शेतकरी कामगार पक्षाची प्रारंभिक कार्ये
या पक्षाला प्रारंभापासूनच शास्त्रीय समाजसत्तावादाची वैचारिक बैठक देऊन शंकरराव मोरेंनी ग्रामीण महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना या पक्षाच्या झेंड्याखाली खेचून आणले. शंकररावांच्या सार्वजनिक जीवनातील तिसऱ्या व सर्वांत तेजस्वी कालखंडाला शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासूनच सुरुवात झाली. शेतकरी कामगार पक्षाची धोरणे सर्वांना समजावी म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक भक्कम करण्यासाठी अनेक अभ्यास वर्गातून व शिबिरातून शंकररावांनी बौद्धिक वर्ग घेतले. शंकररावांनी महाराष्ट्रात तुफानी दौरे काढून भांडवलदारांच्या व त्यांचे मुनीम बनलेल्या काँग्रेस सरकारच्या विरुद्ध उभ्या महाराष्ट्रात जबरदस्त रान उठवून राज्यकर्त्यांच्या सिंहासनाला घाम फोडला.शंकररावांनी त्यांच्या ‘जनसत्ता’ या साप्ताहिकातून मार्क्सवाद आणि शेतकरी-कामगार पक्षाचे एकसूत्री विचार लोकांसमोर मांडले. यावेळी ‘शेकाप’ वर काँग्रेसकडून विविध आरोप करण्यात येत होते. वर्गविग्रहाच्या तत्वांवर अतूट निष्ठा असलेला शेतकरी कामगार पक्ष लोकांच्या पसंतीस जसजसा खरा उतरत गेला, तसतसे काँग्रेसवाल्यांचे आरोप धादांत खोटे ठरु लागले. पक्षस्थापनेच्या निवेदनातच स्पष्ट ठरले होते की, यापुढे स्पष्टपणे समाजवादी तत्त्वानुसार कामगार-शेतकऱ्यांच्या वर्ग संघटना उभारणे व त्यांचे दैनंदिन वर्गलढे लढविणे हाच एक मार्ग आहे. त्यामुळे ‘शेकापवर’ टीका करणाऱ्यांची तोंडे आपोआपच बंद होत असत. त्याचप्रमाणे ३ ऑगस्ट १९४७ रोजी ह्या पक्ष स्थापनेच्या बैठकीत झालेल्या ठरावातदेखील असे ठरले होते की, प्रखर लढ्याशिवाय किसान कामगारांचे राज्य स्थापन करता येत नाही. कोणताही पक्ष वर्ग संघटनांचे पाठबळ घेतल्याशिवाय सत्तारुढ झाला, तरीही तो पक्ष किसान कामगारांचे राज्य स्थापन करु शकणार नाही. त्याचवेळेस असेदेखील म्हटले होते की, या वर्गसंघटना केवळ आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अस्तित्वात न आणता त्या सामाजिक व आर्थिक क्रांतीच्या आधारस्तंभ बनल्या पाहिजेत. शेतकरी कामगार पक्षाचे हेच प्रमुख धोरण संस्थापक शंकरराव मोरे यांनी आखले होते. आजही शेतकरी कामगार पक्ष याच धोरणावर कार्यरत आहे.