचून त्या ठिकाणी जनतेचे पर्यायी सरकार स्थापन करण्याचा प्रश्न गेली वीस वर्षे चर्चिला जात आहे . पक्षाच्या दाभाडी प्रबंधात अशी तक्रार करण्यात आली होती की , " देशात क्रांतिकारक परिस्थिती झपाट्याने वाढत आहे , पण त्या परिस्थितीचा योग्य फायदा घेणारा क्रांतिकारक पक्ष या देशात नाही . ' वीस वर्षांनंतरही भारतीय राजकारणाबद्दल तेच विधान करावे लागत आहे . काँग्रेस पक्षाच्या कारभारामुळे जनतेत असंतोष निर्माण होऊ लागला आहे हे १९६५-६६ सालातील भारतव्यापी आंदोलनातून दिसून येत होते . १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तर अनेक राज्यांत काँग्रेसचा पराभव झाला . आठ राज्यांतून बिगर काँग्रेसी पक्षांची मंत्रिमंडळे अधिकारावर आली . भारतीय जनतेत प्रचंड उत्साह निर्माण झाला होता . काँग्रेसच्या कारभाराला आव्हान देणारी शक्ती अस्तित्वात येण्याची परिस्थिती निर्माण झाली होती . पण देशातील डाव्या पक्षांनी ही संधी वाया घालविली आहे , असाच निष्कर्ष काढावा लागतो . चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी , समाजवादावर निष्ठा ठेवणाऱ्या पक्षांची एक आघाडी करावी , असा प्रयत्न सुरू झाला . परंतु संयुक्त सोशलिस्ट पक्षाने सर्व काँग्रेसविरोधकांचा मेळावा करण्याची भूमिका घेतली . ' काँग्रेस हटाव ' ही घोषणाघेऊन आधी काँग्रेसचा पराभव करावा , अशी सं . सो . पा . ची . भूमिका होती . ही भूमिका नकारात्मक म्हणून इतर पक्षांनी नाकारली . त्यामुळे सार्वत्रिक निवडणुका अनेक आघाड्यांच्या स्वरूपात लढविण्यात आल्या . इतके होऊनही काँग्रेसचा अनेक राज्यांत पराभव झाला . परंतु निवडून आलेल्या बिगर काँग्रेसी पक्षांची मंत्रिमंडळे स्थापन करताना कार्यक्रमाचा पक्का आधार नसल्यामुळे पक्षोपक्षातील मतभेदांचा फायदा घेऊन ही मंत्रिमंडळे निकालात काढण्यात काँग्रसने यश मिळविले . केंद्र सरकारने जेव्हा ही मंत्रिमंडळे बरखास्त करण्याची पावले उचलली तेव्हा डाव्या पक्षांनी काही ठिकाणी केलेली आंदोलने चिरडून टाकली . अशाही स्थितीत भारतीय जनतेचा असंतोष थंड झालेला नाही . जनतेच्या फार मोठ्या विभागातून काँग्रेसविषयीचा भ्रम फार मोठ्या प्रमाणात नाहीसा झालेला आहे . नजीकच्या काळात काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्याची परिस्थिती आहे . पण या परिस्थितीचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी भारतात आज प्रभावी संघटना नाही , पक्ष नाही , नेतृत्व नाही . सर्वात वाईट गोष्ट म्हणजे समाजवादावर विश्वास ठेवणाऱ्या पक्षांत मतभेदाचे काहूर माजले आहे . भारतातील राजकीय परिस्थितीच अशी आहे , की मतभेद निर्माण होणे साहजिक आहे . या मतभेदावर मात करून लढाऊ जनतेला एकत्र करणे आणि मक्तेदार भांडवलशाहीविरुद्ध आणि पर्यायाने या सर्व प्रतिगामी शक्तींची दलाल बनलेल्या काँग्रेसविरुद्ध प्रचंड आंदोलन संघटित करण्याची शक्यता अजूनही आहे ही गोष्ट लक्षात घेणे जरुरी आहे . असे असले तरी एकजुटीच्या प्रयत्नांना तातडीने यश येणार नाही ; कारण भारतातील राजकीय पक्ष भिन्न भिन्न परंपरेत वाढले आहेत . किंबहुना एकमेकांवरील अविश्वासातूनच ते वाढले आहेत . सामान्यत : समान विचाराच्या पक्षांची एकजूट तरी साधली पाहिजेच , असा विचार गेली ३-४ वर्षे काही पक्षांत मूळ धरू लागला आहे . कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्ष हे पूर्वी एकमेकांस पाण्यात पाहत असत . त्यानंतर या दोन्ही पक्षांचेही चार किंवा अधिक पक्ष झाले तरी उजवे कम्युनिस्ट , डावे कम्युनिस्ट , संयुक्त सोशलिस्ट या प्रमुख पक्षांत एकीला निदान सहकार्याला अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याची चिन्हे आहेत . ही परिस्थिती या पक्षांनी सुधारल्यास डाव्या पक्षांचे सहकार्य मूर्त स्वरूपात येऊ शकेल . पण त्यासाठी दीर्घ मुदतीचे खास प्रयत्न झाले पाहिजेत . शेतकरी कामगार पक्षाने १९५० सालापासून अशा प्रयत्नांत आपल्या कुवतीनुसार भागीदारी केली आहे . परंतु एकट्या शेतकरी कामगार पक्षाचे प्रयत्न अपुरे पडले आहेत . आणि अपुरे पडणार आहेत . समाजवादावर निष्ठा ठेवणाऱ्या अखिल भारतीय स्वरूपाच्या पक्षांचे सहकार्य घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू झाले तर शेतकरी कामगार पक्ष त्या प्रयत्नांत भागीदारी करण्यास तयार राहील . समाजवादावर विश्वास ठेवणाऱ्या पक्षांचे सहकार्य हा व्यापक एकजुटीचा पाया आहे , अशीच शेतकरी कामगार पक्षाची भूमिका आहे . या राजकीय एकजुटीच्या आधारावर काँग्रेसविरोधी व्यापक संघटन उभे करता येईल . काँग्रेसच्या हातातील राजसत्ता खेचून घेण्याचे ते एक प्रभावी साधन होऊ शकेल . काँग्रेसविरोधी संघटना ही जनतेच्या प्रभावी नि व्यापक आंदोलनातून निर्माण होऊ शकेल , असा शेतकरी कामगार पक्षाचा विश्वास आहे . पक्ष पुढाऱ्यांच्या चर्चेतून ही गोष्ट होऊ शकली नाही हा अनुभव जमेला धरून पुढील वाटचाल केली पाहिजे . एकजूट झाली तरच लढा हेही सूत्र सोडून द्यावे लागेल . औद्योगिक कामगार , आयुर्विमा कॉर्पोरेशन , बँका यांचे कर्मचारी , सरकारी नोकर व शिक्षक हे सर्व कामगार गेली दोन वर्षे त्यांच्या जीवनवेतनाच्या प्रश्नावर आंदोलनात उतरत आहेत . ही आंदोलने प्रभावी आणि राष्ट्रव्यापी करण्याचे प्रयत्न झाले आहेत . शेतकरी , शेतमजूर व ग्रामीण भागातील लक्षावधी बेकार यांनाही या आंदोलनात आणण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत . तरुणवर्ग विशेषत : विद्यार्थीवर्ग सध्याच्या शिक्षण पद्धतीविरुद्ध आणि यंत्रणेविरुद्ध चिडून उठला आहे . विद्यार्थ्यांच्या जीवनाचा खेळखंडोबा केवळ शिक्षणयंत्रणेमुळेच होत नसून देशाच्या समाजव्यवस्थेवर प्रतिगामी शक्तींचा जो जबरदस्त पगडा आहे त्यामुळे तरुण पिढीचे खच्चीकरण होत आहे , त्यांच्या दुरव्यवस्थेला भांडवलदारी अर्थव्यवस्थाच जबाबदार आहे ही जाणीव युवकवर्गात निर्माण केली पाहिजे . या सर्व विभागांचा लढा एकाच व्यापक पायावर आणला पाहिजे . जनतेच्या लढ्याच्या तंत्रातही बदल करण्याची गरज आहे . जनतेचा असंतोष व्यक्त करण्यासाठी , हरताळ , निदर्शने , लाक्षणिक संप आदी मार्ग आवश्यक असले तरी केवळ असंतोष व्यक्त होण्यावरच लढ्याची सांगता होता कामा नये . जनतेच्या भिन्न भिन्न विभागांवर आज जे अन्याय होत आहेत त्यांचा प्रतिकार करण्याची वेळ आली आहे . जनतेच्या दैनंदिन मागण्यांसाठी संप करणे निराळे ; पण जनतेवर अत्याचार होत असताना तेथे प्रतिकाराचा प्रकार अवलंबिल्याखेरीज काँग्रेस सरकारला शह देणे कठीण आहे . भारतीय समाजव्यवस्थेवर साम्राज्यवादी , देशी मक्तेदार , जमीनदार यांनी पगडा बसविला आहे . शासनव्यवस्थेवर त्यांनी आपली हुकमत प्रस्थापित केली आहे . पण या सर्व प्रतिगामी विभागांचा राजकीय व सामाजिक पुरस्कार करण्याचे व शांतता आणि सुव्यवस्था यांच्या नावाखाली शासनयंत्रणेमार्फत त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे कार्य काँग्रेस पक्ष करीत आहे . या प्रतिगामी विभागांना सामाजिक आधार देण्यासाठी काँग्रेस पक्ष जनतेमध्ये भ्रम , दहशत , फाटाफूट , प्रलोभने , जातीभेद इत्यादी साधनांचा वापर करीत आहे . हीच ताकद वापरून काँग्रेस पक्ष निवडणुकीत विजय मिळवितो . समाजविरोधी शक्तींना खतपाणी घालणाऱ्या आणि प्रतिगामी शक्तींच्या रखवालदाराची भूमिका घेणाऱ्या काँग्रेस पक्षाला जनतेपासून अलग पाडण्याचे कार्य शहरातून आणि खेड्यांतून करणे अतिशय आवश्यक आहे . काँग्रेस जनतेपासून अलग पाडणे म्हणजे भांडवलशाहीचा सामाजिक आधार नष्ट करणे होय. हे कार्य यशस्वीरीतीने पार पाडण्यासाठी श्रमजिवी जनतेची व्यापक एकजूट करण्यात यश मिळविले पाहिजे . सध्या श्रमजीवी जनतेचे भिन्न भिन्न विभाग आपल्या मागण्यांसाठी आंदोलनात येत असले तरी परस्परांना पाठिंबा देण्याच्या कार्यक्रमात ते जिद्दीने भाग घेत नाहीत हा अनुभव आहे . याचाच फायदा काँग्रेस घेत असते . शेतकऱ्यांविरुद्ध कामगार , कामगारांविरुद्ध शेतकरी , सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध इतर जनता अशी फाटाफूट पाडण्याचा काँग्रेसने गेल्या दहा वर्षात अनेकदा यशस्वी प्रयत्न केला आहे . या सर्वच विभागांची लूट व पिळवणूक मक्तेदार भांडवलदार करीत असतात व या भांडवलदारांचे संरक्षण काँग्रेस सरकार करीत असते , ही जाणीव समाजाच्या सर्व थरांत जेवढी व्यापक आणि खोल होईल त्या प्रमाणात एकजुटीच्या प्रयत्नांना यश येईल . राजकीय एकजूट आणि जनतेच्या भिन्न भिन्न थरांतील एकजूट या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . या दोन्ही आघाड्यांवर ज्या प्रमाणात यश मिळेल त्याच प्रमाणात समाजवादी , लोकशाही आणि पुरोगामी आंदोलनास यश येणार आहे . या दुहेरी एकजुटीच्या आधारावर जनतेच्या आंदोलनांना राजकीय पातळीवर आणता येईल आणि श्रमजीवी जनतेची सत्ता प्रस्थापित करण्याचा कार्यक्रम यशस्वी करता येईल .

*शेतकरी कामगार पक्षापुढील कार्य*

भारतीय राजकीय , आर्थिक व सामाजिक परिस्थितीचे विवेचन करून सध्याच्या मुख्य समस्या काय आहेत याचा विचार झाला . मक्तेदार भांडवलदारांनी देशातील सर्व प्रतिगामी शक्तींना आपल्या पंखाखाली घेतले आहे . मक्तेदार भांडवलदार आणि प्रतिगामी यांची आघाडी झाली आहे . ही आघाडीच पुरोगामी , लोकशाही व समाजवादी विचारांची मुख्य शत्रू आहे . ही आघाडी म्हणजे जनतेचा मुख्य शत्रू आहे . या शत्रूविरुद्ध भारतातील जनता वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पातळीवर लढत आहे . परंतु या सर्व लढ्याचे एकसूत्रीकरण करून प्रतिगामी आघाडीला राजकीय सत्तेवरून खाली खेचून समाजवादी उभारणीचा आर्थिक , राजकीय व सामाजिक कार्यक्रम हाती घेतल्याखेरीज भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा मार्ग खुला होणार नाही . सध्याच्या परिस्थितीचे हे आव्हान आहे . शेतकरी कामगार पक्ष , या परिस्थितीत प्रतिगाम्यांचे हे आव्हान स्वीकारण्यासाठी कोणती भागीदारी करणार आहे हे ठरविणे जरूर आहे . शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे . पक्षाने मार्क्सवादी लेनिनवादी सिद्धांत प्रमाणभूत मानून राजकीय , आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला आहे . पक्षाचे महाराष्ट्राच्या राजकारणात जे स्थान आहे , त्यामुळे पक्षाच्या जबाबदाऱ्या अधिकच वाढलेल्या आहेत . शेतकरी कामगार पक्षाने गेल्या १२ वर्षांत कोणत्या ना कोणत्या संयुक्त आघाडीचा घटक म्हणून कार्य केले आहे . संयुक्त आघाडीत काम करताना पक्षाभिनिवेश ठेवला नाही . जनतेचे आंदोलन प्रभावी करणे , जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लढणे या बाबतीत शेतकरी कामगार पक्ष सातत्याने आघाडीवर राहिलेला आहे . संयुक्त आघाडीच्या जनचळवळीवर काही वेळा मर्यादा पडतात हे गृहीत धरूनही पक्षाने मुख्यत : एकजुटीवर व सहकार्यावर भर दिला आहे . राजकीय सहकार्याची व एकजुटीच्या चळवळीची आजच्या परिस्थितीत फार मोठी गरज आहे , हे मान्य करूनही शेतकरी कामगार पक्षाने स्वत : च्या ताकदीवर पाऊल टाकण्याची गरज आहे . एकजूट समर्थ बनविण्याची गरज आहे . एकजूट समर्थ बनविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची ताकद वाढविली पाहिजे . या सूत्राच्या आधाराने वेगवेगळ्या आघाड्यांवरील कार्यक्रम ठरवावा लागेल . शेतकरी कामगार पक्ष सध्या महाराष्ट्रात कामगार , शेतकरी या आघाड्यांवर काम करीत आहे . युवक आणि विद्यार्थी आघाड्यांवर पक्षाने नुकतेच कार्य सुरू केले आहे . शेतकरी कामगार पक्षाचे कार्य म्हणजे पुरोगामी , लोकशाही , समाजवादी आंदोलनाचा एक भाग आहे . त्यामुळे प्रतिगामी आघाडीवर ज्या ज्या ठिकाणी आपणास प्रहार करता येईल त्या त्या ठिकाणी प्रहार केला पाहिजे .

कामगार आघाडी

शेतकरी कामगार पक्षाने कामगार आघाडीवर एकजुटीचे धोरण स्वीकारले होते . कामगार जगतात गेल्या वीस वर्षांत एकजुटीची संघटना होऊ शकली नाही . कारखाने , वाहतूक , बांधकाम या तीनच धंद्यांत सध्या १ कोटी ११ लक्ष कामगार काम करीत आहेत . शिवाय सरकारी , निमसरकारी कचेऱ्या , बँका , व्यापारी कंपन्या यामधील कर्मचारी व शिक्षक असे लक्षावधी कामगार या देशात आहेत . गेल्या १५ वर्षांत कामगारांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढली आहे ; तथापि देशामध्ये संघटित कामगार चळवळीची , तिच्या राजकीय आशयाची जाणीव फार कमी आहे . त्यामुळे ट्रेड युनियन चळवळीच्या कक्षेत आजतागायत निम्मेदेखील कामगार येऊशकलेले नाहीत . याखेरीज अनेक कामगार संघटना केवळ नाममात्र अगर धंदेवाईक आहेत . अनेक ठिकाणी एका धंद्यात एकापेक्षा अधिक कामगार संघटना काम करीत आहेत . भारतातील कामगार चळवळ अजूनही संघटित तर नाहीच ; परंतु या संघटनांतून राजकीय जागृतीही नाही . कामगारांच्या व्यावसायिक संघटना बांधणे हा या देशाच्या भावी आंदोलनातील महत्त्वाचा कार्यभाग आहे . कामगारवर्गाच्या असंघटितपणाचा फायदा घेऊन गेल्या वीस वर्षांत कारखानदारांनी त्याची अनेक प्रकारे लूट केली आहे . रॅशनलायझेशन , कॉम्प्युटर हे अमलात आणून नव्याने बेकारांची भर टाकली जात आहेच ; परंतु कामवाढ , टाळेबंदी , वेतनकपात , सक्तीच्या सुट्या इ . मार्गांचा अवलंब करून कामगारांच्या मिळकतीत कपात करण्यात आली आहे . कामगारांवर होत असलेल्या या आघातांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न कामगार संघटनांकडून होऊ शकला नाही . पण त्याहूनही महत्त्वाचे कारण म्हणजे मंदीच्या लाटेने पुढारीपणच ग्रासले गेले होते . ही पार्श्वभूमी लक्षात घेता कामगारवर्गातील संघटनेचे कार्य फारच खडतर आहे . कामगारवर्गात जागृती करण्याची व नव्या पुढारीपणाची गरज आहे . नव्या पिढीला कामगार संघटनेच्या कक्षेत खेचून आणणारे पुढारीपण हवे आहे . महाराष्ट्राचा विचार केल्यास पुणे - मुंबई - नाशिक या त्रिकोणात कामगारांची प्रचंड वाढ झाली आहे . होत राहणार आहे . या विभागांत भरती होत असलेला नवा कामगार नेतृत्वाची अपेक्षा करीत आहे . शेतकरी कामगार पक्षाविषयी आकर्षण असलेल्या कामगारांची संख्या फार मोठी आहे . शेतकरी कामगार पक्षाने या क्षेत्रात चिकाटीचे प्रयत्न करून कामगार संघटनेचे काम अंगावर घेण्याची गरज आहे . शिवाय महाराष्ट्राच्या ग्रामीण विभागात साखर कारखान्यांच्या क्षेत्रात कामगारांची संख्या वाढत आहे . इतर लहानसहान कारखानेही वाढत आहेत . खेड्यांतून वास्तव्य करून या कारखान्यांतून काम करणाऱ्या कामगारांची संख्याही वाढत आहे . या क्षेत्रात विशेष कामगार संघटना नाहीत . हा कामगार संघटित झाल्यास त्याचा परिणाम शेतकरी आघाडीवरही होणार आहे . कामगार आघाडीवर गरजेइतके किमात जीवनवेतन आणि बेकारीपासून मुक्तता या दोन प्रश्नांवर लढण्याची गरज आहे . कामगारांच्या संघटनांची कुवत वाढवत , प्रतिकाराच्या लढ्यात कामगारांना सहभागी करणे ही आजची जबाबदारी आहे . सर्वच ठिकाणी एकजुटीच्या कामगार संघटना निर्माण होतील असे नाही . अशा स्थितीत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामगार संघटनक्षेत्रात स्वतंत्रपणे उभे राहिले पाहिजे . कामगारवर्गाचा विचार करताना शिक्षक , बँका , आयुर्विमा कॉर्पोरेशन , निमसरकारी कचेऱ्या यामधील कर्मचारी विभागाचा विचार केला पाहिजे . या विभागातील वरिष्ठ कर्मचारीवर्ग राजकीय दृष्ट्या पुरोगामी विचारांत येण्यास उत्सुक नाही . प्रतिगामी पक्षांशी त्याची विशेष जवळीक असते . परंतु कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या संघटनांना साह्य देणे , त्यांना जनतेची सहानुभूती मिळवून देणे श्रमिक जनतेच्या एकजुटीसाठी आवश्यक आहे . इतर श्रमिक जनतेच्या सहानुभूतीशिवाय या विभागावर होणारे अन्याय दूर होणार नाहीत याची जाणीव या विभागाला करून दिली पाहिजे . हा विभाग जनतेपासून अलग ठेवण्याचा काँग्रेसचा खास प्रयत्न असतो ; तो हाणून पाडण्याचा पक्षाने प्रयत्न केला पाहिजे .

शेतकरी आघाडी

शेतकरी आघाडी म्हणजे देशातील बहुसंख्य जनतेला प्रगतीचा मार्ग दाखवून प्रतिगामी शक्तींच्या विरोधात उभे करण्याचे क्षेत्र आहे . वाढत्या कारखानदारीबरोबर ग्रामीण विभागातून शहरात येणाऱ्या व कामगार बनणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाणार आहे . शेतकरी आघाडीवर संघटित राजकीय कार्य झाल्यास त्याचा कामगार आघाडीवरही उपयोग होतो , या दृष्टीने या आघाडीकडे पाहिले पाहिजे . भारतातील शेतकरी विभाग संघटित नाही हे एक कटू सत्य आहे . हा वर्ग अजूनही अंधश्रद्धा , रूढी , जातिभेद इ . फेऱ्यांत अडकून पडला आहे . त्याची बाजारपेठेत व इतरत्र जी पिळवणूक व लूट होत आहे , त्याची जाणीव त्याला हळूहळू होत आहे . तथापि ही लूट करणारे कोण आहेत , आपले खरे शत्रू कोण आहेत , याची त्याला खोलवर जाणीव झालेली नाही . शेतकरीवर्ग आर्थिकदृष्ट्या निरनिराळ्या थरात आणि सामाजिक दृष्ट्या भिन्न भिन्न धर्मांत , जातीत आणि पोटजातींत विस्कटलेला आहे . त्यांना जातीच्या भावकीच्या अगर घराण्याच्या नावावर विस्कळीत ठेवण्याचे प्रयत्न काँग्रेस व इतर प्रतिगामी शक्ती सातत्याने करीत असतात . शिवाय ग्रामीण भागातील डोंगरी विभागात शेतीव्यवसायाच्या जोडीला जंगलकाम करणारे , शिकार करणारे व जंगलातील साहित्य जमा करणारे विभाग असतात . ग्रामीण समाजातील हे सर्व विभाग शेतकरी आघाडीत सामील केले पाहिजेत . शेतकरीआघाडीचे जसे आर्थिक प्रश्न आहेत तसेच ते सामाजिकही आहेत . शेतकरी आघाडीवर कार्य करणाऱ्यांनी या दोन्ही प्रश्नांवर मार्ग शोधले पाहिजेत . भारतातील वेगवेगळ्या राज्यांत या प्रश्नाचे स्वरूप थोडेफार भिन्न आहे एवढेच . महाराष्ट्राचा विचार केल्यास ग्रामीण विभागात पात्र असलेले लोक १९६१ च्या खानेसुमारीप्रमाणे ८७ लक्ष ३७ हजार आहेत . यात एक एकरांहूनही कमी जमीन असलेले आणि शेकडो एकर जमीन धारण करणारे लोकही आहेत . जमीन मालक आहेत तसेच कुळेही आहेत . महाराष्ट्रातील शेतमजुरांची संख्या ४५ लक्ष १० हजार आहे . अखिल भारतात शेतमजुरांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वात अधिक आहे . यावरून शेती आघाडीवरील समस्यांची कल्पना येईल . महाराष्ट्रात लहान व मध्यम शेतकरी आणि शेतमजूर यांचा खरा प्रश्न श्रमाचा मोबदला मिळण्याचा आहे . शेतकरी कामगार पक्षाने गेल्या २० वर्षांत या प्रश्नावर जी लहानमोठी आंदोलने केली त्यामुळे भात , ज्वारी या दोन धान्यांची खरेदी सरकार ठराविक भावाने करीत आहे . तथापि सरकारी पातळीवरून जे भाव दिले जात आहेत ते किफायतशीर नाहीत . शेतकऱ्यांना येणारा उत्पादनखर्च व त्यांना मिळणे जरूर असलेले जीवनमान यांचा सरकारने या किमती ठरविताना मुळीच विचार केलेला नाही . सरकारने आपल्या लहरीप्रमाणे या किमती निश्चित केल्या आहेत . शिवाय ज्वारी व भात वगळल्यास बाकीच्या शेतीमालाच्या किमती कारखानदारांच्या व अडत्यांच्या लहरीवर अवलंबून आहेत . शेतमजुरांना हमखास काम मिळण्याची सोय नाही हे तर खरेच ; परंतु त्यांना मिळणाऱ्या मजुरीच्या दरातही फरक आहे . शेतमजुरांचे वेतन त्यांच्या गरजेपेक्षा फारच कमी आहे . शेतकरी आघाडीवरील कार्यात या प्रश्नांना प्राधान्य द्यावे लागेल . याशिवाय शेतीसुधारणा , पाणीपुरवठा , शेतीची औजारे , खते या प्रश्नांवरही आंदोलन उभारून समग्र शेतकऱ्यांना व शेतमजुरांना संघटित करण्याचा प्रयत्न करावा लागेल . शेतकरी आघाडीवरील संघटनेच्या प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाने शेतकरी सभासंघटित करण्याचा निर्णय घेतला आहे . शेतकरी सभा ही सर्व शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खुली आहे . परंतु शेतकरी सभेच्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी करण्याच्या मार्गात सधन शेतकरीआड येणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे . शेतकरी सभेचे जाळे खेड्यापाड्यांतून पसरविण्याचा शिकस्तीचा प्रयत्न पक्ष कार्यकर्त्यांनी केला पाहिजे . शेतमजुरांची स्वतंत्र संघटना उभी करण्याची वेळ काही विभागांत आली आहे . बागायती शेतीचा विभाग , साखर कारखाने , सरकारी फॉर्स तसेच जमिनीची मोठी मालकी असणारे विभाग , अशा ठिकाणी शेतमजुरांच्या स्वतंत्र संघटना स्थापन करण्याची गरज आहे . या विभागात अशा संघटना शेतमजुरांच्या योग्य मजुरीचे आणि त्यांच्या जीवनाशी निगडित असणारे इतर प्रश्न उदाहरणार्थ मोठ्या जमीनदारांकडील जमिनीची मालकी तोडून त्यांच्या जमिनी भूमिहीनांना कसण्यासाठी देण्याचा प्रश्न , शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा खाली आणण्याचा प्रश्न आणि एकंदर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जनतेची संघटना उभी करण्याचे कार्य करू शकतील . शेतकरी संघटना व शेतमजुरांच्या संघटना जेथे वेगवेगळ्या म्हणून काम करीत असतील तेथे त्या दोहोंमध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न झाला पाहिजे .

*शहरी समाजाचे प्रश्न

औद्योगिकीकरणाबरोबर शहरी लोकसंख्येत जसजशी वाढ होत आहे तसतसे शहरांचे असे खास प्रश्न तयार होत आहेत . घरांची टंचाई , विद्यार्थ्यांचा शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश मिळण्याचा प्रश्न , घरभाडे , पाणीपुरवठ्याचा प्रश्न , गुन्हेगारी इ . विविध प्रश्न तयार होत आहेत . शहरातील सुखवस्तूव प्रतिष्ठित विभागांना सर्व सोयी उपलब्ध होतात ; परंतु गरीब वस्त्यांतून राहणाऱ्या लोकांना साध्या नागरी सोयीदेखील उपलब्ध होत नाहीत हे दृश्य अपवादात्मक नाही अगर केवळ अपघाताने ते घडते असे नाही . प्रत्येक मोठ्या शहरात ते प्रश्न तीव्र स्वरूप धारण करीत आहेत . हे प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांनी सोडवावेत असे म्हणून सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असते . हे प्रश्न जनतेच्या संघटित ताकदीच्या जोरावर सुटू शकतात . हे प्रश्न राजकीय नाहीत अशा समजुतीने त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही . पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न म्हणून ते हाती घेतले पाहिजेत व नागरिकांच्या व्यापक संघटना उभारून ते सोडविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली पाहिजे .

युवक आणि विद्यार्थी*

आजचा युवक आणि विद्यार्थी हा स्वतंत्र भारतात जन्मलेला आणि भारताचा आधारस्तंभ असा घटक आहे . या विभागाला राजकीय चळवळीपासून दा प्रश्न आहेत . शिक्षण मिळण्याचा प्रश्न , रोजगारधंदा विभागापुढे जे प्रश्न आहेत , ते सर्व समाजात वस्तुत : या मिळण्याचा प्रश्न व इतर आनुषंगिक प्रश्न हे वरवर पाना केवळ युवकांचे प्रश्न दिसत असले तरी ते साया राजकारणात , पुरोगामी आंदोलनात भांडवलशाही समाजाचे प्रश्न आहेत . हे प्रश्न सुटण्यावर या तरुण पिढीचे भवितव्य अवलंबून आहे असे म्हणता येईल . म्हणूनच भारतीय युवक व विद्यार्थी आंदोलनाला अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे . सरंजामशाही आणि समाजव्यवस्थेचे अपत्य असलेली आणि अशा समाजव्यवस्थेलाच पोषक असलेली शिक्षणपद्धती आज देशात चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर बेकारीची आणि अपमानित जीवनाची टांगती तलवार लटकलेली असते . या तरुण पिढीला भारताच्या घडणीमध्ये भाग घेण्याचा न्याय्य अधिकार व संधी मिळाली पाहिजे . यासाठी कुवतीप्रमाणे काम , बौद्धिक कुवत वाढविण्याची संधी या तरुण पिढीला मिळणे जरूर आहे . भांडवलशाही आणि प्रतिगामी राजवट ही या तरुण पिढीची खरी शत्रू आहे . सत्ता , संपत्ती ज्यांच्या हातात आहे , त्यांच्याच मुलामुलींसाठी विकासाची संधी हे प्रतिगाम्यांच्या सामाजिक दृष्टिकोनाचे सूत्र असते . सामान्य पालकाच्या घरी जन्माला येणे हा भांडवलशाही समाजव्यवस्थेत अक्षम्य गुन्हा ठरावा अशीच काँग्रेस राजवटीतील शैक्षणिक व्यवस्था आहे . केवळ अपवादात्मक म्हणून चारदोन मुले चमकतात . या गोष्टीचे भांडवल करून आजच्या विषमतेचेही निर्लज्जपणे समर्थन केले जाते . वास्तविक पाहता , विषमतेवर आधारलेल्या समाजात प्रत्येक मुलाच्या बुद्धीच्या विकासाला वाव मिळूच शकत नाही . म्हणूनच आर्थिक व सामाजिक विषमतेलाच मूठमाती देण्याचा निर्धार तरुण पिढीने करणे आवश्यक आहे. हा दृष्टिकोन तरुण पिढीमध्ये पसरविण्याचा प्रयत्न पक्षाने केला पाहिजे . युवक संघटनांच्या स्थापनेचा हा पाया असला पाहिजे . तरच आजची तरुण पिढी अन्यायाचा प्रतिकार करण्यास सज्ज होईल . या लढ्यात तरुण पिढी समाजापासून अलग पडणार नाही याची योग्य दक्षता घेतली पाहिजे . युवक संघटना , इतर जनसंघटना या सर्वांमध्ये एक भक्कम दुवा ठेवण्याचा व तरुणांना जनआंदोलनांमध्ये सहभागी करून घेण्याचा खास प्रयत्न केला पाहिजे .

दलित आणि आदिवासी समाज

भारतातील दलित आणि आदिवासी समाजाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला बंडखोरीचा मार्ग दाखवून त्यांच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी त्यांना राजसत्तेविरुद्ध लढ्याला प्रवृत्त केले . तथापि रिपब्लिकन पक्षाच्या पुढाऱ्यांना आज सत्तेचे विशेष आकर्षण वाटू लागले आहे . समाजाच्या संघटित ताकदीवर जनतेच्या सत्तेचे भागीदार होण्यापेक्षा काँग्रेसशी चुंबाचुंबी करून सत्तेची थोडीफार सवलत मिळविण्याचा मार्ग या पुढाऱ्यांनी चोखाळला आहे . चारदोन पुढाऱ्यांना या धोरणामुळे लाभ झाला तरी बहुसंख्य दलित समाज आर्थिक व सामाजिक गुलामगिरीतून बाहेर पडू शकत नाही . रिपब्लिकन पक्ष पुढाऱ्यांच्या धोरणामुळे आज दलित समाज एकाकी पडत आहे . पुढारीपणाच्या धोरणासंबंधीचा भ्रमनिरास तातडीने होणार नाही ; परंतु या पुढारीपणाच्या कचखाऊ धोरणाची जाणीव झालेले तरुण आज त्यांच्या अनुयायांत निर्माण होत आहेत. बौद्धधर्माचा स्वीकार केल्यानंतर दलित जनतेपैकी बहुसंख्य समाज हिंदुधर्माच्या वर्णाश्रम चौकटीतून बाहेर पडला आहे . परिणामी त्याचा सामाजिक न्यूनगंड कमी झाला आहे . परंतु तेवढ्याने या समाजाचे प्रश्न सुटू शकत नाहीत . आर्थिक गुलामगिरी अजूनही वज्रलेप आहे . एकूण साऱ्याच समाजाची भांडवलशाहीकडून पिळवणूक होत असताना अगदी हलाखीच्या अवस्थेत असलेल्या या दलित जनतेला बसणारा फटका असह्य असतो . हाच अनुभव विशेषत : ग्रामीण विभागात राहणाऱ्या दलित जनतेला अधिक तीव्रतेने येतो . या समाजाला जनआंदोलनात सामील करून घेण्यासाठी खास प्रयत्न झाले पाहिजेत . त्याचबरोबर या दलित जनतेच्या प्रश्नावर साऱ्या समाजालाच आंदोलनाच्या पातळीवर आणण्याचा स्वतंत्र प्रयत्न केला पाहिजे . आदिवासी समाजाचा प्रश्न दलित जनतेच्या प्रश्नापेक्षाही अधिक बिकट आहे . हा समाज बहुतांशी डोंगराळ विभागात राहतो आणि साहजिकच इतर व्यवसाय करणाऱ्या समाजापासून तो अतिशय अलग पडलेला आहे . हा समाज कमालीचा मागासलेला असून देवधर्माच्या आणि अनिष्ट रूढींच्या पकडीत सापडलेला आहे . त्यांच्या या अगतिक परिस्थितीचा आणि अज्ञानाचा प्रतिगामी शक्ती गैरफायदा घेत आहेत . या समाजाला निश्चित आणि खात्रीशीर असा व्यवसाय नसल्याने त्याची फार मोठ्या प्रमाणावर उपासमार होत असते . या समाजाला व्यवसाय मिळवून देणे ही प्राथमिक गरज आहे . या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार झालेला नाही म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही . त्याच्या विकासाच्या वाटा रोखल्या जाण्यास जी कारणे असतील त्यामध्ये त्यांचे अज्ञान हे फार मोठे कारण आहे . या समाजाला एकूण समाजव्यवस्थेचा घटक बनण्याचा अधिकार व संधी मिळणे जरूर आहे . आदिवासी समाजाच्या खास संघटना उभारून माणुसकीचे हक्क या समाजाला मिळवून देणे हे प्राथमिक कार्य आहे .

पक्षसंघटना

वर उल्लेख केलेल्या सर्व आघाड्यांवरील कार्यास व्यापक स्वरूप देऊन त्याचे एकसूत्रीकरण साधणे व त्यास राजकीय आंदोलनाचे स्वरूप देण्याचे मुख्य कार्य आपल्या पक्षास करावयाचे आहे . या जबाबदाऱ्या फार मोठ्या आहेत आणि त्या पार पाडण्यासाठी पक्षसंघटना व्यापक , शिस्तबद्ध आणि गतिमान करण्याची गरज आहे .

शेतकरी कामगार पक्षात वैचारिक एकवाक्यता आहे . पक्षाचे संघटनात्मक सामर्थ्य अजूनही अपुरे आहे . नव्या कार्यकर्त्यांना पक्षकार्यात सामावून घेण्याचे कार्य अतिशय मंदगतीने चालताना दिसते . शेतकरी कामगार पक्ष हा मार्क्सवादी लेनिनवादाचा अंगीकार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे . वर्गीय व जनसंघटना या पक्षाचा खराखुरा आधार आहेत , हे दृष्टीआड करून चालणार नाही . कामगार , शेतकरी , शेतमजूर , युवक , विद्यार्थी यापैकी कोणत्या ना कोणत्या तरी आघाडीवर सातत्याने व चिकाटीने काम करण्याचा प्रयत्न पक्ष कार्यकर्त्यांनी केला पाहिजे . या आघाड्यांचे नेतृत्व प्रभावीपणे करण्याची कुवत ज्या प्रमाणात वाढेल त्याच प्रमाणात पक्षाचीही ताकद वाढणार आहे . यापुढील काळात पक्षसंघटनेच्या या कार्यावर अधिक भर द्यावा लागणार आहे . शेतकरी कामगार पक्षाकडून जशा अपेक्षा वाढत आहेत तसे पक्षाविषयी तरुण कार्यकर्त्यांत आकर्षणही वाढत आहे . पक्ष सभासद नोंदणीची जोरदार मोहीम संघटित करून या नव्या कार्यकर्त्यांना पक्षाचे ध्येय , धोरण , कार्यपद्धती व एकंदर राजकीय दृष्टिकोन समजावून दिला पाहिजे . मार्क्सवादी लेनिनवादी तत्त्वज्ञान आत्मसात करण्यासाठी त्यांना पक्षाने सक्रिय मदत केली पाहिजे.

शेतकरी कामगार पक्षाचे लोण खेड्यापाड्यापर्यंत पोचलेले आहे . त्या दृष्टीने एकंदर समाजास जागृत करण्याचा कार्यक्रम हासततचा कार्यक्रम ठेवला पाहिजे . फक्त एखाद्या विशिष्ट मोहिमेपुरता अगर आदोलनापुरता प्रचार ही पद्धती आता निर्धाराने बदलली पाहिज . जनतेमध्ये जागृती करून पक्षाचे ध्येयधोरण सांगण्यासाठी जाहीर सभा , चर्चा , बैठकी , परिषदा असे कार्यक्रम सातत्याने संघटित केले पाहिजेत . पक्षाची प्रचार मोहीम संघटित करण्यासाठी खास यंत्रणा उभी केली पाहिजे . पक्षाच्या यंत्रणेमधून नियमितपणे निधी जमा केला जात नाही . जिल्हा पातळीवर संपूर्ण वेळ देऊन काम करणारे कार्यकर्ते निर्माण केले पाहिजेत . त्याखेरीज पक्षकार्याला अपेक्षित उठाव येणार नाही . हे कार्य आज पार पाडणे अगत्याचे आहे . पक्षाच्या संघटनात्मक कामाचा विचार करीत असतानाच नजीकच्या काळात निरनिराळ्या प्रश्नांवर जनआंदोलने संघटित करण्याचा कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे . या आंदोलनाचा कार्यक्रम सूत्ररूपाने निर्देशित करणे जरूर आहे .

१ ) शेती उत्पादनाला परिणामकारक गती देण्यासाठी शेतीमालाचा उत्पादनखर्च व शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना मिळणे जरूर असलेले वाजवी जीवनमान या दोन गोष्टी पायाभूत मानून शेतीमालाच्या किफायतशीर किमती हंगामापूर्वी ठरवून दिल्या पाहिजेत आणि त्या किमती शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष पदरात पडतील अशी हमी सरकारने दिली पाहिजे .

२ ) शेतसारा माफ करण्यात आला पाहिजे .

३ ) मोठ्या जमीनमालकांकडून जमीन काढून घेऊन भूमिहीनांना कसण्यासाठी दिली पाहिजे . जमीनधारणा कमालमर्यादा कायद्यात नमूद करण्यात आलेली कमालमर्यादा अवास्तव असल्याने ती खाली आणली पाहिजे .

४ ) पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा शेतीसाठी व उद्योगधंद्यांसाठी कौशल्याने वापर करण्यात आला पाहिजे . कृष्णा - गोदावरी पाणीतंटा ज्या पद्धतीने भारत सरकार सोडवू पाहत आहे . ती पद्धती व महाराष्ट्र सरकारचा नाकर्तेपणा लक्षात घेता या नद्यांच्या पाण्याचान्याय्य आणि हक्काचा हिस्सामहाराष्ट्राला मिळण्याची सुतराम शक्यता नाही . कृष्णा गोदावरीच्या पाण्याचा न्याय्य वाटा महाराष्ट्राला मिळण्यासाठी या प्रश्नावर प्रभावी जनआंदोलन उभारले पाहिजे.

५ ) परदेशातून अन्नधान्याचा एककणही आयात केला जाता कामा नये . देशाला लागणारे अन्नधान्य देशातल्या देशात पिकविण्यासाठी हाच एक निर्धार उपयोगी पडणार आहे . परदेशातून येणाऱ्या धान्याची आयात बंद होताच देशातील अन्नधान्य उत्पादनाला उत्तेजन व गती मिळेल . त्याचप्रमाणे कपाशी , सोयाबीन तेल या वस्तूंची आयातही ताबडतोब बंद केली पाहिजे .

६ ) भारताचा आयात - निर्यात घाऊक व्यापार सरकारने आपल्या ताब्यात घेतला पाहिजे .

७ ) जड व मूलभूत उद्योगधंद्यांचे तसेच मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या मक्तेदारी पद्धतीच्या उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे .

८ ) जहाज वाहतूक , बँका , जनरल इन्शुरन्स व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे .

९ ) परदेशी कर्जे व परकीय खाजगी भांडवल खाजगी मालकीच्या क्षेत्रात निघणाऱ्या उद्योगधंद्यांसाठी आयात केले जाता कामा नये . परकीय भांडवलाची ही आयात फक्त सरकारी पातळीवरच झाली पाहिजे . एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राला दिलेले कर्ज असेच त्यांचे स्वरूप राहिले पाहिजे .

१० ) कच्चा माल व पक्का माल यांच्या किमतीमध्ये समतोल व अन्योन्यसंबंध ( Parity ) राखला पाहिजे .

११ ) गोरगरीब शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यात आली पाहिजेत .

१२ ) शेती उत्पादनाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जे उपलब्ध करून दिली पाहिजेत .

१३ ) शेतकऱ्यांव्यतिरिक्त कारागीर म्हणून जे लोक ग्रामीण विभागातून वास्तव्य करतात अशा पतहीन लोकांना निरनिराळे उद्योगधंदे काढण्यासाठी कर्जपुरवठा केला गेला पाहिजे .

१४ ) शेतमजुरांना घरबांधणीसाठी मोठ्या प्रमाणावर मदत व कर्जपुरवठा करण्याची व्यवस्था झाली पाहिजे . राज्य सरकारने त्यांच्यासाठी जामीन राहिले पाहिजे.

१५ ) शेतमजूर , कामगार व इतर कर्मचारी यांना गरजेइतके किमान वेतन मिळाले पाहिजे .

१६ ) सर्व कामगारांचा महागाई भत्ता त्यांच्या राहणीमानाच्या निर्देशांकाशी जोडण्यात आला पाहिजे . आज जवळजवळ निम्म्याहून अधिक कामगारांच्या बाबतीत ही तरतूद झालेली नाही . ती ताबडतोबीने झाली पाहिजे .

१७ ) प्रत्येक सशक्त व काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला काम मिळालेच पाहिजे व बेकारांना बेकारभत्ता दिला गेला पाहिजे .

१८ ) सर्व प्रकारच्या खाजगी व सार्वजनिक मालकीच्या उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापक मंडळावर कामगारांना परिणामकारक भागिदारी दिली गेली पाहिजे .

१९ ) पददलित जनतेच्या सामाजिक समतेचा लढा संपलेला नाही . आर्थिक विषमतेविरुद्ध कराव्या लागणाऱ्या आंदोलनाच्या बरोबरीनेच त्यांच्या सामाजिक समतेसाठी कराव्या लागणाऱ्या लढ्यात समाजाच्या फार मोठ्या विभागांना सहभागी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे . दलित जनतेचा हा प्रश्न समाजाने आपला प्रश्न म्हणून उचलला पाहिजे .

२० )जमीनविकासाचे व जंगलविकासाचे खास कार्यक्रम संघटित करून आदिवासी जनतेला जमीन व कामधंदा मिळवून देण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे . त्यांच्यात वैचारिक जागृती घडवून आणल्याखेरीज सामाजिक उत्थानासाठी पोषक व पूरक वातावरण तयार होऊ शकणार नाही . त्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी खास प्रयत्न झाले पाहिजेत . हा समाज अतिशय लहानलहान वस्त्यांतून विखुरलेला असल्याने त्यांच्या मुलांसाठी वसतिगृहयुक्त शाळा , माध्यमिक विद्यालये , तांत्रिक शिक्षण देणाऱ्या शाळा वगैरे संस्था संपूर्णतया सरकारी खर्चाने चालविण्यात आल्या पाहिजेत . त्यांचा पिढ्यान् पिढ्यांचा मागासलेपणा आणि अठरा विश्वे दारिद्र्य त्यांच्या शिक्षणाच्या आड येणार नाही अशी काळजी शासनाने व समाजाने घेतली पाहिजे .

२१ ) औद्योगिक क्षेत्रातील १०० टक्के नोकऱ्या राज्यातील लोकांना मिळाल्या पाहिजेत . या नोकऱ्या मिळण्यासाठी जी पात्रता संपादन करावी लागते त्यासाठी त्यांचे प्रशिक्षण करण्याची यंत्रणा शासनाने त्या त्या उद्योगधंद्याच्या मालकाच्या सहकार्याने उभी केली पाहिजे .

२२ ) सरकारी व निमसरकारी नोकऱ्यां- ( महामंडळे वगैरमधील ) पैकी ७० टक्के नोकऱ्या ग्रामीण भागातून येणाऱ्या सुशिक्षित व प्रशिक्षित तरुणांना मिळाल्या पाहिजेत .

२३ ) शेतीसाठी केल्या जाणाऱ्या कपात करण्यात आली पाहिजे .

२४ ) प्रत्येक व्यक्तीला त्याच्या इच्छेप्रमाणे योग्य ते शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे . मूठभर धनवान मालकांच्या भाग्यवान मुलांपुरते शिक्षण मर्यादित न राहता ते सर्वांना घेता येईल अशी भौतिक परिस्थिती शासनाने निर्माण केली पाहिजे .

या व इतर आनुषंगिक प्रश्नांवर जनआंदोलनाचा कार्यक्रम संघटित करून जनतेची प्रतिकाराची ताकद बाढविणे जरूर आहे , काँग्रेस पक्षाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी जी पर्यायी ताकद या देशात उभी करणे जरूर आहे . ती उभी करण्याचा मार्ग अशा जनआंदोलनांतूनच जाणार आहे .