भाई विरेंद्रबाबू देशमुख

७० आणि ८० च्या दशकात महाराष्ट्रातील राजकारणात व समाजकारणात जे मान्यवर नेते स्वतःच्या पायावर उभे राहून स्वकर्तुत्वाने मोठे झाले त्यात भाई विरेंन्द्रबाबू यांचे नाव प्रामूख्याने घेतल्या जाते. तत्कालीन थोर नेत्यांच्या परंपरेतील महाराष्ट्राच्या मातीशी इमान राखणारा भुमिपूत्र म्हणजे भाई विरेंन्द्रबाबू देशमुख.
        भाई विरेंन्द्रबाबू शेतकरी कामगार पक्षाचे विदर्भातील लढवय्ये नेते. प्रवाहाच्या विरोधात राहून शेकापला विदर्भात वाढविण्यात भाईंचा सिंहाचा वाटा आहे. अत्यंत साधा भोळा माणूस , शिस्तप्रिय विचारवंत, राजकिय मुरबी नेता, न्यायप्रिय विचारांचा नंदादीप, करारी व्यक्तिमत्व, नैतिक मुल्यांची जडणघडण करणारा नेता अशी विविध वलय विरेंद्रबाबूंच्या व्यक्तिमत्वात होती.
प्राध्यापक ते एक लढवय्या नेता हा त्याच्या प्रवास फार वेधक आहे. काटोल मधील नबीरा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नौकरी करीत असतांना उदाराम चरडे नावाच्या कर्मचार्याला  अन्यायकारक पध्दतीने नोकरीवरून काढण्यात आले. या अन्यायाविरोधात विरेंद्रबाबूनी आवाज उचलला आणि आपल्या नौकरीचा राजीनामा सोपवून एक मोठे आंदोलन उभारले. येथूनच शेतकरी, कष्टकरी कामगारांचा लढवय्या नेता उदयास आला.
येथूनच काटोलच्या सामाजिक कार्यातला, स्थानिक राजकारणातला सहभाग हि वाढू लागला होता. दिलखुलास, मनमिळाऊ, धाडसी आणि आक्रमक स्वभावातून लोकांच्या समस्या सोडवल्या जाऊ लागल्या. समर्थकांची, कार्यकर्त्यांची मांदियाळी सभोवताली जमू लागली. जनसामान्यांशी नाळ जुळू लागली. घराघरात संपर्क होऊ लागला. लोक हक्काने कामेघेऊन येऊ लागले.
याच कालखंडात भाईंनी या भागाच्या नेतेपदापर्यंतचा टप्पा आपल्या कर्तृत्वाने गाठला होता. या प्रवासात कधी चढउतार आलेच नाहीत असे नाही. संघर्ष करावा लागलाच नाही असेही नाही. पण यशाने कधी साथ सोडली नाही, हेही तितकेच खरे होते. निवडणूक कोणतीही लढवली तरी यश हमखास विरेंद्रबाबूंच्या पारडयात पडणार, हे समीकरण जवळपास निश्चित झालेल होत.
मात्र यशाच्या या प्रवासातही पक्षाची ध्येयधोरणे, संस्कार याचा विसर कधी पडू दिला नाही. नेतृत्वाने घेतलेले सारेच र्निणय प्रत्येक वेळी मनापासून मान्य होतच असे नाही. पण एकदा र्निणय झाला की त्याचा सहर्ष स्वीकार करायचा आणि त्याच्या  अंमलबजावणीच्या कामी लागायचे, हा आता सवयीचा भाग झाला होता. बहुधा या निष्ठेतूनच पक्षाची कित्येक मोठी पदे न मागता पदरात येऊन पडली. काटोल पालीकेच्या अध्यक्षपदा पासून सुरू झालेला राजकीय प्रवास विधानपरिषदे पर्यत येऊन पोहोचला होता. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर, ”या पदाची जबाबदारी फार मोठी आहे. सरकारच्या बेमुर्वतखोर वागणुकीमुळे आज सर्वच क्षेत्रांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.” वाढती महागाई, प्रचंड भ्रष्टाचार, भारनियमन, वाढती गुन्हेगारी, कुपोषण, ढासळलेली अर्थव्यवस्था, कायदा-सुव्यवस्थेची कोलमडलेली स्थिती, चव्हाटयावर आलेला दोन पक्षांमधला संघर्ष, त्यांचे आपसातले हेवेदावे, ज्याच्या हातात जे लागेल ते त्याने लुटून नेण्याचा प्रकार…मुद्दा दरवाढीचा असो की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा, परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर जात असल्याचेच निराशाजनक चित्र आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या आशाआकांक्षा ध्यानात ठेवून सरकारशी करावा लागणारा संघर्ष वाटतो तितका सहज नाही, तरी आम्ही लढणारच…”
      विरेंद्रबाबूंचे हे विचार कानी येताच समाजमन त्यांना ‘आमचा लढवय्या नेता ‘ म्हणून संबोधू लागले. यांचे विचार इतके प्रभावी आहेत की, आजही हे विचार ऐकून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होत.अशा महान नेत्याला विनम्र अभिवादन आणि लाल सलाम!!
 
संकलन: किशोर वाळके, काटोल